Saturday, May 10, 2025

ताज्या घडामोडीनाशिक

Maharashtra Banda : जरांगेंकडून महाराष्ट्र बंदची कोणतीही हाक नाही; चुकीच्या पोस्टवर विश्वास ठेवू नये

Maharashtra Banda : जरांगेंकडून महाराष्ट्र बंदची कोणतीही हाक नाही; चुकीच्या पोस्टवर विश्वास ठेवू नये

नाशिक शहर जिल्हा सकल मराठा समाजाचे आवाहन


नाशिक : मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी महाराष्ट्र बंदची (Maharashtra Banda) कोणतीही हाक दिलेली नाही. त्यामुळे समाज माध्यमांवर व्हायरल (Social Media viral) होत असलेल्या अशा पोस्टवर कुणीही विश्वास ठेवू नये, असं आवाहन नाशिकच्या (Nashik) सकल मराठा समाजातर्फे (Sakal Maratha Samaj) करण्यात येत आहे.


काही मराठा आंदोलकांतर्फे (Maratha Andolak) महाराष्ट्र बंदबाबत उत्स्फूर्तपणे अशा पोस्ट फिरविल्या जात आहेत. परंतु त्यात काही तथ्य नाही. सध्या महाराष्ट्रभर सुरू असलेले आंदोलन मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने आणि शांततापूर्ण मार्गाने चालू आहे. सध्या फक्त जरांगे पाटील हेच मराठा समाजाचे नेते आहेत आणि त्यांनी महाराष्ट्र बंदची कोणतीही हाक दिली नसल्याचेही सकल मराठा समाजाच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.


सध्या शाळा आणि महाविद्यालयांच्या परीक्षा सुरू आहेत. त्यामुळे नाशिक बंदबाबत व्हायरल होत असलेल्या पोस्टमुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन द्विधा मनस्थितीत आहेत. त्यामुळे उत्साहाच्या भरात अशा पोस्ट कुणीही व्हायरल करू नये, अशी मराठा बांधवांना हात जोडून विनंती आहे. तसेच नाशिक शहर व जिल्हा सकल मराठा समाजातर्फे कोणताही बंद घोषित करण्यात आलेला नाही याची सर्वांनी दखल घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.



हिंसक घटनांना थारा नको


आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाने राज्यभर शांततापूर्ण मोर्चे काढून संपूर्ण जगाचे लक्ष वेधून घेतले. या मोर्चांची दखल सर्वांनीच घेतली होती. आता आपल्या लढ्याचे यश अंतिम टप्प्यात आहे. मराठा समाजास आरक्षण मिळावे म्हणून संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील जिवाची पर्वा न करता आंदोलन करीत आहेत. मराठा बांधवांनी जाळपोळ किंवा कोणत्याही हिंसक बाबींचा अवलंब टाळावा, असं कळकळीचं आवाहन जरांगेंनी केलं आहे. त्यामुळे त्यांच्या विनंतीला मान देऊन आपलं आंदोलन भरकटणार नाही आणि त्याला हिंसेचं गालबोट लागणार नाही याची सर्वांनी काळजी घेणं गरजेचं आहे.


सध्या घरोघरी दिवाळीच्या सणाची जोरदार तयारी सुरू आहे. शाळा आणि महाविद्यालयांच्या परीक्षासुद्धा सुरू आहेत. त्यामुळे आंदोलनाची झळ सामान्य नागरिक, व्यापारी व विद्यार्थ्यांना बसणार नाही याची मराठा बांधवांनी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे जरांगे पाटलाच्या विनंतीस मान देऊन सर्वांनीच जाळपोळ, दगडफेकीसारखे कृत्य टाळावे आणि शांततापूर्ण मार्गाने आंदोलन करावे अशी सर्वांना कळकळीची विनंती मराठा क्रांती मोर्चाने केली आहे.

Comments
Add Comment