नवी दिल्ली : दिवाळीच्या सणामध्ये शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी (Good news) असून पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा (PM Kisan Yojana) १५ हफ्ता मिळण्यासाठीची प्रतीक्षा आता संपली आहे. लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेच्या पंधराव्या हफ्त्याची रक्कम जमा होणार आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधीचा पंधरावा हफ्ता दिवाळीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले जात होते. आता दिवाळी संपल्यानंतर शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार आहे. त्यामुळे देशभरातील शेतकरी आपल्या खात्यात पैसे जमा होण्याची आतुरतेने वाट पाहत आहेत. किसान सन्मान निधी योजनेचा लाभ घेण्यासाठी ई-केवायसी करणे अनिवार्य आहे. शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना) सुरू केली होती. यामुळे देशभरातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये
केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेला सुरुवात केली. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये मिळतात. आतापर्यंत १४ हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात आले आहेत. pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करून शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकतात. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा १५ वा हप्ता १५ नोव्हेंबर २०२३ला देशभरातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचणार आहे. जर तुम्हीही पीएम किसानच्या १५ व्या हफ्त्याची वाट पाहत असाल, तर लाभार्थी यादीत तुमचे नाव एकदा नक्की तपासा, असे आवाहन करण्यात आले आहे.