ओंजळ: पल्लवी अष्टेकर
दुष्काळ म्हटला की, डोळ्यांपुढे येते ते एकच चित्रं! एक उदासिन शेतकरी जमिनीवर पडलेल्या भेगा न्याहाळत असताना! त्याची मेघांकडून असलेली अपेक्षा, त्याचे आभाळात लागलेले डोळे. खरंच पाऊस पडला नाही, तर शेतकरी हताश होऊन जातात. पण पावसाने जर दडी दिली, तर फक्त शेतकरीच आयुष्यातून उद्ध्वस्त होतो की, इतरांच्या आयुष्यात पण त्याची झळ लागते? महाराष्ट्रात आजवर १ जानेवारी ते ३१ जुलै २०२३ या काळात अंदाजे १५५५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या ही बाब खेदजनक व चिंताजनक आहे. त्या कुटुंबांची, त्यांच्या लेकरांची त्यामुळे हानी झाली. त्यांच्या घरातील कुटुंब प्रमुखाचा आधार गेल्यामुळे केवढी कठीण परिस्थिती या घरांमध्ये निर्माण झाली असेल? यातील किती कुटुंबाचे पुनर्वसन झाले असेल?
अनेक अर्थतज्ज्ञ, पर्यावरणतज्ज्ञ, भविष्यवेत्ते यांनी पाण्यासाठी तिसऱ्या महायुद्धाची शक्यता वर्तविली आहे. दुष्काळाचा सामना जगातील असंख्य देशांना करावा लागत आहे. आफ्रिका, अफगाणिस्तान, अंगोला, ब्राझील, चिली, सोमालिया, इराण, इराक, सुदान, झांबिया, कझाकिस्तान, मोझंबिक या व अशा इतर अनेक देशांतील काही भागांतील परिस्थिती दुष्काळग्रस्त आहे. याचे गंभीर परिणाम सर्वांनाच भोगावे लागत आहेत. पाणी हेच जीवन आहे. ही निसर्गाने आपल्याला दिलेली एक देणगी आहे. पृथ्वीवरील सर्व पशुपक्ष्यांचे व माणसाचे जीवन हे पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे जलस्रोतांचा जपून वापर करणे हे आपले आद्य कर्तव्य आहे. पाण्याचा अपव्यय टाळणे जरुरीचे आहे. पाण्याची सर्वात मोठी गरज भासते, ती म्हणजे शेती करण्यासाठी. कारण मानव पाण्याशिवाय कुठलेही पीक घेऊ शकत नाही.
यूएनसीसीडी या संस्थेकडून अलीकडेच बातमीनुसार जगात सन २००० पासून सातत्याने दुष्काळ पडण्याचे प्रमाण २९ टक्क्यांनी वाढले आहे. असे म्हटले जाते की, अंदाजे २०५० या वर्षापर्यंत पृथ्वीवरील संपूर्ण वाळवंट अंदाजे ५० ते ६० टक्क्यांनी वाढणार आहे आणि अशा क्षेत्रांमध्ये जगणाऱ्यांना पाण्याच्या फार मोठ्या कमतरतेला सामोरे जावे लागणार आहे. पृथ्वीवर ७१ टक्के पाण्यापैकी साधारणत: फक्त ३ टक्के पाणी पिण्यायोग्य आहे असे यातील काही तज्ज्ञांनी सांगितले आहे.
जास्तकरून खेडोपाड्यांत व शहरांत लोकांनी आपल्या विहिरींची साफसफाई करून तो गोड्या पाण्याचा स्त्रोत म्हणून वापरायला हवा. ज्यांना आपल्या घरात पूर्वापार विहिरी लाभल्या आहेत, त्यांना या पाण्याचा उपयोग दैनंदिन कामांसाठी जसे की, कपडे धुणे, भांडी घासणे यासाठी होऊ शकतो व इतरांना गरजेच्या वेळी ते पाणी देऊन मदत करू शकतात. ‘बारव स्वच्छता मिशन’ अभियानाअंतर्गत गेल्या दोन महिन्यांपासून परभणी येथील वालूर या खेड्यातील जवळपास ५२ जुन्या, पायऱ्यांच्या विहिरींची स्वच्छता करण्यात आली. कचऱ्यापासून, प्लास्टिकपासून स्वच्छ झालेल्या या विहिरी पुन्हा पाणी साठवण्यासाठी उपयुक्त होऊ लागल्या आहेत. ही स्वच्छता मोहीम तेथील जिल्हाधिकारी आंचल गोयल आणि जिल्हा परिषदेतील चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर श्रीनिवास टाकसाळे यांच्या सहकार्याने पार पडली. कोणत्याही परताव्याची अपेक्षा न धरता येथील शंभर ते दीडशे लोकांनी भरपूर मेहनत करून या विहिरींच्या आजूबाजूला व्यापलेली काटेरी झुडपे, पडलेली पाने व फांद्या साफ करून पाणी साठवण्याच्या या विहिरी स्वच्छ केल्या आहेत. खरोखरच या ग्रामवासीयांच्या एकत्र कामाचे कौतुक वाटते आणि ही काळाची गरज बनली आहे.
महाराष्ट्रातील काही गावांमध्ये दुष्काळजन्य परिस्थिती सप्टेंबरमध्येच उत्पन्न झाल्याचे वाचनात आले. येवला तालुक्यात अजूनही दमदार पाऊस न झाल्याने बंधारे, नदी, जलसाठे व विहिरी इत्यादी कोरडेठाक असल्याने ग्रामीण भागात भर पावसाळ्यातही टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. येवला तालुक्यातील ३५ गावे व १५ वाडी-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे. पाण्याच्या अभावाने होणारे परिणाम म्हणजे महागाई, ज्याची झळ सर्वसामान्यांना भोगावी लागते. पाण्यावर मोठ्या प्रमाणात वीजनिर्मिती होत असते. त्यामुळे पाण्याच्या कमतरतेचा परिणाम अपरिहार्यपणे वीजनिर्मिती (हायड्रो-पाॅवर) या प्रकल्पांवर होत असतो.
अमेरिकेतील ‘नासा’च्या संशोधनामुळे चंद्रावरील पाण्याच्या अस्तित्वाचा नवा पुरावा मिळाला आहे. चंद्रावर पाण्याचे रेणू असल्याचे भारताच्या पहिल्या चांद्रयान मोहिमेतून स्पष्ट झाले आहे. त्यानंतर चंद्रभूमीवरील जलसंशोधनाला गती आली. चंद्राच्या सूर्यप्रकाशित भागात पाण्याचे अंश असल्याचा शोध ‘नासा’च्या सोफिया या हवाई वेधशाळेने लावला आहे. संशोधनाच्या दृष्टीने ही बाब उपयुक्त जरी असली तरी पृथ्वीवरील मानवाचे अस्तित्व टिकवण्यासाठी, निसर्गाचे संतुलन राखण्यासाठी पृथ्वीवर सुद्धा जलस्त्रोत टिकवणे, असलेल्या जंगलांचे संवर्धन करणे, वृक्षारोपण करणे या गोष्टी आवश्यक आहेत. त्याबरोबरच रेन वाॅटर हार्वेस्टिंग, ग्राऊंड वाॅटर रिचार्ज या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. भविष्यकाळात नैसर्गिक असंतुलनासाठी मानवाला तोंड द्यावे लागणार आहे.
एका रिपोर्टनुसार, ग्लोबल वॉर्मिंगमुळे हिमालयातील हिमनग वितळण्याचे प्रमाण हे अनाकलनीयरीत्या वेगाने होत आहे. हे हिंदू कुश हिमालयीन माऊंटन रेंजेसमध्ये होत आहे. जर ग्रीन हाऊस प्रदूषणावर ताबा ठेवला नाही, तर या हिमनगांची घनता ८० टक्क्यांनी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हिंदू कुश हिमालय पर्वतरांगांमधील बर्फ हा आशिया खंडातून वाहणाऱ्या १६ देशांसाठी एक महत्त्वपूर्ण जलस्त्रोत आहे. त्यामुळे जवळपास पर्वतराजींमधील अंदाजे २४० मिलियन लोकांना गोड पाण्याचा पुरवठा होतो व त्याखाली राहणाऱ्या अंदाजे १.६५ बिलियन लोकांना या पाण्याचा उपयोग होतो. अमिना महाजन या मायग्रेशन स्पेशालिस्ट यांनी असे वर्तविले आहे की, हिमालयीन पर्वतराजींमध्ये राहणाऱ्या लोकांना ग्लोबल वॉर्मिंग व तेथील हवामान बदलामुळे नजीकच्या काळात पाण्याची कमतरता भासण्याची शक्यता दाट आहे.
हवामानातील बदलामुळे पृथ्वीवरील क्रायोस्फियर (बर्फाने आच्छादलेला पृथ्वीचा भाग) त्यावर खूपच विपरीत परिणाम होतो आहे. अलीकडेच झालेल्या संशोधनानुसार माऊंट एव्हरेस्टवरील हिमनगांनी २००० वर्षांएवढा बर्फ तीस वर्षांत घालविला आहे. थोडक्यात, नजीकच्या काळात ‘पाण्यासाठी दाही दिशा, आम्हां फिरविशी जगदीशा’ असे म्हणायची वेळ नक्कीच दूर नाही. त्यामुळे पृथ्वी, पृथ्वीवरचे जीवन वाचवायचे असेल, तर हरितक्रांतीबरोबर जलस्त्रोतांचा योग्य विनियोग व संवर्धन जरुरीचे आहे. नाहीतर ‘कोणी पाणी देता का पाणी’? असे म्हणायची वेळ येऊ नये.