
मुंबई : मुंबईत प्रवेश करताना मुंबईतील पाचही एन्ट्री पॉइंटवरील टोलचे दर (Toll) वाढवण्याचा निर्णय झाला आहे. त्यानुसार, मुंबईच्या मुलुंड, वाशी, दहिसर, ऐरोली आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग या पाचही प्रवेशद्वारांवर ही टोलवाढ लागू होणार आहे.
येत्या १ ऑक्टोबरपासून टोल दरात १२.५० ते १८.७५ टक्के वाढ होणार आहे.
हलकी मोटार वाहने किंवा प्रवासी कार यांच्यासाठी एकेरी टोल ५ रुपये वाढणार आहे.
मिनी बससाठी टोल दरात १० रुपये वाढ होणार आहे. मिनी बसचालकांना आधी ६५ ते ७५ रुपये द्यावे लागत होते.
ट्रक आणि बससाठी १५० रुपये तर मल्टी एक्सल वाहनांसाठी १९० रुपये दर निश्चित करण्यात आले आहेत.
या एन्ट्री पॉइंट्सवर सन २००२ पासून टोल घेतला जात आहे. याआधी ऑक्टोबर २०२० मध्ये टोलदरात सुधारणा करण्यात आली होती. यानंतर आता पुन्हा टोलदरात वाढ करण्यात आली आहे. यानंतर पुढील सुधारीत दरवाढ ऑक्टोबर २०२६ मध्ये होईल.
दरम्यान, २०२६ नंतर दहिसर, एलबीएस रोड-मुलुंड, ईस्टर्न एक्सप्रेस हायवे-मुलुंड आणि ऐरोली खाडी पूल येथे टोल आकारणी बंद होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हे टोल बंद झाले तरी ठाणे खाडी पुलाच्या बांधकामाचा खर्च वसूल करण्यासाठी वाशी येथे टोल सुरू राहिल अशी शक्यता आहे.
एमएमआर भागातील ५५ उड्डाणपुलांच्या उभारणीचा खर्च वसुलीसाठी २००२ ते २०२७ या २५ वर्षांसाठी टोलवसुली करण्यात येणार आहे. राज्य रस्ते विकास महामंडळासोबतच्या करारानुसार दर तीन वर्षांनी टोलदरात वाढ होते. त्यानुसार ही वाढ झाली आहे.