- रवींद्र तांबे
पाऊस लागल्यावर झऱ्यांना पाणी सुटते. म्हणजे पाण्याच्या उगमस्थानाला झरा म्हणतात, असे आपण म्हणतो. मात्र, झऱ्याच्या पाण्याची चव काही न्यारीच असते. यासाठी पावसाला सुरुवात झाल्यावर कोकणात यावे लागेल. आजही कोकणातील काही वाड्यांमध्ये पाऊस सुरू झाल्यावर झऱ्याला पाणी सुरू झाले की, त्या पाण्याचा वापर पिण्यासाठी नागरिक करतात. हे पाणी म्हणजे निसर्गाची देणगी असे स्थानिक लोक म्हणतात. आता जरी गावातील वाड्यावाड्यात नळ योजना सुरू करण्यात आल्या तरी त्याचे भाडे स्थानिक लोकांना परवडत नाही. फक्त पाणीटंचाईच्या वेळेला ग्रामपंचायतीमार्फत देण्यात येणाऱ्या पाण्याचा वापर करतात.
झऱ्याचा विचार करता ज्याठिकाणी पाण्याचा झरा असतो, त्याची पूर्व कल्पना स्थानिक नागरिकांना असते. त्यामुळे कधी एकदा पाऊस पडतो आणि झऱ्याला पाणी सुरू होते, असे त्यांना वाटत असते. एकदा का झरा सुरू झाला की, चार-पाच महिने पाण्याची चिंता मिटली असे समजा. झऱ्याच्या पाण्यात हंडा बुडण्यासाठी खड्डा खोदला जातो. इतकेच नव्हे तर दिवाळीच्या दरम्याने पूर्ण पाऊस जातो तेव्हा हे झऱ्याचे पाणी पण बंद होते. पाण्यासाठी खोदलेल्या खड्यात मासे पण मिळतात. त्यासाठी पाणी कमी कधी होते याची राखणे वाट पाहत असतात. अशा माशांचा सार सुद्धा कोकणात लोक आवडीने भाताबरोबर खातात.
महत्त्वाची बाब म्हणजे, झऱ्याच्या पाण्याची कोणत्याही प्रकारची काळजी घेतली जात नाही. स्थानिक लोक ज्याठिकाणी झऱ्याचा उगम होतो तेथील जागा साफ करतात. त्या पाण्याला सारखे बुडबुडे येत असतात. खड्डा खोदलेला असल्याने हंडा बुडवायचा आणि घेऊन यायचे. झऱ्याच्या पाण्यावर सूर्याची किरणे पडल्यावर लांबून पाणी चांदीसारखे चमकताना दिसते. त्यामुळे कोकणी माणूस झऱ्याचे पाणी अगदी कावळ्याच्या डोळ्यासारखे दिसते असे वर्णन करतात. कोकणात पावसाळ्यात शेतात काम करीत असताना शेतकरी राजा, वाटसरू आणि गुराखी झऱ्याचे पाणी पितात. झऱ्याच्या पाण्याची चव म्हणजे सध्याच्या बिसलरीच्या बॉटलमधील पाण्यापेक्षा मधुर असते. एकवेळ बॉटलमधील पाणी पिल्याने सर्दी-खोकला होऊ शकतो. मात्र झयाच्या पाण्याने काहीही होत नाही. म्हणतात ना शेवटी नैसर्गिक ते नैसर्गिक. या पाण्याला कोणत्याही प्रकारचा कर द्यावा लागत नाही. वाहणारे स्वच्छ पाणी इतकीच त्याची ओळख. हे वाहते पाणी असल्याने फिल्टर करण्याची आवश्यकता नाही. कोणीही पाणी गढूळ किंवा दूषित करत नाहीत. काही वेळा या पाण्याचा उपयोग गुरे सुद्धा पितात. ते पाणी वाहत असल्याने जंगली प्राणी सुद्धा पितात तसेच उन्हामुळे गर्मी वाढत असल्याने झऱ्याच्या वाहणाऱ्या पाण्यात बसतात. त्यामुळे त्यांना थंडावा मिळतो.
अशा या निसर्गनिर्मित निर्माण झालेल्या झऱ्यांना शासकीय आसरा दिला पाहिजे. बऱ्याच ठिकाणी असे पाणी वाहत नाल्याला मिळते. नंतर नदीला मिळून शेवटी समुद्राला जावून मिळते. तेव्हा हे पाणी पिण्यायोग्य असते. तेव्हा त्याचा साठा कसा करता येईल यासाठी विशेष प्रयत्न झाले पाहिजे.
झरा निसर्गाच्या खुशीत उगवल्याने पर्यटकांचा ओढा सुद्धा वाढेल. त्यासाठी त्याची स्थानिक पातळीवर देखभाल होणे आवश्यक आहे. तसेच शासकीय स्तरावर आर्थिक मदत मिळणे आवश्यक आहे. केवळ धबधबे बघून किंवा त्या पाण्यात उभे राहून मस्ती करत वेळ वाया घालविण्यापेक्षा खरी मजा ही धबधब्याच्या पाण्याचा उगम कुठे झाला हे पाहण्यात असते. म्हणजे समजेल धबधब्याचे अस्तिस्त कशामुळे निर्माण झाले आहे. धबधब्याचा इतिहास पाहण्यापूर्वी जे पाणी धबधब्यात येते, ते कुठून येते? त्याचा उगम कुठे झाला? केवळ पावसाळ्यात डोंगरावरून खाली पडणाऱ्या पाण्यात खेळ खेळण्यापेक्षा पाण्याचा उगम कुठे झाला याचा शोध घेऊन त्याचे संगोपन केल्यास अजून काही महिने धबधब्याचा आनंद लुटता येईल. याचा परिणाम त्या ग्रामपंचायतीला महसूल मिळण्याला तसेच त्या गावातील स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळण्यास मदत होईल. त्यासाठी प्रत्येक गोष्टीचे संशोधन झाले पाहिजे. म्हणजे त्यातून नक्कीच आर्थिक लाभ होऊ शकतो. तेव्हा जलक्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तीचे मार्गदर्शन खूप मोलाचे आहे. त्यांच्या ज्ञानाचा उपयोग अशा कारणासाठी केला पाहिजे.
झऱ्याचे पाणी पिण्यालायक जरी असले तरी त्याचा कशाप्रकारे साठा करू शकतो. ते पाणी जमिनीत जिरवू शकतो का?, त्याप्रमाणे प्रयत्न झाले पाहिजेत. मात्र तसे आपल्या देशात होत नाही हे दुर्दैव आहे. आता जे काही नैसर्गिक आहे त्याचा वापर कसा केला पाहिजे, यासाठी त्या क्षेत्रातील संशोधन मंडळींनी पुढे येणे आवश्यक आहे. तरच झऱ्याचे वाया जाणाऱ्या पाण्याचा योग्य उपयोग केला जावू शकतो. अशा नैसर्गिक पाण्याचा साठा कशा प्रकारे करता येईल त्या दृष्टीने पावले उचलणे गरजेचे आहे. यातून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटून स्थानिक रहिवाशांना आर्थिक उत्पन्न सुद्धा मिळू शकते. आजही ग्रामीण भागातील बऱ्याच वाड्यातील वस्तीवर गेल्यास तेथील रहिवासी झऱ्याचे पाणी पिऊन आपली तहान भागवीत असतात.
थोडक्यात असे म्हणता येईल की, ज्याप्रमाणे गरम पाण्याच्या झऱ्याची काळजी शासन दरबारी घेतली जाते त्याप्रमाणे पावसाळ्यात ज्या ठिकाणी झरा उगवतो त्या ठिकाणची शासन स्तरावर देखभाल होणे गरजेचे आहे. असे जर झाले तर ग्रामीण भागातील उन्हाळ्यात होणारी पाणीटंचाई दूर होऊ शकते.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra