साकीब नाचनसह १५ जणांना घेतले ताब्यात; देशभरात सुमारे २५०० जणांची चौकशी सुरू
ठाणे : इसिस (ISIS) या दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरून एनआयएने (NIA) ठाणे (Thane) जिल्ह्यासह देशात मोठी कारवाई केली. ठाणे जिल्ह्यात तब्बल ४१ ठिकाणी (NIA Raid) छापे मारण्यात आले. यात पडघ्यात ३१ ठिकाणी एनआयएने कारवाई करत साकीब नाचणसह इतर १५ जणांना ताब्यात घेतले आहे. या पकडलेल्या दहशतवाद्यांकडून मोबाईल फोन, धारदार शस्त्र, तलवारी आक्षेपार्ह साहित्य, पॅलेस्टाईनचा झेंडा, हार्ड डीस्क जप्त करण्यात आले आहे.
ठाणे जिल्ह्यातील पडघा, बोरीवली शहापूर, मिरा रोड, भिवंडी, कल्याण या ठिकाणी एनआयए आणि एटीएसची पहाटेपासून छापेमारी सुरु आहे.
साकीब नाचण याआधी ट्रेन ब्लास्ट प्रकरणात आरोपी होता. पुणे इसिस प्रकरणात काही महिन्यांपूर्वी साकीब नाचणचा मुलगा शामील नाचण याला अटक केली होती. आता या सर्वांना एनआयएने ताब्यात घेऊन पुढील कारवाई सुरू केली आहे.
त्याचबरोबर कर्नाटकातील काही ठिकाणी देखील एनआयए कडून छापे टाकण्यात आले आहेत. या छापेमारीत ताब्यात घेण्यात आलेल्यांमध्ये पुण्यातील तिघांचा समावेश आहे. या तिघांपैकी एकजण पुण्यातील कोंढवा भागातील तालाब मस्जीद परिसरात राहणारा आहे तर दोघेजण मोमिनपुरा भागात राहणारे आहेत.
१८ जुलैला पुण्यातील कोथरूड परिसरात पुणे पोलिसांनी मध्यरात्री पेट्रोलिंग करत असताना मध्यरात्री इमरान खान आणि मोहम्मद साकी या दोन दहशतवाद्यांना पकडले होते. तर त्यावेळी त्यांचा तिसरा साथीदार पोलिसांना चकवा देऊन पळून जाण्यात यशस्वी झाला होता. त्यानंतर झालेल्या पोलीस तपासात दहशतवाद्यांची पुढची लिंक उघडकीस आली आहे. त्यानुसार, देशभरात सुमारे २५०० जणांची चौकशी सुरू आहे.
अटक करण्यात आलेल्यांची नावे
हसीब मुल्ला, मुसाफ मुल्ला, रेहन सुसे, फरहान सुसे, फिरोज कुवारी, आदिल खोत, मुखलीस नाचन, सैफ आतिक नाचन, याह्या खोत, राफील नाचन, राजील नाचन, शदुब दिवकर, कासिम बेलोरे, मुंजीर के पी या दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
एनआयएकडून देशभरात ४४ ठिकाणांवर धाडसत्र
एनआयएने देशभरात ४४ जागांवर धाडी टाकल्या आहेत. पुणे दहशतवादी प्रकरणात शामिल नाचन आणि अतिफ नाचनला पडघा गावातून अटक करण्यात आली होती. नाचनला आणि अतिफ नाचन पडघा गावातून अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने एनआयएने १५ जणांना ताब्यात घेतले आहे. तसेच कर्नाटकमध्येही एनआयएच्या पथकाकडून छापेमारी सध्या सुरु आहे.
एनआयएने केलेल्या तपासात आंतरराष्ट्रीय कनेक्शन आणि सध्या सुरू असलेल्या प्रकरणात आयएसआयएस हँडलर्सचा सहभाग असल्याचं उघड करण्यात आलं आहे. भारतामध्ये इसिसच्या अतिरेकी विचारसरणीचा प्रचार करण्यासाठी एक मोठे नेटवर्क देखील या तपासात उघड झालं आहे.
इसिस (ISIS), ज्याला इस्लामिक स्टेट (IS), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड द लेव्हंट (ISIL), इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सीरिया (ISIS), Daish, इस्लामिक स्टेट इन खोरासान प्रांत (ISKP), ISIS विलायत खोरासान, आणि इस्लामिक स्टेट म्हणूनही ओळखले जाते. इराक आणि शाम खोरासान (ISIS-K), सक्रियपणे भारतविरोधी अजेंडा राबवत आहे आणि हिंसक कृत्यांच्या मालिकेद्वारे देशभरात दहशत आणि हिंसाचार पसरवत आहे.