
'एकदा काय झालं' या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार
आलिया भट्ट, कृती सेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार
नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. ज्येष्ठ अभिनेत्री वहिदा रेहमान यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावेळी पुरस्कार स्वीकारताना त्या भावूक झाल्या होत्या.
पुरस्कार स्वीकारल्यानंतर वहिदा रेहमान म्हणाल्या, "मी सर्वांचे आभार मानते. आज मी येथे उभी आहे, याचे सर्व श्रेय माझ्या फिल्म इंडस्ट्रीला जाते. मेकअप आर्टिस्ट, हेअर आणि कॉस्चूम विभागाचेदेखील काम खूप महत्वाचे असते. हा पुरस्कार मी फिल्म इंडस्ट्रीमधील सर्व डिपार्टमेंट्ससोबत शेअर करु इच्छिते. त्या सर्वांनी मला खूप प्रेम दिले आणि सपोर्ट केला."
दरम्यान, ६९ वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळा मंगळवारी नवी दिल्लीतील विज्ञान भवनात हा पुरस्कार सोहळा पार पडला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज विजेत्यांचा सत्कार करण्यात आला. २४ ऑगस्टला पुरस्कारांची घोषणा करण्यात आली होती. या पुरस्कार सोहळ्यात बॉलिवूडसह दक्षिण भारतीय सिनेसृष्टीतील अनेक कलाकार सहभागी झाले होते.
या सोहळ्यात अनेक मराठी कलाकारांनी पुरस्कारावर नाव कोरले आहे. 'एकदा काय झालं' या सिनेमाला सर्वोत्कृष्ट मराठी सिनेमाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तर आलिया भट्ट आणि अभिनेत्री कृती सेननला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. तसेच 'गोदावरी'चे दिग्दर्शन निखिल महाजन यांना उत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सोहळ्या दरम्यान केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर म्हणाले,"राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळणं ही गर्वाची गोष्ट आहे. देशावर कोरोनाचं संकट असताना कलावंतांनी मनोरंजनाचे काम केले आहे. तुमचा कंटेट चांगला असेल तर तुम्हाला कोणीही रोखू शकत नाही. आंतरराष्ट्रीय पातळीवरही तुम्हाला चांगली कामगिरी करता येईल".