नवी दिल्ली: भारत दौऱ्यावरील इंग्लंडच्या महिला संघाला तिसरा टी-२० सामना गमवावा लागला. हा सामना भारतीय गोलंदाजांनी गाजवला. पहिल्यांदा बॅटिंग करण्यासाठी उतरलेल्या इंग्लंडला भारताच्या महिला संघाने २० षटकांत १२६ धावांवर बाद केले. त्यानंतर आव्हानाचा पाठलाग करताना १९ षटकांत ५ विकेट गमावत लक्ष्य पूर्ण केले. भारतासाठी सायका इशाक आणि श्रेयांका पाटील यांनी ३-३ विकेट मिळवल्या.
मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये रंगले्या सामन्यात इंग्लंडने टॉस जिंकत पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्यांचा हा निर्णय भारतीय गोलंदाजांनी चुकीचा ठरवला. इंग्लंडसाठी कर्णधार हीथर नाईटने सर्वाधिक ५२ धावांची खेळी केली. यात ३ चौकार आणि ४ षटकारांचा समावेश आहे. याशिवाय एमी जोन्सने २१ बॉलमध्ये ३ चौकारांच्या मदतीने २५ धावा केल्या.
एक षटक राखत मिळवला विजय
इंग्लंडने विजयासाठी दिलेल्या १२६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या टीम इंडियाने १ षटक राखत विजय मिळवला. दरम्यान, संघाची पहिली विकेट शेफाली वर्माच्या रूपात तिसऱ्या ओव्हरमध्येच पडली होती. ती ६ धावा करून परतली. दुसऱ्या विकेटसाठी स्मृती मंधाना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी ५७ धावांची भागीदारी रचली. जेमिमा ३३ चेंडूत २९ धावा करून परतली.
त्यानंतर १६व्या षटकांत दीप्ती शर्मा १२ धावांवर, स्मृती मंधाना १७व्या षटकात ४८ धावा करून तर १९व्या षटकांत ऋचा घो, २ धावा करून परतली. मंधानाने संघाकडून सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली. कर्णधार हरमनप्रीत कौर आणि अमनजोत कौर संघाला विजय मिळवून देताना नाबाद राहिल्या. कर्णधार ६ धावांवर तर अमनजोत १० धावांवर नाबाद राहिल्या.