श्रीकांत कवळे,अलिबाग
पुत्ररत्नाची प्राप्ती होताच “मुलगा झाला हो...!” अशी आरोळी अजूनही आधुनिक भारतात आनंदाने मारली जाते हे एक विशेष आहे! त्याच बरोबरीने पेढेही वाटले जातात. वंशाचा दिवा, म्हातारपणाची काठी, सर्वांचा आधार, पूर्वजांचा नावलौकिक पुढे नेणारा भावी प्रज्ञावंत, कुटुंबाचा भावी कर्ता या एक ना अनेक आशा जिवंत ठेवणारा म्हणून त्या नवजात अर्भकाकडे अपेक्षेने पाहिलं जातं आणि येथेच अपेक्षांचं ओझं शिरावर घेऊन त्याच्या जीवनाची वाटचाल सुरू होते.
आर्थिक परिस्थितीनुसार शैक्षणिक क्षेत्रात पाऊल ठेवताच आज्ञाधारक आणि गुणवंत विद्यार्थ्याची बिरुदावली त्याच्या नावापुढे चिटकणे अपरिहार्य असते. त्या विद्यार्थ्यांच्या मागे पाठीला पाठ लावून बहीण आली असेल, तर मग स्वाभाविकपणे त्या बहिणीची प्राथमिक जबाबदारी त्याच्या कोवळ्या खांद्यावर येते. तिच्या रक्षणासाठी तो आपसूकच ढाल बनतो. जर बहीण नसेल, तर मग चुलत, मावस, आतेबहिणीसाठी, काहीच नाही तर शेजारच्या मुलींचा तो दादा बनतो. विद्यार्थी दशेतच जबाबदारी स्वीकारून किंवा लादलेली जबाबदारी सहन करण्याच जणू काही त्याला ‘बाळकडू’ मिळतं. घरात जर तो मोठा असेल आणि दुर्दैवाने वडिलांचं छत्र हरवलं असेल, तर मग तो अकाली प्रौढ होतो. महाविद्यालयात प्रवेश मिळताच स्वाभाविकपणे आजूबाजूला मित्र मैत्रिणी गोळा होतात. त्यांच्या गोतावळ्यात रमताना देखील जबाबदारी काही सुटत नाही. मग कधी अभ्यासिका असेल, तर कधी परीक्षा असेल यात समन्वयक म्हणून भूमिका पार पाडावी लागते. स्पर्धा परीक्षा, क्रीडा स्पर्धा, पिकनिक, विविध कलागुण स्पर्धा यात भले त्याचा समावेश नसेलही पण भलेपणाच उत्तरदाईत्व काही सुटत नाही. अर्थाजनदशेत कुटुंबाची जबाबदारी घ्यावीच लागते. पदरमोड करून मागच्या भावंडांची शैक्षणिक जबाबदारी, लग्नकार्य, आजारपण, आई-वडिलांची जबाबदारी इतरही सर्व सामाजिक बांधिलकी जपत मार्गक्रमण सुरूच राहते. मिळतुक पुरेशी नसेल, तर मग महिन्याच्या खर्चाची दोन टोक जुळवताना कर्जबाजारी होण्याची वेळ येतेच, पण यातून माघार नसते. तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावाच लागतो. मन मारून वेळप्रसंगी अर्धपोटी रहात जीवनप्रवास सुरूच राहतो. परिस्थितीने गांजलेला अन् सर्वबाजूने पिचलेला ‘तो’ सदैव ठामपणे उभा राहतो. ऊन-वारा-पाऊस आणि असंख्य वादळांना अंगावर झेलत ‘निवारा’ बनून लढत राहतो.
वैवाहिक जीवनात, तर जबाबदाऱ्या भरघोस वाढतात. त्यांची पूर्तता करताना जीव अगदी मेटाकुटीला येतो. पत्नी कमावती असो वा नसो, त्याला दया माया नसते. मुलांची शैक्षणिक जबाबदारी, आजार त्यावरील औषधोपचार, हट्ट यातून त्या बापाच्या बनियनला पडलेली भोकं ही जबाबदारीच मूर्तिमंत प्रतीक असावीत. मुलांच्या प्रतिभेला न्याय मिळवून देण्यासाठी, त्यांच्या उच्च किंवा परदेशी शिक्षणासाठी बाप फक्त गहाण पडायचा बाकी राहत असावा! मुलीची पाठवण करताना पुरुषांच्या जीवाची होणारी घालमेल खचितच एखाद्या मुलीचा बापच जाणू शकतो. गहिवरून आलेल्या भावना केवळ मनात दडवून ठेवत वेदनांचा भडिमार सहन करत तो अश्रूंनाही डोळ्यांतून वाट दावू शकत नाही, हीच खरी शोकांतिका ठरते.
सार्वजनिक ठिकाणी चूक कुणाचीही असली तरी सारी सहानुभूती स्त्रियांना मिळते. नाण्याला दुसरी देखील बाजू असतेच, याचा सारासार विचार करायला हवाच. याचा अर्थ पुरुषाने जुलूम जबरदस्ती करावी, असा कदापि अपेक्षित नाही. कणखरतेच्या बाबतीत हा मक्ता मात्र पुरुषांनीच घ्यावा, असा अलिखित नियमच आहे.परिस्थितीला घाबरून पळून जाण्याचे सारे मार्ग त्याच्यासाठी कधीच बंद झालेले असतात. लढण्याशिवाय इतर कोणताही दुसरा पर्याय उपलब्ध नसतो. या संघर्षात तो जिंकलाच, तर त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या त्याच्या पत्नीची वाहवा आवर्जून होते आणि हरला, तर मात्र पराभवाला साथ-संगत कुणाचीही नसते ही वस्तुस्थिती आहे. (येथे सुख दुःखाच्या सर्व प्रसंगात सतत सोबत असलेल्या पत्नीचं महत्त्व कमी करण्याचा कोणताही मानस नाही.)
आयुष्यभर कष्ट उपसलेल्या पुरुषाला, कुटुंबप्रमुखाला आयुष्याच्या संध्याकाळीही विविध जबाबदाऱ्यांतून निवृत्त होण्याचा मात्र अधिकार नसतो बरं! त्याच्या मनाप्रमाणे जगणं त्याला क्वचितच मिळत असावं, कारण वार्धक्यात देखील नातवंडं, त्यांच्यावरील संस्कार, त्यांच्या सोबतीची, सुश्रूषा करण्याची थोडी अधिक जबाबदारी उरतेच. ती नाकारण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण सध्याच्या काळात पती आणि पत्नी हे दोघेही अर्थाजनासाठी घराबाहेर पडत असल्याने हे कर्तव्य बजावणे आलेच.
कुटुंबात, पुरुषाचं अस्तित्व हे कदाचित मिठाप्रमाणे असावं. तो नसेल, तर जीवन आळणी बनून जातं. एक मात्र खरं की पुरुष असलेल्या घराकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिम्मत करायला कुणीही धजावत नाही. त्याचा केवळ वावर असला तरी सुरक्षितपणाची भावना निर्माण होते. भाऊ, दिर, पती, पिता, सासरा, काका, मामा, मित्र, सखा, प्रियकर अशा अनेक भूमिका वठवत असताना तो नेहमीच काळजीवाहू सरकार असतो. आई जर घराची, कुटुंबाची कृपासिंधू असेल, तर बाप हा नेहमीच आधारस्तंभ असतो. त्याला भावनिक होता येत नाही, त्याला तुटून खाली पडता येत नाही. वेळप्रसंगी संकटांचा सामना करताना ती स्वतःच्या छाताडावर घेण्याची क्षमता तो नेहमीच राखून ठेवतो. कधी कधी तो अहंकारी, लबाड, अभिमानी, आपमतलबी तर कधी स्वाभिमानी, अबोल, काळजी घेणारा, कर्तव्यकठोर असतो. प्रत्येक वेळी त्याच्या कृतीमागील भूमिका समजून उमजून घेणं महत्त्वाचं ठरतं. त्यालादेखील मन असतं. दरवेळी शब्दांतून व्यक्त होता येत नसेल, तर मग ते नजरेतून किंवा स्पर्शातून उलगडलं जातं. मनाच्या हळव्या कोपऱ्यात दडलेल्या उत्कट, तरल भावना दरवेळी शब्दावाटे बाहेर येतीलच, याची शाश्वती नसते हो!
मित्रहो, वरील वर्णन केलेलं वर्तन कमी अधिक प्रमाणात आपण सगळेच, एक सामाजिक बांधिलकी, जबाबदारी आणि कर्तव्य भावनेतून करत असतो. कोणालाही श्रेष्ठत्व बहाल करण्याचा किंवा दोषी ठरवण्याचा मानस नक्कीच नाही, पण पुरुषत्व हे सहजी लाभत नाही आणि लाभलंच तर ते सिद्ध करण्यासाठी अनेक अग्निपरीक्षा द्याव्या लागतात त्यापण अगदी मृत्यूशयेवर निजेपर्यंत. मनातील या तरल भावना शब्दसुमनांनी विषद कराव्याशा वाटल्या इतकंच...! आपण माझ्या मतांशी सहमत असावं, असा आग्रह बिलकुल नाही. प्रत्येक कृतीला, नियमाला अपवाद असतातच. आपल्या आजूबाजूला अशी अपवादात्मक उदाहरणं सापडल्यास तो केवळ योगायोग समजावा. समस्त पुरुषप्रधान संस्कृतीला समर्पित...






