
भार्गवी चिरमुलेसोबतच्या पॉडकास्टमध्ये गौरवने केला खुलासा
मुंबई : 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' (Maharashtrachi Hasyajatra) या कार्यक्रमातून घराघरांत पोहोचलेला फिल्टरपाड्याचा बच्चन म्हणजेच गौरव मोरे (Gaurav More) गेल्या काही एपिसोड्समध्ये दिसला नाही. या कार्यक्रमाने गौरवला प्रचंड प्रसिद्धी मिळवून दिली आहे. त्याची कॉमेडी, स्किटमध्ये सतत मार खाणं हे चाहत्यांना भलतंच आवडतं. त्यातही स्किटमध्ये गौरवने खोटा माज करत सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी यांना उलट बोलणं, मोठा सिनेमा मिळाल्यामुळे हास्यजत्रा सोडून जायच्या खोट्या धमक्या देत लोकांना हसवणं प्रेक्षकांना विशेष आवडतं. मात्र, हीच मस्करी करता करता गौरवने खरंच कार्यक्रम सोडला की काय असा प्रश्न प्रेक्षकांच्या मनात निर्माण झाला होता. ही शंका आता स्वतः गौरव मोरेने दूर केली आहे.
अभिनेत्री भार्गवी चिरमुलेच्या (Bhargavi Chirmuley) गप्पामस्ती या पॉडकास्ट शोमध्ये तिने गौरवला निमंत्रित केलं होतं. यावेळेस 'तू हल्ली हास्यजत्रेत दिसत नाहीस, तू हास्यजत्रा सोडलीस की काय?' असा प्रश्न तिने विचारला. यावर गौरव म्हणाला, “हा कार्यक्रम मी सोडलेला नाही. माझ्या खांद्याला दुखापत झाली असल्याने मी थोडे दिवस हास्यजत्रेतून ब्रेक घेतला आहे.”
गौरव मोरे पुढे म्हणाला, “सध्या या दुखापतीमुळे मी दोन ते तीन महिन्यांच्या ब्रेकवर आहे. कारण, एखादं स्किट सादर करताना ओढाताण होते. माझे स्किट पाहणाऱ्या प्रेक्षकांना आता माहितीच असेल की, माझ्या सगळ्या स्किटमध्ये मारधाड असते. सतत हालचाल केल्यामुळे खांदा अधिक दुखावू शकतो. हेच हास्यजत्रेतून ब्रेक घेण्याचं मूळ कारण आहे. याशिवाय या दरम्यान माझ्या एका सिनेमाचं शूटिंग सुद्धा होतं. त्याच्यासाठी मला ३० ते ३५ दिवसांचा वेळ काढावा लागणार आहे.”
“दुखापत आणि सलग शूटिंग या दोन कारणांमुळे मी काही दिवस हास्यजत्रेतून ब्रेक घेतला आहे. तीन महिन्यांचा ब्रेक घेतो असं मी सरांना आधीच सांगून ठेवलं होतं. खांदा बरा होईपर्यंत आरामच करेन अन्यथा हे दुखणं असंच वाढत जाणार” असं गौरव मोरेने सांगितलं. त्यामुळे गौरवला हास्यजत्रेत पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षकांना काही काळ वाट पाहावी लागणार आहे.