कोमाघट्टा : वाघांच्या नखांना बाजारात मोठी मागणी आहे. या नखांमुळे धनलाभ होते असे म्हणतात. हे कितपत सत्य आहे माहिती नाही. मात्र, याच नखांसाठी आजवर वाघांची शिकार केल्यामुळे देशात वाघांची संख्या कमी झाली होती. यावर नियंत्रण मिळविण्यासाठी कायदा अंमलात आणण्यात आला आहे. वन्यजीवाचे अवयव बाळगणे हा गुन्हा आहे. १९७२ पासून हा वन्य जीव संरक्षण कायदा लागू आहे. तरीही शिकार होतच आहे. बिग बॉस कन्नडा मध्ये सहभागी असलेला स्पर्धक वरथूर संतोषला वाघाच्या पंजाचे लॉकेट घातल्याप्रकरणी बिग बॉसच्या घरामधूनच अटक करण्यात आल्याने वाघनखांचे प्रकरण पुन्हा चर्चेत आले आहे.
वाघाची नखे वापरणे कायद्याच्या विरोधात आहे. वाघाचे पंजे कोणी विकू किंवा विकत घेऊ शकत नाही. शो दरम्यान वरथूरने एक लॉकेट घातले होते. जे कॅमेऱ्यात कैद झाले. हे लॉकेट वाघाची नखं आणि पंजाचा वापर करुन तयार करण्यात आल्याचे लक्षात येताच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.
वनविभाग अधिकारी काल (२२ ऑक्टोबर) संध्याकाळी उशिरा बिग बॉसच्या घरात पोहोचले. पुढे त्यांनी बाहेरुनच वरथूरने घातलेल्या सोन्याच्या लॉकेटची तपासणी केली. तपासणीनंतर अधिकाऱ्यांना ते अस्सल वाघाचे पंजे असल्याचे आढळले. त्यानंतर त्यांनी बिग बॉसच्या आयोजकांना स्पर्धक वरथूरला त्यांच्याकडे सोपवण्यास सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी वरथूरला ताब्यात घेतले.
संतोषला अटक करताना डीसीएफ उपवनसंरक्षक रवींद्र कुमार यांनी सांगितले की, "त्याने वाघाचे पंजे घातलेले दिसल्यानंतर सार्वजनिक तक्रार दाखल झाली. तक्रारीनंतर आम्ही कोमाघट्टाजवळील बिग बॉस स्टुडिओमध्ये त्याची पाहणी करण्यासाठी गेलो. काही वेळ आढेवेढे घेतल्यानंतर वरथूरने आम्हाला लॉकेट देण्याचे मान्य केले."
रवींद्र कुमार यांनी पुढे सांगितले, "मी योग्य प्रक्रियेद्वारे सोनेरी लॉकेटची तपासणी केली. जेणेकरून तो खरा वाघाचा पंजा आहे की नाही हे आम्हाला कळू शकले. आम्ही पुढे बिग बॉसच्या अधिकाऱ्यांना त्याला आमच्यासमोर हजर करण्याचे निर्देश दिले. मी त्याच्याकडे चौकशी केली आणि त्याने कबूल केले. तीन वर्षांपूर्वी होसूर येथे त्याने हे लॉकेट खरेदी केले होते. कॅमेऱ्यासमोर मान्य केल्यानंतर आम्ही त्याला रात्री साडेआठच्या सुमारास अटक केली. या प्रकरणात वरथूर याला तीन ते सात वर्षांची शिक्षा होऊ शकते, असे एका अधिकाऱ्यांनी सांगितले.