Tuesday, October 8, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलPoems and Riddles : ऊर्जावान ऋतू कविता आणि काव्यकोडी

Poems and Riddles : ऊर्जावान ऋतू कविता आणि काव्यकोडी

कविता : एकनाथ आव्हाड 

हुडहुडी भरते
दात लागे वाजू
मऊमऊ दुलईत
रात्रभर निजू…

हळूहळू थंडीला
चढतो जोर
ऊबदार बंडीत
लहान-थोर…

शेकोटी मग
खासच पेटते
हिवाळा आल्याचे
सांगत सुटते…

पाना-फुलांवर
दव हे पडते
धुक्यात आपली
वाटही अडते…

रात्र होते मोठी
दिवस लहान
दर्शन द्यायला
सूर्य घेतो मान…

निसर्ग सारा
येतो खुलून
आकाश भेटते
रूप बदलून…

आल्हाददायक
उत्साही वारा
ऊर्जावान ऋतू
हाच आहे खरा

काव्यकोडी : एकनाथ आव्हाड

 

१) तब्येतीचा पाढा
वाचत असतात
प्रश्नावर प्रश्न
विचारीत बसतात

छातीचे ठोके
मोजतं कोण?
टुचूक करून
टोचतं कोण?

२) संत तुकोबांना ते
मानी आपला गुरू
देवकीनंदन गोपालाने
कीर्तन करी सुरू

बालपणचे डेबुजी
आधुनिक संत झाले
स्वच्छतेचे शिक्षण कोणी
समाजाला दिले?

३) सुरुवातीला येतात
ते पडून जातात
नंतर जे येतात
ते कायमचे राहतात

बत्तीस जणं कसे
राहतात मिळून
वय वाढलं की कोण
जातात गळून?

उत्तरे :- 

१) डॉक्टर 

२) गाडगेबाबा 

३) दात 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -