आज पार पडली हिंदुत्ववादी संघटनांची बैठक
नागपूर : महाराष्ट्रात लव्ह जिहाद (Love jihad) हा गंभीर मुद्दा बनत चालला आहे. याविरोधात कायदा व्हावा यासाठी भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) सातत्याने मागणी करत असतात. तसेच लवकरच महाराष्ट्रात हा कायदा आणला जाईल, असंही वक्तव्य त्यांनी केलं होतं. त्यांच्या या सततच्या पाठपुराव्यामुळे तसेच अनेक हिंदुत्ववादी संघटनांनीही (Hindutva organisations) लव्ह जिहाद विरोधी कायद्याची मागणी केल्यामुळे लवकरच हा कायदा महाराष्ट्रात आणला जाईल, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी आज हिंदुत्ववादी संघटनांच्या प्रतिनिधींसोबत पार पडलेल्या बैठकीत दिलं.
आज पार पडलेल्या बैठकीत हिंदू जनजागृती समिती, श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सकल हिंदू समाज, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, हिंदू विधिज्ञ परिषद, सनातन संस्था, संकल्प हिंदू राष्ट्र अभियान, अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ, राष्ट्रीय युवा गठबंधन, सर्वभाषिक बाह्मण महासंघ, चित्पावन ब्राह्मण महासंघ आदी संघटनांच्या प्रतिनिधींनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी बैठकीला ग्राम विकासमंत्री गिरीश महाजन, मदत व पुनर्वसन मंत्री संजय राठोड, शिवसेनेचे मुख्य प्रतोद आमदार भरत गोगावले, आमदार प्रताप सरनाईक उपस्थित होते.
हिंदू जनजागृती समितीचे राज्य संघटक सुनील घनवट म्हणाले, महाराष्ट्रात लव्ह जिहादच्या विरोधात पन्नासहून अधिक मोर्चे काढण्यात आले. परंतु आश्वासन दिल्यानंतरही त्यासाठी कायदा मात्र झालेला नाही. उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात आदी राज्यांनी लव्ह जिहादच्या विरोधात कायदा केला आहे, अशी माहिती त्यांनी दिली. प्रामुख्याने या बैठकीमध्ये लव्ह जिहाद तसेच मंदिरांना मदतीच्या मुद्द्यावर लक्ष वेधण्यात आले.
यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले,‘लव्ह जिहादविरोधी कायदा करण्याविषयी शासन अत्यंत गंभीर आहे. कायद्यासंदर्भात राज्य सरकारने बऱ्याच गोष्टी केलेल्या आहेत. लवकरच या संदर्भात तुम्हाला निर्णय समजेल.’ त्यामुळे महाराष्ट्रातही लवकरच लव्ह जिहादविरोधी कायदा येणार आहे.