Sunday, July 14, 2024
Homeमहत्वाची बातमीAjit Pawar Vs Sharad Pawar : राजीनाम्याची नौटंकी शरद पवारांनीच केली!

Ajit Pawar Vs Sharad Pawar : राजीनाम्याची नौटंकी शरद पवारांनीच केली!

अजित पवारांनी केले तीन मोठे गौप्यस्फोट

कर्जत : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये (Rashtravadi Congress) फूट पडल्याच्या घटनेला उद्या पाच महिने पूर्ण होतील. तेव्हापासून दोन्ही गटांमधील संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालला आहे. दोन्ही बाजूंकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात येतात. सध्या राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह कोणाचं यावर निवडणूक आयोगात सुनावणी सुरु आहे. दरम्यान, आज कर्जतमध्ये कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन शिबिरात केलेल्या भाषणात अजित पवारांनी (Ajit Pawar)राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीबाबत भाष्य केलं आहे. यामध्ये त्यांनी शरद पवारांवर (Sharad Pawar) गंभीर आरोप केले आहेत. राजीनामा देणं आणि राजीनामा परत मागे घेणं हे शरद पवारांनीच घडवून आणलेलं नाटक होतं, असा खळबळजनक गौप्यस्फोट अजित पवारांनी केला आहे.

‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकाच्या नव्या आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यावेळी शरद पवारांनी भाषणाच्या शेवटी आपण पक्षाध्यक्षपदावरून पायउतार होत असल्याचं जाहीर केलं. त्यामुळे उपस्थित सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. राजीनामा मागे घेण्यासंदर्भात छगन भुजबळांपासून सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शरद पवारांना विनंती केली. यानंतर दोन दिवसांनी शरद पवारांनी राजीनामा मागे घेतल्याची घोषणा केली. यासंदर्भात अजित पवारांनी शिबिरात बोलताना एक मोठा गौप्यस्फोट केला.

अजित पवार म्हणाले, प्रफुल्ल पटेल, मी, छगन भुजबळ, सुनील तटकरे, जयंत पाटील, अनिल देशमुख, रामराजे नाईक निंबाळकर, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे असे आम्ही १० ते १२ जण देवगिरीवर बैठकीसाठी बसलो होतो. सरकारमध्ये जाण्याबाबत शरद पवारांना थेट सांगितलं तर त्यांना काय वाटेल? असा विचार होता. म्हणून आम्ही सुप्रियाला (Supriya Sule) तिथे बोलवून घेतलं. तिला काहीच सांगितलं नाही की आम्ही सगळे तिथे आहोत. तिला सांगितलं की सगळे जीवाभावाचे सहकारी आहेत. लोकशाहीत बहुमताला आदर द्यावा लागतो, तर संघटना पुढे जाते. सगळं ऐकल्यानंतर तिने सांगितलं की मला सात ते दहा दिवस द्या. मी साहेबांना राजी करते.

आम्ही १० दिवस थांबलो. तेव्हा जयंत पाटील, अनिल देशमुखही तिथे होते. पुन्हा आम्ही एकत्र बैठकीसाठी बसलो, की सरकारमध्ये जायला पाहिजे. दरम्यान, सुप्रिया सुळेंना दिलेली मुदत उलटल्यानंतर आम्ही थेट शरद पवारांकडे गेलो. त्यांनी सगळं ऐकलं. ते म्हणाले ठीक आहे. बघू आपण काय करायचं ते. नंतर आम्ही यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानला चर्चा केली. मी म्हटलं की वेळ जातोय. लवकर काय तो निर्णय घ्या, असं अजित पवार म्हणाले.

त्यानंतर १ मे रोजी मला शरद पवारांनी बोलवून सांगितलं की आता सरकारमध्ये जा. मी अध्यक्षपदाचा राजीनामा देतो. १ मे रोजी त्यांच्या नव्या पुस्तकाचं प्रकाशन होतं, पण त्या दिवशी अनेकजण महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने झेंडावंदनसाठी वेगवेगळ्या ठिकाणी गेले होते. म्हणून २ तारखेला प्रकाशनाचा कार्यक्रम झाला. त्या दिवशी इतर कुणालाही माहिती नव्हतं फक्त घरातल्या चौघांना माहिती होतं की ते राजीनामा देणार होते. तशा प्रकारे त्यांनी राजीनामा दिला. १५ लोकांची कमिटी तिथेच जाहीर केली. त्यांनी बसावं आणि अध्यक्ष निवडावा. मग सगळे आश्चर्यचकित झाले. तिथे वातावरण बदललं. ते घरी गेल्यानंतर वेगवेगळ्या लोकांनी वेगवेगळी प्रतिक्रिया दिली, असं अजित पवारांनी नमूद केलं.

आनंद परांजपे आणि जितेंद्र आव्हाडांना शरद पवारांनी बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की उद्यापासून चव्हाण प्रतिष्ठानला काही लोक, महिला व युवक पाहिजे. त्यांनी तिथे आंदोलन करून मागणी करायची की राजीनामा परत घ्या. मला हे कळलंच नाही की का? राजीनामा द्यायचा नव्हता तर नाही म्हणायचं. मग हे रोज जाऊन आंदोलनाला बसायचे. ठरावीकच टाळकी होती तिथे. जितेंद्र सोडला तर एकही आमदार नव्हता तिथे. आम्हालाही काय चाललंय हे कळेना. मला एक सांगतायत, तिथे एक सांगतायत, असा खळबळजनक दावा अजित पवारांनी यावेळी केला.

पुढे अजित पवार म्हणाले, मागे तर सर्व इतिहास मी तुम्हाला सांगून टाकला तो आता मला पुन्हा उगाळत बसायचा नाही आहे. लोक म्हणतील की किती दिवस यांचं हेच ऐकायचं. आपल्याला विकासाचं ध्येय घेऊन पुढे जायचं आहे. पण ही गोष्ट परिवारातील सदस्य म्हणून तुम्हाला माहित पाहिजे म्हणून सांगतो की, त्यानंतर शरद पवारांनी राजीनामा मागे घेतला. आम्हाला सांगितलं की सुप्रियाला माझ्यानंतर राष्ट्रीय अध्यक्ष करा. सगळ्या गोष्टी ठरल्या होत्या. सगळ्यांनी तयारी दाखवली. पण ही धरसोड वृत्ती, गाफील ठेवणं बरोबर नाही. हे मला पटत नाही हे एकदाच सांगा. तुम्ही एकदा काय ते ठरवा. एक घाव दोन तुकडे, विषय संपला, असं अजित पवार म्हणाले. त्यांच्या या गौप्यस्फोटामुळे राष्ट्रवादीतील वादाला वेगळं वळण मिळण्याची शक्यता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -