Wednesday, March 26, 2025
Homeसंपादकीयविशेष लेखPrahaar : जनहिताला साथ; विरोधकांवर ‘प्रहार’

Prahaar : जनहिताला साथ; विरोधकांवर ‘प्रहार’

  • इंडिया कॉलिंग : डॉ. सुकृत खांडेकर

९ ऑक्टोबर, दैनिक ‘प्रहार’ (मुंबई)चा पंधरावा वर्धापन दिन. सन २००८ मध्ये याच दिवशी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या ‘प्रहार’चा मुंबईत शुभारंभ झाला. गेल्या पंधरा वर्षांत ‘प्रहार’ने महाराष्ट्रात स्वत:चा दबदबा निर्माण केला. विशेषत: मुंबई व कोकणात मराठी माणसाचा आवाज म्हणून ‘प्रहार’ ओळखला जाऊ लागला. मुंबईच्या पाठोपाठ ‘प्रहार’ सिंधुदुर्ग व रत्नागिरीतून ९ नोव्हेंबर २००८ पासून वाजत-गाजत सुरू झाला. ‘प्रहार’ने अडीच वर्षांपूर्वी नाशिकमध्ये प्रवेश केला आणि गोदातटाच्या परिसरात चांगला जम बसवला.

कोविडमध्ये दोन वर्षे सर्वच क्षेत्रांत मोठी घसरण झाली. वृत्तपत्रांना दोन वर्षे कोरोना संकटाशी तीव्र सामना करावा लागला. याच काळात वृत्तपत्रांचे खप कमालीचे घसरले. लोकांची वृत्तपत्रे वाचनाची सवय कमी झाली. सर्व काही मोबाइलवर मिळत असल्याने अनेकांनी घरी वृत्तपत्र विकत घेणे बंद केले. सर्वच वृत्तपत्रे मोबाइलवर उपलब्ध झाली व पीडीएफमध्ये मिळू लागल्याने हवेच कशाला वृत्तपत्र, अशी मानसिकता वाढू लागली. त्यातून आता कुठे परिस्थिती सुधारत आहे. वाचकांना आकर्षित करण्यासाठी वृत्तपत्रांना झटावे लागत आहे. त्यातून ‘प्रहार’ तग धरून आहे व लोकांच्या विश्वासाला पात्र ठरला आहे.

नारायण राणे यांचे ‘प्रहार’वर बारीक लक्ष असते. रोज प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या आणि संपादकीय पानावर प्रसिद्ध होणारे अग्रलेख आणि लेख ते बारकाईने वाचत असतात. भाजपची भूमिका आणि धोरण ‘प्रहार’मध्ये प्रभावीपणे मांडले जाईल यावर त्यांचा अधिक कटाक्ष असतो. मालक आणि सल्लागार संपादक म्हणून ते ‘प्रहार’विषयी जागरूक असतात. नारायण राणे मोदी सरकारमध्ये केंद्रात मंत्री आहेत. त्याचे पुत्र माजी खासदार निलेश राणे हे प्रदेश भाजपचे सचिव आहेत तसेच नितेश राणे हे भाजपचे आमदार आहेत. संपूर्ण राणे कुटुंबीय हे भाजपमध्ये सक्रिय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा यांचे धोरण व भूमिका यांना ‘प्रहार’मध्ये ठळक प्रसिद्धी दिली जाते. तसेच महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील महायुतीच्या सरकारच्या कारभाराला ‘प्रहार’मध्ये चांगले स्थान दिले जाते. सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी दै. ‘प्रहार’ नेहमीच आग्रही असतो व जनतेचा आवाज सरकार दरबारी कसा पोहोचेल यासाठी प्रयत्न करीत असतो. म्हणूनच जनता व सरकार यांच्यातील दुवा म्हणून ‘प्रहार’ काम करीत असतो, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.

राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सरकार आहे. देवेंद्र फडणवीस व अजितदादा पवार हे दोन वेगवान उपमुख्यमंत्री महाराष्ट्राला मिळाले आहेत. महायुती सरकारचा अजेंडा व विकासाची कामे जनतेपर्यंत पोहोचविण्यात ‘प्रहार’चा मोठा वाटा आहे व यापुढेही असणार आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली असलेल्या सरकारमुळे संपूर्ण देशात विकासाची चौफेर कामे चालू आहेत. ही कामे व मोदी सरकारचे जनहिताचे निर्णय लोकांपर्यंत पोहोचविण्यात महाराष्ट्रात ‘प्रहार’ आघाडीवर आहे. आपली भूमिका परखडपणे जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्रातील मोदी सरकारला तसेच राज्यातील महायुती सरकारला आणि भाजपला ‘प्रहार’ हे धारदार शस्त्र मिळाले आहे.

‘प्रहार’च्या ८ ऑक्टोबर २००८ च्या पहिल्या अंकात प्रसिद्ध झालेल्या अग्रलेखात नारायण राणे यांनी म्हटले होते – ‘महाराष्ट्राच्या शेवटच्या टोकाच्या नागरिकापर्यंत बातम्या पोहोचविणे हा ‘प्रहार’चा हेतू राहील. त्या माणसाच्या सर्वांगीण विकासासाठी ‘प्रहार’ झटणार असून विकास, उन्नती व प्रगतीसाठी हे वृत्तपत्र धारदार शब्दांनी ‘प्रहार’ करील…’

राज्यात उबाठा सेनेकडून सातत्याने महायुती सरकारवर रोज आरोप केले जातात, त्याची तेवढ्याच तडफेने परतफेड करण्याचे काम आमदार नितेश राणे करीत असतात. त्याला ‘प्रहार’मधून ठळक प्रसिद्धी दिली जाते व सरकारवर केले जाणारे आरोप कसे चुकीचे व बिनबुडाचे आहेत, ते लोकांपुढे मांडले जाते.

क्रिकेटप्रेमी लोक हा ‘प्रहार’चा मोठा वाचक आहे. आयपीएल सामने चालू असताना त्याचा सविस्तर वृत्तांत सलग ५६ दिवस ‘प्रहार’मधून दिला जात होता. रोज दिलेल्या मजकुरातून वाचकांना एक प्रश्न विचारला जात असे. ५५ कुपन्स चिकटवा आणि मोठे बक्षीस मिळवा अशी स्पर्धा ‘प्रहार’ने घोषित केली. त्या स्पर्धेला ३७ हजार वाचकांनी प्रतिसाद दिला. त्यातून छाननी करून ६०० कुपन्स निवडली. अंतिम छाननीत ६५ कुपन्स काढली. विजेत्यांना एलइडी टीव्ही, रेफ्रिजरेटर, मोबाइल फोन, ओव्हन, टुरिस्ट बॅग, गॅस स्टोव्ह, स्मार्ट वॉच, कूकर, इस अशी बक्षिसे देण्यात आली. म्हाडाच्या जनसंपर्क अधिकारी वैशाली गडपाले व सचिन तेंडुलकर यांचे फोटोग्राफर प्रकाश पार्सेकर यांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसांचे वितरण झाले.

या वर्षी ८ मार्चला महिला दिन ‘प्रहार’मध्ये मोठ्या उत्साहात साजरा झाला. याप्रसंगी राष्ट्रीय कीर्तनकार हभप डॉ. वीणा खाडिलकर, महावितरणच्या पीआरओ ममता पांडे, पनवेल महापालिकेच्या पीआरओ वर्षा कुलकर्णी, अदानी इलेक्ट्रिकल्सच्या पीआरओ नीता डोळस, बस ड्रायव्हर लक्ष्मी जाधव, आरआर एज्युकेशन ट्रस्टच्या मुख्याध्यापिका गीतांजली भोसले, शिक्षिका अपूर्वा पवार, रिक्षाचालक सुशीला देशनेहारे, मनोरंजन पीआरओ प्रियंका भोर, मुंबई अग्निशमन दलाच्या निर्मला ढेंबरे व रोहिणी आव्हाड अशा विविध क्षेत्रांतील महिलांनी त्यांच्या करिअरविषयी भूमिका मांडली.

यंदा ‘प्रहार’ने ‘श्रावणसरी’ व प्रहार ‘गजाली’ या कार्यक्रमांना सुरुवात केली. विविध क्षेत्रांतील मान्यवरांना बोलावून त्यांचा सन्मान करणे व त्यांना मनोगत व्यक्त करण्याची संधी देणारा हा कार्यक्रम आहे. दर आठवड्याला मान्यवर व्यक्तीला ‘प्रहार’मध्ये आम्ही निमंत्रण देऊन बोलावतो व त्यांचे मनोगत ‘प्रहार’च्या चारही आवृत्यांमधून लोकांपर्यंत पोहोचवतो. भार्गवी चिरमुले, आदिती सारंगधर, विसुभाऊ बापट, मीनल मोहाडिकर, अच्युत पालव, फुलवा खामकर, पंढरीनाथ ऊर्फ पॅडी कांबळे, डॉ. राजश्री कटके, डॉ. पल्लवी सापळे, मोहन जोशी, सविता मालपेकर, केदार वैद्य, रोहिणी निनावे अशा अनेकांनी ‘प्रहार’ गजालीमध्ये हजेरी लावली आहे.

‘प्रहार’ व्यासपीठ हे आणखी वेगळे वैशिष्ट्य आहे. प्रासंगिक विषयावर वाचकांना त्यांची प्रतिक्रिया मांडण्यासाठी दर आठवड्याला ‘प्रहार’ने व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. लोकलमधील घुसखोरीपासून ते उत्सवात डीजेचा दणदणाटापर्यंत अशा अनेक विषयांवर वाचकांना त्यांची मते मांडण्याची संधी व्यासपीठने दिली आहे.

‘प्रहार’ कोलाज ही रविवारची साहित्यिक-सांस्कृतिक पुरवणी लोकप्रिय झाली आहे. मृणालिनी कुलकर्णी, सतीश पाटणकर, पल्लवी अष्टेकर, डॉ. रचिता धुरत, डॉ. लीना राजवाडे, अॅड. रिया करंजकर, श्रीनिवास बेलसरे, एकनाथ आव्हाड, देवबा पाटील, रमेश तांबे, प्रा. प्रतिभा पवार, हभप डॉ. वीणा खाडिलकर, डॉ. महालक्ष्मी वानखेडकर, गुरुनाथ तेंडुलकर, लता गुठे, पल्लवी बनसोडे, सुनीता नागरे, मृदुला घोडके, वैजयंती आपटे, पूनम राणे, अशा दर्जेदार लेखकांनी कोलाज पुरवणी समृद्ध केली आहे. ‘प्रहार’ मंथनमध्ये डॉ. वीणा सानेकर, अर्चना सोंडे, सुरेश वांदिले, तर रिलॅक्समध्ये रूपाली हिर्लेकर, भालचंद्र कुबल, युवराज अवसरमल, अर्थविश्वमध्ये महेश मलुष्टे, सर्वेश सोमण, श्रद्धा-संस्कृती या अध्यात्म पुरवणीत विलास खानोलकर, प्रा. मनीषा रावराणे, प्रवीण पांडे यांचे स्तंभ लोकप्रिय आहेत. संघ परिवारातील संस्थांचा परिचय करून देणारे शिबानी जोशी यांचे सेवाव्रत, मीनाक्षी जगदाळे यांचे फॅमिली कौन्सिलिंग व तसेच ग्राहक पंचायत हे स्तंभ संपादकीय पानावर नियमित प्रसिद्ध होत आहेत. माझे सहकारी संतोष वायंगणकर, महेश पंचाळ, दीपक परब, अनघा निकम-मगदूम, रोहित गुरव, ज्योत्स्ना कोट-बाबडे यांचेही ‘प्रहार’मधून नियमित लेखन चालू असते.

‘प्रहार’ मुंबई, ठाणे, रायगड, पालघर अशा महामुंबईत वेगाने वाढत आहे. नारायण राणे यांच्या मार्गदर्शनाखाली महाव्यवस्थापक मनीष राणे, प्रशासन व लेखा विभागाचे प्रमुख ज्ञानेश सावंत, जाहिरात व्यवस्थापक दिनेश कहार व त्याचे सहकारी कौशल श्रीवास्तव, वितरण व्यवस्थापक शाहिद अख्तर, आयटी सेलचे प्रमुख राकेश दांडेकर, कला विभागाचे प्रमुख निलेश कदम, डिजिटल विभागाचे प्रमुख राजेश सावंत अशा सर्वांच्या सक्रिय सहभागातून ‘प्रहार’ची दमदार वाटचाल चालू आहे. वाचकांचे प्रेम हीच आमची शिदोरी आहे.

[email protected]
[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -