Thursday, July 18, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनसाहसी उद्यम भांडवलाची जननी

साहसी उद्यम भांडवलाची जननी

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे

बहुतांश स्त्रिया या उत्तम गुंतवणूकदार असतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे आपली आई. आपल्या आईने दागिन्यांमध्ये, भिशीमध्ये, अजून एखाद-दुसऱ्या योजनेमध्ये पैसे गुंतवलेले असतात. अडी-अडचणीच्या वेळी बाबांकडे पैसे नसले तरी ती तांदळाच्या, गव्हाच्या, डाळीच्या डब्ब्यात साठवलेले पैसे काढते आणि त्यावेळची गरज भागवते. तिलासुद्धा आई म्हटले जाते. पण ती आहे नवउद्यमी अर्थात स्टार्टअप्सची आई. जशी आई आपल्या बाळाला दूध पाजते, खाऊ-पिऊ घालते. तिला मोठं करते. तसंच तीदेखील नवीन स्टार्टअपमध्ये पैसे गुंतवते. त्याला मोठं होण्यासाठी आवश्यक मदत करते. तिने अशा प्रकारे एक नव्हे दोन नव्हे, तर तब्बल २०० स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. त्या स्टार्टअप्सना मायेने वाढवलेलं आहे. ती स्टार्टअप्सची माय म्हणजे वाणी कोला.

वाणी कोला यांचा जन्म हैदराबादमध्ये झाला, तर अरुणाचल प्रदेश, हैदराबाद आदी ठिकाणी बालपण गेले. तिने ओस्मानिया विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये पदवी पूर्ण केली. त्यावेळेस हाताच्या बोटावर मोजण्याइतपतच मुली तिच्यासोबत अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होत्या. १९८०च्या उत्तरार्धात, ती यूएसएला गेली आणि अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीमधून पदव्युत्तर पदवी पूर्ण केली. यानंतर तिने एम्प्रोस, कंट्रोल डेटा कॉर्पोरेशन आणि कॉन्सिलियम इंकसारख्या नामांकित कंपन्यांमध्ये तंत्रज्ञान क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. जवळपास १२ वर्षे कर्मचारी म्हणून काम केल्यानंतर, वाणीने १९९६मध्ये तिचा पहिला व्यवसाय उपक्रम-राइटवर्क्स स्थापन केला. राइटवर्क्स ही एक ई-प्रॉक्युरमेंट कंपनी होती.

राइटवर्क्सची संस्थापिका म्हणून ४ वर्षे पूर्ण केल्यानंतर, वाणीने कंपनीचा ५३% हिस्सा $६५७ दशलक्ष डॉलर्समध्ये इंटरनेट कॅपिटल ग्रुपला रोख आणि स्टॉक दोन्हींसह विकला. अखेरीस, तिने २००१ मध्ये कंपनीला १२ तंत्रज्ञान $८६ दशलक्षमध्ये विकले. तिने स्वत:ची दुसरी बाजू शोधून काढली आणि सॅन जोसमध्ये पुरवठा-साखळी सॉफ्टवेअर विकसित करणाऱ्या एनथ् ऑर्बिट या कंपनीची स्थापना केली. या कंपनीअंतर्गत सर्टस नावाचे सॉफ्टवेअरही सुरू करण्यात आले. २००५ मध्ये, पेप्सिकोने सर्टस अंतर्गत सॉफ्टवेअर खरेदी केले. हे पूर्ण झाल्यानंतर, वाणी एक नवीन धाडसी पाऊल उचलण्यास तयार होती.

तरुण उद्योजकांसोबत काम करण्यासाठी २२ वर्षांनंतर ती अमेरिकेतून भारतात परतली. त्यावेळी वाणी ४१ वर्षांची होती. भारतात परतल्यावर तिला भविष्यात काय करता येईल? हे जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी थोडा वेळ मिळाला. भारतीय बाजारपेठ समजून घेण्यासाठी महिनाभर तिने संशोधन केले, प्रवास केला. लोकांना भेटली. २००६ मध्ये तिचा व्हेंचर कॅपिटलिस्ट अर्थात साहसी उद्यम भांडवलदार म्हणून प्रवास सुरू झाला. मोठ्या संशोधनानंतर, तिने सिलिकॉन व्हॅलीमधील उद्योजक विनोद धाम आणि इंटेल कॅपिटल इंडियाचे माजी प्रमुख कुआर शिरालागी यांच्याशी सहकार्य केले. त्यांनी न्यू एंटरप्राइझ असोसिएट्स (NEA) च्या पाठिंब्याने $१८९ दशलक्ष निधीचे अनावरण केले. ४ वर्षे यशस्वी कार्य केल्यानंतर, न्यू एंटरप्राइझ असोसिएट्सने या संयुक्त उपक्रमातून बाहेर पडून थेट भारतीय बाजारपेठेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

२०११ मध्ये वाणीने शिरालागीसोबत कंपनीचे पुन:ब्रँडिंग केले आणि त्याचे नाव ‘कलारी कॅपिटल’ असे ठेवले. धामशी वेगळे झाल्यानंतर, तिने आणखी $४४० दशलक्ष डॉलर्स जमा केले, ज्यामुळे कलारी हे मालमत्तेनुसार भारतातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी कंपनी आणि एका महिलेने चालविलेली सर्वात मोठी कंपनी बनली. भारतातील सुरुवातीच्या टप्प्यातील तंत्रज्ञान-केंद्रित स्टार्ट-अप्सवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कलारी कॅपिटलची गुंतवणूक करण्यात आली. कलारी हे नाव केरळमधील मार्शल आर्ट्सचा एक प्रकार असलेल्या कलारीपयट्टूवरून घेतले होते. वाणी कोला आणि तिच्या व्यावसायिक भागीदार दोघांनाही हे नाव त्यांच्या उपक्रमाच्या संदर्भात त्यांच्या व्हिजनला योग्य वाटले. आतापर्यंत कलारीने किमान २०० कंपन्यांना भांडवल पुरवले आहे. यामध्ये झिवामी, मिनत्रा, स्नॅपडील, विन्झो, अर्बन लॅडर, ब्ल्यूस्टोन, ड्रीम ११ सारख्या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे.

“जोपर्यंत तुम्ही स्वतःला सुरक्षित कोशामधून बाहेर काढत नाही तोपर्यंत तुमची वाढ होणार नाही.” अर्थात कम्फर्ट झोन मधून बाहेर पडा. “आठ वेळा तुम्ही अयशस्वी व्हाल, दोन वेळा तुम्हाला अभूतपूर्व यश मिळेल. यशापयशाचे चक्र सुरूच राहील मात्र तुम्ही अपयशाच्या परिस्थितीत स्वतःला सक्षम ठेवणे महत्वाचे आहे.” अर्थात अपयश झाल्यावर निराश होऊ नका असे दोन महत्त्वाचे संदेश वाणी कोला नव्या तरुणाईला देतात. वाणी कोलाचे स्वप्न आणि दृष्टी ही महिला उद्योजकांसाठी सर्वात मोठी प्रेरणा आहे. वाढण्याची क्षमता असलेल्या नवउद्यमी अर्थात स्टार्टअप कंपन्या सुरू करण्यासाठी विशिष्ट प्रमाणात गुंतवणूक करणे आवश्यक असते. दीर्घकालीन वाढीच्या दृष्टीने काही गुंतवणूकदार गुंतवणूक करतात, त्यांना व्हेंचर कॅपिटलिस्ट अर्थात साहसी उद्यम भांडवलदार म्हटले जाते. वाणी कोला भारतातील व्हेंचर कॅपिटल इन्व्हेस्टिंग क्षेत्राच्या जननी म्हणून ओळखल्या जातात.

theladybosspower@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -