- नॉस्टॅल्जिया : श्रीनिवास बेलसरे
दिवार (१९७५), शोले (१९७५) जंजीर (१९७३) या सिनेमांनी बनवलेल्या अमिताभच्या ‘अँग्री यंग मॅन’ या प्रतिमेच्या पार्श्वभूमीवर जेव्हा यश चोप्रांनी ‘कभी कभी’मधील रोमँटिक कवीच्या भूमिकेसाठी अमिताभला निवडले तेव्हा व्यावसायिक यशाबद्दल अनेकांना खात्री नव्हती. पण सिनेमा जोरात चालला. त्याने चोप्राजींना उत्तम यश मिळवून दिले. अमिताभबरोबरचे इतर कलाकारही दिग्गज होते – वहिदा रहमान, शशी कपूर, परीक्षित सहानी, राखी, सिम्मी गरेवाल, इफ्तेकार, नीतू सिंग, देवेन वर्मा आणि ऋषी कपूर. सिनेमाचे एक वैशिष्ट्य म्हणजे वेशभूषेची जबाबदारी शशी कपूरची पत्नी जेनिफर कपूर यांनी रागी सिंग यांच्याबरोबर सांभाळली.
‘कभी कभी’ने २४व्या फिल्मफेयर समारंभात सर्वोत्तम संगीताचे (खैयाम), सर्वोत्तम गीतलेखनाचे (साहीर लुधियानवी), सर्वोत्कृष्ट गायनाचे (मुकेश) आणि सर्वोत्कृष्ट संवाद लेखनाचे (सागर सरहदी) अशी एकूण ४ पारितोषिके पटकावली.
साहीर हा मुळातच मनस्वी माणूस. त्यामुळे ‘कभी कभी’मधली काही गाणी ही सिनेगीतापेक्षा उत्तम शायरी या वर्गात मोडतात.
कॉलेजच्या समारंभात अमिताभ त्याची एक कविता वाचतो आणि राखी त्याच्या प्रेमात पडते. एकीकडे त्यांचे प्रेम फुलत असतानाचा राखीचे आई-वडील तिचे लग्न परस्पर ठरवून टाकतात. दोघे मनस्वी प्रेमिक आई-वडिलांच्या इच्छेसाठी आपल्या प्रेमाची आहुती द्यायचे ठरवतात. राखीचे लग्न विजय खन्नाशी (शशी कपूर) होते, तर अमितचे लग्न अंजलीशी (वहिदा) होते. निरोप घेताना राखीने अमिताभला त्याने कविता लिहिणे सुरू ठेवावे, अशी अट घातलेली असते. मात्र निराश झालेला तो पुढे लिहू शकत नाही. ‘कभी कधी’च्या लेखकाने या अशा प्रेमाची बाजी हरलेल्या प्रेमिकांच्या पुढच्या पिढीची प्रेमकथा त्यांच्या असफल कथेतच गुंतवली होती.
अमिताभने कॉलेजात म्हटलेली कविता मोठी सुंदर होती. खैयाम यांनी तिच्यातल्या मूडला साजेसे संगीत देवून तिच्यातली उदासी प्रेक्षकांच्या मनाला भिडवली. गाण्याच्या सुरुवातीचा शेर गाणे ऐकताना मिळत नाही. त्या ओळीत आपल्याला साहिरच्या चिंतनशील, सात्त्विक मनाची ओळख होते. त्याने लिहिले होते –
‘कल नयी कोपले फुटेगी,
कल नये फूल मुस्कायेंगे,
और नयी घासके फर्शपर,
नये पाव इठलायेंगे,
वो मेरे बीच नहीं आये,
मै उनके बीचमे क्यो आऊ?
उनकी सुबहो और शामोका,
मै एक भी लम्हा क्यो पाऊ?
मैं पल दो पलका शायर हूं,
पल दो पल मेरी कहानी हैं,
पल दो पल मेरी हस्ती हैं,
पल दो पल मेरी जवानी हैं…’
किती हळवी भावना! कवी म्हणतो, उद्या झाडांवर नवे कोंब येतील, नवी फुले उमलतील. त्यावेळी हिरव्यागार गवताच्या पात्यांनी भूमी व्यापली जाईल. तिच्यावरून कुणातरी नव्या व्यक्तीची पावले मोठ्या ऐटीत चालत जातील. मी तर तेव्हा नसेन! ते सगळे माझ्या जीवनात असणार नाही. मग मी त्यांचा विचार का करू?
कलाकाराची अभिलाषा मुळात अमरत्वाची असते. त्याला इतक्या सुंदर जगाला सोडून जाण्याची कल्पना इतरांपेक्षा जास्त दु:ख देते. कारण जीवनातले सौंदर्य त्याने जास्त उत्कटपणे अनुभवलेले असते. रफीसाहेबांच्या आवाजातले मेला(१९४८)मधील-
‘ये जिंदगीके मेले,
ये जिंदगीके मेले,
दुनियामे कम ना होंगे,
अफसोस हम ना होंगे’
हे शकील बदायुनी यांचे गाणे आठवा. कवीला वर्तमानाबरोबर पुढचेही दिसत असते. ‘जो न देखे रवी वो देखे कवी’! कवी उद्याचे जग मनातल्या मनात पाहत असतो पण आपण त्यात नसणार ही कल्पना त्याला अस्वस्थ करते. तो म्हणतो त्या उद्याच्या जगातील सुखदु:खाचा वाटा मला थोडाच मिळणार आहे? मी तर या क्षणातील माझ्या सुखदु:खाची नोंद करणारा एक नगण्य कवी! माझी कहाणी किती क्षणभंगुर! या जीवनाची मर्यादा बस काही क्षणांचीच आणि तेवढेच क्षणिक माझ्या आनंदाचे सोहळे! माझ्या आधीही किती मोठमोठे कलाकार होऊन गेले. कुणी जीवनाच्या शोकांतिकेची गीते गाऊन सत्य सांगितले, तर कुणी गाणी गावून जीवनाची आनंदी बाजू मांडली. पण शेवटी त्यांचे जीवनही एक क्षणिक कथाच ठरली ना? मग मीही या जगातून जाणार आहे. आज तुझ्या सहवासाच्या आनंदात असलो तरी उद्या निरोप घ्यावाच लागणार!
मुझसे पहले कितने शायर आए
और आकर चले गए
कुछ आहें भरकर लौट गए
कुछ नग़्मे गाकर चले गए
वो भी इक पलका क़िस्सा थे,
मैं भी इक पलका क़िस्सा हूं,
कल तुमसे जुदा हो जाऊंगा,
गो आज तुम्हारा हिस्सा हूं…
मग कवी स्वत:चे सांत्वन करतो. तो म्हणतो कलाकाराच्या जीवनात एवढे सुख पुरेसे मानावे की, त्याला काहीतरी सांगता आले. ‘तू माझे ऐकून घेतलेस हा तुझा चांगुलपणाच माझ्यासाठी खूप आहे.’
उद्या मधुर गीतांच्या सुगंधी कळ्या ओंजळीत भरून आणणारे अनेक येतील. त्यांचे शब्द कदाचित माझ्यापेक्षाही जास्त सुंदर असतील. कदाचित तुझ्यापेक्षाही जास्त तन्मयतेने ऐकणारे श्रोते त्यांना लाभतील!
पल दो पलमें कुछ कह पाया, इतनीही सआ’दत काफ़ी है,
पल दो पल तुमने मुझको सुना इतनीही इनायत काफ़ी है.
कल और आएंगे नग़्मोंकी खिलती कलियां चुननेवाले…
मुझसे बेहतर कहनेवाले तुमसे बेहतर सुननेवाले.
प्रत्येक पिढी धरणीने वाढवलेल्या पिकासारखी असते. आज उगवते, तर उद्या निर्दय काळ तिची कापणी करतो. जीवनातले क्षण सुवर्णमुद्रेसारखे दुर्मीळ असतात. प्रत्येकाला ते कमीच पडतात.
हर नस्ल इक फ़स्ल हैं धरतीकी,
आज उगती हैं कल कटती हैं.
जीवन वो महंगी मुद्रा हैं,
जो क़तरा क़तरा बटती हैं…
वियोगाच्या भयाने तो म्हणतो ‘मी समुद्रात उठलेली एक लाट तर आहे. माझा शेवट पुन्हा त्या अथांगतेत विरून जाणे इतकाच! मी जणू मातीत जन्मलेले एक स्वप्न होतो. माझा अंत मातीतच होणार ना? मी शेवटी भूमीच्या पोटात, कबरेत जाऊनच निजणार.’ उद्या माझी आठवण कुणी कशाला काढावी? जगण्याच्या धडपडीत अडकलेल्या लोकांनी माझ्यासाठी वेळ व्यर्थ का घालवावा?
सागरसे उभरी लहर हूं मैं,
सागरमें फिर खो जाऊंगा,
मिट्टीकी रूहका सपना हूं,
मिट्टीमें फिर सो जाऊंगा,
कल कोई मुझको याद करे,
क्यूं कोई मुझको याद करे?
मसरूफ़ ज़माना मेरे लिए,
क्यूं वक़्त अपना बरबाद करे?
गाणे संपताना आपल्याला वाटते साहीरसाहेबांच्या कबरीपाशी जावून एकदा ओरडून सांगावे, ‘अहो साहीरसाहेब, इतकी निर्वाणीची भाषा आताच कशाला? कयामतला अजून खूप वेळ आहे. तोवर आम्ही नाही विसरणार तुम्हाला! जोवर हिंदी सिनेमा आहे, बॉलिवूड आहे तोवर तुमची आठवण सदैव ताजीच राहणार!