मुंबई: क्रिकेटचा सर्वात मोठा कुंभमेळा समजला जाणारा विश्वचषक २०२३(world cup 2023)सुरू होण्यास अवघे काही तास शिल्लक आहेत. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. अशातच या विश्वचषकात असे फलंदाज आहेत ज्यांच्या कामगिरीवर संपूर्ण जगाच्या नजरा असणार आहेत.
विराट कोहली
भारतीय क्रिकेटमधील दिग्गज क्रिकेटर विराट कोहलीने आशिया चषक २०२३मध्ये आपण जबरदस्त फॉर्मात असल्याचे दाखवून दिले आहे. पाकिस्तानविरुद्ध विराटचे शतक अनेक वर्षांपर्यंत स्मरणात राहील. ३४ वर्षीय विराट कोहलीचा हा शेवटचा वर्ल्डकप असू शकतो. विराट वर्ल्डकपमध्ये शतक ठोकणारा सगळ्यात युवा भारतीय आहे. २०११मध्ये कोहलीने हा रेकॉर्ड केला होता.
बाबर आझम
पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमने वर्ल्डकपच्या आधी झालेल्या वॉर्मअप सामन्यात ऑस्ट्रेलिया तसेच न्यूझीलंडविरुद्ध आपला फॉर्म दाखवला आहे. बाबर पहिल्यांदा भारतात येत आहे. अशातच प्रत्येकाला त्याची बॅटिंग पाहण्याची इच्छा आहे. त्याचा हा फॉर्म पाहता तो या विश्वचषकात दोन ते तीन शतके ठोकेल अशी शक्यता आहे.
रोहित शर्मा
गेल्या वर्ल्डकपमधील हिरो रोहित शर्मा या वर्ल्डकपमध्येही कमाल करू शकतो. इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या २०१९च्या वर्ल्डकपमध्ये रोहितने पाच शतक ठोकत संपूर्ण जगाला हैराण केले होते. यावेळेसही रोहितकडून याच कामगिरीची अपेक्षा आहे.
स्टीव्ह स्मिथ
ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार आणि वरिष्ठ फलंदाज स्टीव्ह स्मिथचाही हा शेवटचा वर्ल्डकप असू शकतो. गेल्या दोन वर्ल्डकपमध्ये स्मिथची फलंदाजी ऑस्ट्रेलियासाठी महत्त्वाची ठरली. दरम्यान, यावेळेस भारतात वर्ल्डकप खेळवला जात आहे. अशातच स्मिथच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असणार आहे.
बेन स्टोक्स
इंग्लंडचा हा क्रिकेट बेन स्टोक्सने २०२३ वनडे वर्ल्डकपसाठी आपल्या निवृत्तीवरून यू टर्न घेतला. स्टोक्स या वर्ल्डकपमध्ये इंग्लंडसाठी चौथ्या स्थानावर फलंदाजी करू शकतो. त्याने भारतीय पिचचा जवळून अभ्यास केला आहे. त्याला खूप अनुभवही आहे.