Monday, April 21, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनस्वप्नातील भारत आणि वस्तुस्थिती

स्वप्नातील भारत आणि वस्तुस्थिती

श्रीपाद टेंबे,पुणे

“एकच तारा समोर आणि पायतळी अंगार,
गर्जा जयजयकार क्रांतीचा गर्जा जयजयकार”

कवी कुसुमाग्रज यांनी केलेल्या या आवाहनाचे सार्थक होण्यास १५ ऑगस्ट १९४७ चा दिवस उजाडला. स्वातंत्र्याची रम्य प्रभात झाली. असंख्य बलिदानांचे सार्थक झाले. बघता बघता स्वातंत्र्याचा प्रवास ७५ झाला. एखाद्या राष्ट्राच्या जीवनात ७५ वर्षांचा कालखंड हा जरी फार मोठा टप्पा नसला तरी, राष्ट्रातील नागरिकांच्या जीवनात स्वातंत्र्याची ७५ वर्षे पूर्ण करणे अनन्यसाधारण महत्त्वाचे आहे.

स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवात आपली स्वातंत्र्याविषयी कोणती स्वप्ने होती? स्वातंत्र्याकडून आपल्या कोणत्या अपेक्षा होत्या? आज परिस्थिती काय आहे? कुठे होतो आपण आणि आता कुठे आहोत? उणिवा काय राहिल्या आणि आता भविष्यात कशी पावले उचलावी लागतील? याचा विचार प्रत्येकाने करणे गरजेचं आहे. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवात आपण काय कमावलं आणि गमावलं? याचे सिंहावलोकन करण्याच्या टप्प्यावर आपण येऊन पोहोचलो आहोत. भारत हा नैसर्गिक साधनसंपत्ती आणि खनिज समृद्ध देश आहे. माथी हिमालय उभा आहे. पायी सागराच्या लाटा लोळण घेत आहेत. देशातून गंगा, गोदावरी, ब्रह्मपुत्रासारख्या रक्तवाहिन्या वाहत आहेत. आपला देश फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आकाशी भरारी घेतो आहे. सैनिक आणि जवान डोळ्यांत तेल घालून देशाची सीमा रक्षण करीत आहे. किसान लोकराजा बनला आहे. आपल्या देशाला निसर्गाचे वरदान असलेली समृद्ध पर्यटन स्थळे लाभली आहेत. एकूणच काय आपला भारत देश ‘सुजलाम सुफलाम’ आहे.

आपल्या देशाला पौराणिक, ऐतिहासिक संस्कृतीचा वारसा लाभलेला आहे. अनेक जाती, धर्माचे, भाषांचे लोक गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत. संतज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत एकनाथ, संत कबीर यांच्यासारख्या थोर संतांची भूमी असलेल्या आपल्या देशाची संस्कृती आज जागतिक पातळीवर सर्वश्रेष्ठ संस्कृती मानली जाते. आपला देश एकाच वेळी अध्यात्मात आणि विज्ञानात देखील तितकाच अग्रेसर आहे. खेळांच्या विविध प्रकारात भारताने जागतिक दर्जाची कामगिरी केली आहे. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवात साहित्य, कला, क्रीडा, संस्कृती या क्षेत्रांमध्ये नामवंत लेखक, साहित्यिक आणि कलावंतांनी आपला अमित ठसा उमटवला आहे. पण असे असले तरी एकीकडे प्रगती होत आहे, तर दुसरीकडे अनेक गोष्टी आपल्याला वेदना देत आहेत, देशाच्या स्वातंत्र्यासाठी आणि सीमेच्या रक्षणासाठी अनेक शूरविरांनी ऐन तारुण्यात बलिदान दिले आहे. आपले संपूर्ण आयुष्य स्वातंत्र्यासाठी खर्च केले, घरादाराची काळजी न करता देशासाठी आपल्या रक्ताचा सडा सांडला. पण दुर्दैवाने म्हणा आम्ही मात्र रक्ताचा घाऊक बाजार मांडला.

आज चीन, पाकिस्तानसारख्या परकीय शक्ती सीमेवर आक्रमणाची कायम तलवार हातात घेऊन तयार असतात. देशात आज कायम दहशतवादी हल्ले चालूच असतात. जगातील सगळ्या मोठ्या लोकशाही असलेल्या कृषिप्रधान देशातल्या बळीराजाला आपल्या हक्कांसाठी सतत आंदोलन करावे लागत आहे. अनेक गरिबांना आज एक वेळ जेवण देखील मिळत नाही. स्वर्गासारख्या पृथ्वीवरील नंदनवन म्हणवल्या जाणाऱ्या काश्मीरमध्ये केशर आणि गुलाबाच्या फुलाच्या सड्याच्या ऐवजी रक्ताळलेल्या आठवणी नक्कीच सुखद नाहीत. धर्माच्या नावावरून जातीय दंगली अजूनही होत आहेत. अमूल्य अशा मिळालेल्या स्वातंत्र्याच्या अशी दुर्दशा बघवत नाही. या सगळ्या घटनामुळे भारत मातेच्या हृदयाचे शेकडो तुकडे होतात. एकाच आईची लेकरं एकमेकांच्या रक्तासाठी तहानलेली असतील, तर त्या आईची काय अवस्था होत असेल? एक मात्र नक्की या सगळ्या गोष्टीमध्ये, आक्रमणामध्ये सामान्य माणूस भरडला जात आहे याची कोणत्याच शासनकर्त्याला चिंताच नाही. जळणारी झोपडी आणि करपणारे रक्त मात्र भारतीयाचं आहे, हे आपण का विसरतो? हा खरा प्रश्न आहे. भ्रष्टाचारी यंत्रणेमुळे देशाची अर्थव्यवस्था पोखरली गेली आहे.

नेते, मोठे अधिकारी यांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक होते. ज्यांच्या हाती आपण देशाची प्रशासन व्यवस्था सोपवली आहे, तेच भ्रष्टाचाराने बरबटलेले बघून अतिशय वेदना होतात. तुरुंगात राहून अनेक नामचीन गुन्हेगार निवडणुका जिंकतात, दरवर्षी मोठमोठे आर्थिक घोटाळे उघडकीस येतात. सामान्य माणसाची चटणी, भाकर हडपणारी मंडळी या देशाचे मारेकरी बनले आहेत, असं खेदाने नमूद करावसं वाटते. सत्यमेव जयते हे ब्रीदवाक्य आपल्या देशाची शान आहे. कधी काळी देशासाठी फासावर चढणारे तरुण बघितले, तर आजच्या तरुण पिढीकडे हस्तांतरित करण्यात आलेल्या स्वातंत्र्याचा अर्थ त्यांना कधी कळेल का? असा प्रश्न पडतो. स्वातंत्र्याच्या सुवर्णमहोत्सवात आपल्याला एक गोष्ट मान्य करावीच लागेल की, भारतीय स्वातंत्र्याने आपल्याला खूप काही दिले; परंतु जो असमाधानाचा, असंतोषाचा सूर निघत आहे त्याला आपणच जबाबदार आहोत. आपली आर्थिक, सांस्कृतिक, ओद्योगिक, वैज्ञानिक प्रगती झाली, पण मूल्यांचा ऱ्हास होत गेला आहे. म्हणूनच एकीकडे आपण वैज्ञानिक प्रगतीच्या मार्गानं झपाट्याने परिवर्तन करत आहोत; परंतु त्याच वेळी दुसऱ्या बाजूने वाढणाऱ्या भौतिक आणि अभौतिक समस्यांचा दुष्ट विळख्यात आपण अलगद अडकल्याने स्वातंत्र्याचा श्वास नक्कीच गुदमरतो आहे…….

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -