
मानाच्या गणपतींचे विसर्जन झाले मात्र...
पुणे : दहा दिवसांपासून उत्साहात सुरु असलेल्या गणेशोत्सवाचा (Ganeshotsav) काल अखेरचा दिवस होता. आपल्या लाडक्या बाप्पाला काल गणेशभक्तांनी वाजतगाजत निरोप दिला. मुंबईत सकाळपासून सुरु झालेल्या विसर्जन मिरवणुका रात्री उशिरापर्यंत सुरुच होत्या. मुंबईच्या प्रसिद्ध लालबागच्या राजाचे सकाळी नऊच्या सुमारास विसर्जन (Immersion) झाले. तर पुण्यात (Pune) सार्वजनिक गणेश मंडळांच्या विसर्जन मिरवणुका अजूनही सुरुच आहेत. किंबहुना त्या आणखी तीन ते चार तास लांबण्याची शक्यता आहे.
पुण्यातील मानाच्या गणपतींचे काल उशिरा विसर्जन पार पडले. पुण्यातील विसर्जन मिरवणूक लवकर पार पडावी यासाठी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या पदाधिकाऱ्यांकडून दगडूशेठने मिरवणुकीत लवकर सहभागी होण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ते साडेचार वाजता सहभागी झाले. दगडूशेठचे नऊ वाजण्याच्या आसपास विसर्जन देखील पार पडले.
दगडूशेठनंतर अखिल मंडई, बाबू गेनू, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी, राजाराम यासारख्या मंडळांची मिरवणूक खुप उशिराने सुरू झाली. या मंडळांऐवजी इतर मंडळांना लक्ष्मी रस्त्यावर विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी प्रवेश देण्यात आला. तर दीड वाजल्यानंतरही या मंडळांची विसर्जन मिरवणूक सुरु झाली नव्हती. त्यामुळे या मिरवणुका आणखी लांबण्याची शक्यता आहे.
लक्ष्मी रस्ता, कुमठेकर रस्ता, केळकर रस्ता यावरून येणाऱ्या २०० मंडळांचे गणेश विसर्जन अजून बाकी आहे. तर पुण्यातील सर्व मानाच्या गणपतींचे विसर्जन पार पडल्यामुळे पोलिसांवरील ताण काहीसा कमी झाला आहे. आणखी ३ ते ४ तासांनी सर्व गणपतींचे विसर्जन पार पडेल अशी शक्यता आहे.