१५ दिवस तमाशा न करण्याचा निर्णय
अहमदनगर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) करत असलेल्या उपोषणाला राज्यभरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. ठिकठिकाणी साखळी आणि आमरण उपोषण करून मनोज जरांगे यांना पाठिंबा दिला जातो आहे. तर अनेक ठिकाणी बंद पाळून या उपोषणाला समर्थन दर्शवण्यात आले. अहमदनगर जिल्ह्यातून इंदुरीकर महाराजांनी मराठा आंदोलनात सहभाग घेतला, तर त्यानंतर अहमदनगरमधील तमाशा कलावंतांनीही आंदोलनात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे हे कलावंत १५ दिवस तमाशा करणार नाहीत.
तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला असून १५ दिवस तमाशा न करण्याचा निर्णय घेतला आहे. दरवर्षी साधारणत: दसरा संपल्यानंतर तमाशाच्या फडाचे राज्यभर दौरे सुरु होतात. मात्र, यावर्षी राज्यभर मराठा आंदोलन चांगलंच पेटून उठलं आहे. त्यामुळे सरकारने आरक्षणाचा निर्णय घेण्याची मागणी रघुवीर खेडकर यांनी केली आहे.
यासोबतच मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला आहे. सर्व व्यवहार बंद ठेवत अकोलेकरांनी मराठा आरक्षणाला पाठिंबा दर्शवला आहे.