
- अर्थनगरीतून... : महेश देशपांडे, आर्थिक घडामोडींचे अभ्यासक.
आदरातिथ्य उद्योगात ७० हजार नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याची बातमी अलीकडेच चर्चेत आली. त्यापाठोपाठ लॅपटॉप आयातीवरची बंदी मागे घेतली गेल्याने आयटी उद्योगाला दिलासा मिळाला. त्याच वेळी सणांच्या काळात सेकंदाला चार लाख रुपयांची उलाढाल होत असल्याची आकडेवारी चकीत करुन गेली. मात्र याच सुमारास वाढत्या महागाईमुळे घर चालवणे कठीण होत असल्याचे अनेक सामान्यजनांचे मत कोड्यात पाडून गेले.
उद्योगविश्वाला मिळत असलेल्या ग्राहकांच्या प्रतिसादाची बातमी हल्ली वारंवार ऐकायला मिळते. अनेक उद्योगांना ग्राहकांचा प्रतिसाद मिळाल्याने व्यावसायिक बरकतही अनुभवायला मिळते. अलीकडेच आदरातिथ्य उद्योगात ७० हजार नोकऱ्या उपलब्ध होणार असल्याची बातमी पसरली. त्या पाठोपाठ लॅपटॉप आयातीवरची बंदी मागे झाल्याने आयटी उद्योगाला दिलासा मिळाला. याच सुमारास सणासुदीच्या काळात सेकंदाला चार लाख रुपयांची उलाढाल होत असल्याची आकडेवारी चकीत करुन गेली. मात्र याच पार्श्वभूमीवर वाढत्या महागाईमुळे घर चालवणे कठीण होत असल्याचे अनेक सामान्यजनांचे मत कोड्यात पाडणारे ठरले. या बातमीकडेही धोरणकर्त्यांचे लक्ष जायला हवे.
कोरोना संकटाचा सर्वच क्षेत्रांना फटका बसला. तसेच रशिया-युक्रेन युद्धाचाही अनेक देशांवर परिणाम झाला. अनेक देशांमध्ये मंदी आली. अशातच आता इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातील युद्धाने नवे संकट निर्माण केले. गेल्या काही वर्षांमध्ये आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कपात झाली. कोरोनानंतर पर्यटनक्षेत्र वेगाने वाढले आहे. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी असून येत्या काळात मोठ्या प्रमाणात नोकऱ्या उपलब्ध होण्याची शक्यता आहे. कोरोना महामारीनंतर पर्यटनक्षेत्र तेजीत आहे. भारतातील प्रवास, पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योगातून पुढील काही महिन्यांमध्ये रोजगाराच्या हजारो संधी उपलब्ध होणार आहेत. येत्या महिनाभरात या क्षेत्रात ७० ते ८० हजार नोकऱ्या निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या सणासुदीच्या काळात प्रवासात वाढ झाल्यामुळे आणि कोरोनानंतर प्रवासी क्षेत्र गजबजले असल्याने रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. ‘टीमलीज’या स्टाफिंग कंपनीच्या मते सणासुदीच्या काळात प्रवासाची मागणी झपाट्याने वाढली आहे. यासोबतच क्रिकेट वर्ल्ड कपमुळे चाहते पर्यटक मोठ्या प्रमाणात प्रवास करत आहेत. भारतातील विविध शहरांमध्ये आयसीसी विश्वचषक स्पर्धा सुरू आहे. देशातील प्रमुख दहा शहरांमध्ये आयोजित केलेल्या या स्पर्धेमुळे पर्यटन क्षेत्राला चालना मिळाली आहे.
कोरोनानंतरचे हे पहिलेच असे वर्ष आहे, ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात हॉटेल बुकिंग होत आहे. येत्या सणासुदीच्या काळात ही मागणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. आयटीसी समर्थित फॉर्च्युन हॉटेल्स, लेमन ट्री हॉटेल्स आणि इतर अनेक मोठ्या आणि मध्यम आकाराच्या हॉटेल्सची मागणी पूर्ण करण्यासाठी लहान आणि नॉन-ब्रँडेड हॉटेल्स आपल्या ताफ्यात जोडून घेत आहेत. हॉस्पिटॅलिटी मॅनेजर, इव्हेंट प्लॅनर आणि को-ऑर्डिनेटर, रेस्टॉरंट स्टाफ, लॉजिस्टिक मॅनेजर आणि ड्रायव्हर्स यासारख्या पदांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. प्रवास, पर्यटन आणि आदरातिथ्य उद्योगात नोकरीसाठी मोठा वाव पाहायला मिळत आहे.
दरम्यान, केंद्र सरकारने लॅपटॉप, टॅब्लेट आदी गॅझेटच्या आयातबंदीचा निर्णय मागे घेतला आहे. भारत लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालणार नाही, असे वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी म्हटले आहे. ऑगस्ट महिन्यात भारताने लॅपटॉपच्या आयातीवर बंदी घालण्याची घोषणा केली होती. केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर मोठ्या प्रमाणावर टीका झाली होती. ‘जिओ’च्या नव्याने आकाराला येत असलेल्या लॅपटॉप उद्योगाला पाठबळ देण्यासाठी सरकारकडून हे केले जात असल्याबद्दल जोरदार टीका झाली. भारतातील लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या आयातीवर कोणतीही बंदी असणार नाही, असे बर्थवाल यांनी स्पष्ट केले. याआधी सरकारने सांगितले होते की लॅपटॉप, टॅब्लेट आणि कॉम्प्युटरची आयात एक नोव्हेंबरपासून परवाना प्रणाली अंतर्गत ठेवली जाईल. ऑगस्टमध्ये सरकारने लॅपटॉप, कॉम्प्युटर, टॅब्लेट, संगणक आणि काही डेटा प्रोसेसिंग मशिन्सच्या आयातीवर बंदी घातली होती. जेणेकरून, देशातंर्गत उत्पादनाला चालना मिळावी आणि चीनसारख्या देशांमधून होणारी आयात कमी व्हावी. सरकारच्या या आदेशानंतर आयटी हार्डवेअरशी संबंधित उद्योगांनी चिंता व्यक्त करत हा आदेश मागे घेण्याचे आवाहन केले होते. भारत दर वर्षी हार्डवेअरशी संबंधित सुमारे सात ते आठ अब्ज डॉलर्सच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आयात करतो. सरकारने निर्बंध घातलेल्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंपैकी आयात केलेल्या वस्तूंचा वापर केवळ नमूद केलेल्या उद्देशांसाठीच केला जाईल. या अटीसह आयात करण्यास परवानगी दिली जाईल, असे शासनातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.
एव्हाना देशात सणांचा हंगाम सुरु झाला आहे. या वर्षीचा हंगाम रक्षाबंधनाने सुरू झाला. सणांचा हा उत्साह २३ नोव्हेंबर म्हणजे तुळशी विवाहापर्यंत सुरू राहणार आहे. या काळात नवरात्री, दसरा, दुर्गा पूजा, करवा चौथ, धनत्रयोदशी, दिवाळी, छठपूजा आणि शेवटी तुळशी विवाह असे अनेक महत्त्वाचे सण साजरे केले जाणार आहेत. या सणांच्या काळात प्रत्येक सेकंदाला चार लाखांची उलाढाल होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या सणासुदीच्या काळात बाजारपेठेत आणि खरेदीदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कोरोनाच्या संकटानंतर हे असे पहिलेच वर्ष आहे, ज्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या आजाराची भीती नाही. या कारणामुळे चालू सणासुदीच्या ८५ दिवसांमध्ये प्रत्येक सेकंदाला चार लाख रुपयांचा म्हणजेच एकूण तीन लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होऊ शकतो. गेल्या वर्षी सणासुदीच्या काळात अडीच लाख कोटी रुपयांचा व्यवसाय झाला होता. ‘कान्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने याबाबतचा अंदाज वर्तवला आहे. ‘सीएआयटी’चे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया यांनी सांगितले, की या वर्षी सणांचा हंगाम रक्षाबंधनाने सुरू झाला आहे. हा सणांचा उत्साह २३ नोव्हेंबर म्हणजे तुलसी विवाहाच्या दिवसापर्यंत सुरू राहील. या काळात नवरात्री, दसरा, दुर्गापूजा, करवा चौथ, धनत्रयोदशी, दिवाळी, भाईदूज, छठपूजा आणि शेवटी तुळशीविवाह असे अनेक महत्त्वाचे सण साजरे केले जातील. भारतीय ग्राहक या सणासुदीच्या हंगामात अंदाजे तीन लाख कोटी रुपये खर्च करण्याची शक्यता ‘कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने वर्तवली आहे. हा व्यवसाय दर तासाला १४७ कोटी रुपयांहून अधिक असल्याचा अंदाज आहे.
एकिकडे हे जल्लोशपर्व अनुभवायला मिळत असताना दुसरीकडे देशात वाढलेल्या महागाईचा फटका सर्वांनाच बसत आहे. वाढत्या महागाईमुळे कर्मचारी हैराण झाले आहेत. अनेक कर्मचाऱ्यांना तर घर चालवणेही कठीण होत आहे. अल्प कमाईमुळे अनेकांना नोकरी करावी असे वाटत नाही. एका सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. प्रत्येक चारपैकी एका कर्मचार्याला काम करावेसे वाट नसल्याची माहिती सर्वेक्षणातून समोर आली आहे. २६ टक्के कर्मचाऱ्यांना नोकरी करावी असे वाटत नाही. महागाईमुळे लोकांना नोकरी सोडावी लागत आहे. कारण कर्मचारीवर्गाला मिळत असलेल्या पगारात घर चालवणे कठीण झाले आहे. नोकरी सोडून उदरनिर्वाहासाठी दुसरे काही काम करावे, असे यापैकी अनेकांना वाटत आहे. जगभरातील ५३ हजार ९१२ कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण केल्यानंतर हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. अहवालानुसार, कर्मचाऱ्यांचा असा विश्वास आहे की ते काम करत असलेल्या पगारात घरखर्च भागवणे खूप कठीण होत आहे. ते ईएमआयदेखील भरण्यास सक्षम नाहीत. या कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी आयुष्यभर कष्टाचे पैसे खर्च करावे लागतात. यामुळेच लोक नोकरी सोडण्याचा विचार करत आहेत.
या कर्मचाऱ्यांना काम करण्याऐवजी आता स्वत:चे काही काम सुरू करायचे आहे. बहुतांश कर्मचाऱ्यांचा स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याकडे कल आहे. अहवालानुसार, ब्रिटनमधील ४७ टक्के कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की महिन्याच्या शेवटी त्यांचा संपूर्ण पगार खर्च होतो. त्यांच्याकडे बचत करण्यासाठी काहीच उरत नाही. १५ टक्के कर्मचाऱ्यांचा विश्वास आहे की ते काम करत असलेल्या पगारासह घरातील सर्व बिले अदा करू शकत नाहीत. अशा परिस्थितीत, बहुतेक लोक आपली नोकरी सोडून स्वतःचा व्यवसाय किंवा काम करण्यावर भर देत आहेत. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या आर्थिक अनिश्चिततेचा काळ आहे. या काळात इच्छा असतानाही कर्मचारी नोकरी सोडू शकत नाहीत. २००८ मध्ये आलेल्या आर्थिक संकटामुळे २६ लाख लोकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या होत्या, हे इथे उल्लेखनीय आहे. म्हणजेच एकिकडे उद्योगविश्वात जुनी बरकत परत येत असली तरी सामान्यजनांचे जगणे अवघड होत आहे, याची नोंद घ्यायला हवी.