Tuesday, April 22, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनपर्यटनातील फिनिक्स भरारी

पर्यटनातील फिनिक्स भरारी

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे

सचिन तेंडुलकरला क्रिकेटमध्ये, लता मंगेशकर यांना गायनामध्ये, तर अमिताभ बच्चन यांना अभिनय क्षेत्रात दैवत्व प्राप्त झालेले आहे. याला कारण म्हणजे त्यांनी निवडलेले क्षेत्र हा त्यांचा श्वास होता. पर्यटन हा तिचा श्वास आहे. त्यामुळेच पर्यटन म्हटले की, एक नाव आपसूक तोंडावर येते वीणा वर्ल्ड आणि वीणा वर्ल्डच्या वीणा पाटील यांचे. वीणा पाटील यांचा जन्म जागतिक पर्यटन दिनाच्या पूर्वसंध्येला २६ सप्टेंबर १९६४ रोजी झाला. केसरी टूरचे संस्थापक केसरीभाऊ पाटील यांची ती सर्वात मोठी मुलगी आहे. सोमय्या कॉलेज, मुंबई येथून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगचा डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर. १९८४ च्या सुरुवातीला ती केसरीमध्ये रुजू झाली. पुढे २०१३ साली वीणा पाटील यांनी स्वतःची ‘वीणा वर्ल्ड’ सुरू केली. असं म्हणतात की, एक महिला दुसऱ्या महिलेला पुढे जाऊ देत नाही अथवा मदत करत नाही. पण वीणा पाटील म्हणतात की, “सगळ्या महिलांनी त्यांना मदत केली कारण वीणा वर्ल्डची पहिली टूर ही लेडीज स्पेशल होती आणि त्याला महिलांनी उदंड प्रतिसाद दिला.”

‘वीणा वर्ल्ड’ हे नाव राज ठाकरे यांनी सुचवले आहे. वीणा पाटील यांच्या राहत्या घरी वीणा वर्ल्डच्या कामाची सुरुवात झाली. मराठी माणसांची आवड, त्यांचा कल आणि प्राधान्य लक्षात घेता वीणा पाटील यांनी पहिल्यांदा मराठी माणसांसाठी, मराठी टूर मॅनेजरसह युरोप, अमेरिका टूर्स सुरू केल्या म्हणून आज अनेक मराठी टूर ऑपरेटर्स युरोप-अमेरिका टूर्स करताना दिसतात आणि त्यामुळे पर्यटक ‘वीणा वर्ल्ड’सोबत जाणे पसंत करतात. साधारणपणे ३०-३५ लोक रोज सकाळी ९ ते सायंकाळी ७ काम करत असत. त्यानंतर वीणा पाटील त्यांच्याकडे असलेल्या खानसामाच्या मदतीने स्वतः काही खायला करत असत. ते दिवस म्हणजे हरिश्चंद्राची फॅक्टरी. ते सारे आठवले की, वीणा पाटील आजही त्या आठवणींच्या गावी काही काळ स्थिरावतात आणि त्यावर भरभरून बोलतात. पुढे कामाचे स्वरूप वाढले आणि वसई विकास बँकेने ना नफा ना तोटा या तत्त्वाने ६ कोटी कर्ज मंजूर केले आणि पर्यटकांच्या विश्वासातून १ वर्षात रीतसर ते फेडू शकले. आज वीणा वर्ल्डच्या प्रवासाबद्दल प्रत्येक मराठी माणूस जाणून आहे. तेथील प्रत्येक शिलेदाराने ध्येय ठेवून जिद्दीने, मेहनतीने वीणा वर्ल्ड एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे.

माणूस हा फक्त पैशासाठी काम करीत नाही, तर तो आपल्या कामामध्ये आपले समाधान शोधत असतो आणि हेच कारण आहे की, वीणा वर्ल्डमधील प्रत्येक कर्मचारी एकमेकांत बांधले गेले आहेत. या क्षेत्रांत नव्याने उद्योग करू इच्छिणाऱ्यांना त्या सांगतात की, “ध्येय निश्चित करा, त्या ध्येयाकडे जाण्याचा मार्ग ठरवा आणि मग जिद्दीने मार्गक्रमण करायला शिका. अडचणींची पायरी व्हा, अडथळ्यांचा आधार घेऊन उडी मारा आणि संकटांचे संधीत रूपांतर करा” ही त्यांची शिकवण आहे. आपल्या घरचा संवाद जाणीवपूर्वक, विचारपूर्वक असावा याबद्दल त्या आग्रही आहेत. त्यातून आत्मविश्वास निर्माण होईल आणि सहज बदल घडू शकेल हा त्यांना विश्वास आहे. कुठल्याही परिस्थितीत निर्णय घेण्याची क्षमता वाढवता आली पाहिजे, असा त्यांचा आग्रह आहे. “माझ्या स्पर्धकांनी माझी अधिकाधिक कॉपी करावी म्हणजे मला अधिक नवं सुचत जातं.” वीणा पाटील यांचे हे वाक्य खूप काही शिकवून जाते.

कोरोनाचा सगळ्यात पहिला फटका हा पर्यटन व्यवसायाला बसला आणि या धक्क्यातून सर्वात शेवटी जर कोणता व्यवसाय सावरला असेल, तर तो पर्यटनच आहे. कोरोनाचा प्रसार जगभर ज्या पद्धतीनं झाला आहे, ते पाहता लोकांच्या मनात प्रवासाची भीती बसली होती. त्यामुळे सगळं रुळावर आलं तरी लोक लगेचच फिरायला बाहेर पडले नाहीत, हे वास्तव आहे. किमान वर्षभर लोक बाहेर पडतील की नाही, याबद्दल शंका होती. पण थोडं सुरळीत झालं असताना एका महिन्यात दहा हजार बुकिंग वीणा वर्ल्डमध्ये झाल्या. शेवटी मर्यादित क्षमता लक्षात घेता अनेकांना थांबवावे लागले. हा खऱ्या अर्थाने वीणा पाटील यांच्या ‘वीणा वर्ल्ड’वरचा विश्वास होता.

आमूलाग्र बदल घडवत जिद्दीने त्यांनी वीणा वर्ल्डचा आलेख सतत चढता ठेवला आहे. सतत काहीतरी नवीन देण्याचा त्यांचा प्रयत्न पर्यटकांना ‘वीणा वर्ल्ड’कडे आकर्षित करणारा आहे. आज त्यांचे सहकारी, मित्र, वेगवेगळे उद्योग, व्यवसाय करून आर्थिक अडचणींवर मात करत आहेत. कारण त्या म्हणतात की, रिकामे बसू नये. त्याने मनात वेगवेगळे विचार येतात. आज आलेल्या अडचणींवर मात करण्याची आवश्यकता आहे. आपल्या यशाचे श्रेय त्या आपले सहकारी यांच्यासोबत आपल्या कुटुंबाला देखील देतात. आई-बाबांच्या संस्कारामुळे त्या घडल्या. उद्योजिका बनल्या, यजमान सुधीर पाटील यांच्यामुळे उद्योजकीय कक्षा रुंदावल्या. त्यांनी संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतली, कारण वीणा पाटील यांचे वर्षातले निम्मे महिने विमान प्रवासात असायचे. त्यांची मुले नील आणि राज लहान असताना त्यांना कधीही आई घरात नाही, याची उणीव भासली नाही कारण, त्यांना घरातून संस्कार मिळाले होते की आई कामानिमित्त, पैसे कमवण्यासाठी बाहेर आहे आणि आज वीणा पाटील म्हणजे पर्यटन हे समीकरण दृढ झाले आहे.

‘लेडी बॉस’ कशी असावी अन् कशी दिसावी, याचं मूर्तिमंत उदाहरण वीणा पाटील आहेत. फिनिक्स पक्ष्याप्रमाणे उद्योगविश्वात त्यांनी घेतलेली यशाची भरारी कोणत्याही उद्योजकासाठी प्रेरक आहे.

[email protected]

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -