दुसऱ्या फ्लाइटमध्ये २३५ लोक मायभूमीत पोहोचले
नवी दिल्ली : ऑपरेशन अजयचे दुसरे विमान शनिवारी सकाळी दिल्ली विमानतळावर (Delhi Airport) पोहोचले. या विमानात २३५ भारतीय नागरिक मायभूमीत परतले आहेत. त्यांना इस्रायलमधून (Israel) सुखरूप परत आणण्यात आले आहे.
ऑपरेशन अजय अंतर्गत आतापर्यंत ४४७ भारतीयांना इस्रायलमधून बाहेर काढण्यात आले आहे. केंद्रीय राज्यमंत्री राजकुमार रंजन यांनी इस्रायलहून परतलेल्या नागरिकांचे विमानतळावर स्वागत केले.
ऑपरेशन अजय अंतर्गत दुसऱ्या फ्लाइटने शुक्रवारी रात्री ११.०२ वाजता स्थानिक वेळेनुसार (इस्रायल) उड्डाण केले. इस्रायलमधून भारतीयांना बाहेर काढण्याची मोहीम सुरूच राहणार आहे. इस्रायलमध्ये सुमारे १८,००० भारतीय नागरिक राहतात.
याआधी इस्रायलमधून भारतीय नागरिकांच्या परतीच्या सोयीसाठी, पहिले चार्टर विमान गुरुवारी संध्याकाळी उशिरा बेन गुरियन विमानतळावरून भारतासाठी रवाना झाले. शुक्रवारी सकाळी ते भारताची राजधानी दिल्लीला पोहोचले. पहिल्या विमानात २१२ भारतीय नागरिक होते.