- कोकणी बाणा : सतीश पाटणकर
पांडव जेव्हा मेढे गावात आले, तेव्हा त्यांनी हे नागनाथाचं देऊळ एका रात्रीत बांधलं आणि सकाळ व्हायच्या आत उठवायची जबाबदारी नंदीवर टाकून ते झोपले. पण सकाळ झाली तरी नंदीने काही त्यांना उठवलं नव्हतं. मग चिडून पांडवांनी नंदीची मूर्ती रागाने देवळाच्या तळीत फेकून दिली, अशी श्री नागनाथ मंदिर स्थानाची गोष्ट असून पांडवकालीन जागृत देवस्थान म्हणून ते सर्वदूर प्रसिद्ध आहे.
दोडामार्ग तालुक्यातील तेरवण-मेढेगाव लहान गाव. वाटेत नदी, सुपारीच्या मोठ्या बागा, अननसाची शेती, केळीच्या बागा असं अगदी समृद्ध कोकणमय वातावरण. मेढे गावात पोहोचल्यावर एक-दोन लहानशी दुकानं फक्त दिसतात आणि मग लगेच देवळाची मोठी कमान. किंचित चढावावरून गेलं की, सुंदर कौलारू देऊळ, आजूबाजूला विक्रेत्यांची रिघ नाही की माणसांची गर्दी नाही. सह्याद्रीच्या पायथ्याशी वसलेले हे प्राचीन मंदिर कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा परिसरातील लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. हे स्थान नेमके कोणी व केव्हा वसविले आहे, याची निश्चित कागदोपत्री नोंद सापडत नाही. तथापि एकूण पार्श्वभूमी पाहता हे बांधकाम पांडवकालीन आहे याला पुष्टी मिळते. सर्व जाणकार व्यक्तींचेही याविषयी एकमत आहे.
मंदिर पूर्वाभिमुख असून त्याची रचना गाभारा व पुढे अत्यंत एक छोटी खोली अशा दोन भागांत केली आहे. बांधकामाचे वैशिष्ट्य असे आहे की, प्रचंड शिलांमध्ये (प्रस्थर) कोणत्याही प्रकारे चुना किंवा तत्सम पदार्थ न वापरता त्या एकावर एक ठेवून बांधकाम केले आहे. गाभाऱ्याचा भाग चौरसाकृती असून त्याच्या लगतची छोटी खोली आयताकृती आहे. या दोन्ही खोलींचे छतही दगडांचेच असून ते वर निमुळते होत गेले आहे. छताचा भाग चौकोनी दगडांचा असून त्यांना आकर्षकता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. गाभाऱ्याच्या छतावरील दगडावर फुलाचा आकार दिला आहे. गाभाऱ्याच्या दगडी चौकटीवर बाहेरून गणेशाची लहानशी मूर्ती लक्ष वेधून घेते.
शिवलिंगावर ओतलेल्या शेकडो घागरींचे पाणी आतल्या आतच या चरीतून जिरते. हे पाणी जाते कुठे? हे न उलगडणारे कोडे आहे. यावर संशोधन होणे गरजेचे आहे. मंदिरात मोठे शिवलिंग आहे. लिंगाची उंची सुमारे दोन फूट व घेरी अडीच फुटांच्या आसपास असावी. हे शिवलिंग स्वयंभू आहे, असे भक्तगण म्हणतात. लिंगावर पंचधातूची पंचमुखी नागाची १८ कि. ग्रॅ. वजनाची प्रतिमा आरूढ आहे. अभिषेक करताना ओतलेले पाणी शिवलिंगावर पडण्याकरिता शिवलिंगाच्या मधोमध घट ठेवलेला आहे. जवळच श्रीशंकराचे शस्त्र त्रिशूल व डमरू आहे. या मंदिरातील अजून एक वेगळी गोष्ट म्हणजे याच्या तळ्यात एक नंदी आहे. त्याबाबत सांगितली जाणारी कथा म्हणजे पांडव जेव्हा मेढे गावात आले, तेव्हा त्यांनी हे नागनाथाचं देऊळ एका रात्रीत बांधलं आणि सकाळ व्हायच्या आत उठवायची जबाबदारी नंदीवर टाकून ते झोपले. पण सकाळ झाली तरी नंदीने काही त्यांना उठवलं नव्हतं. चिडून मग पांडवांनी नंदीची मूर्ती रागाने देवळाच्या तळीत फेकून दिली अशी गोष्ट आहे.
आजही नंदी देवळात नसून देवळामागच्या तळ्यात आहे. या तळ्याबद्दलही वेगवेगळे समज आहेत. उन्हाळा असो वा पावसाळा या तळ्यातील पाणी कधीच कमी-जास्त होत नाही. विशेष म्हणजे तळ्यातील पाणी बाजूच्या शेतीकडे वळवलं आहे, तरी देखील पाण्याची खोली तशीच राहते. गोष्टीतल्या खऱ्या-खोट्याच्या नादाला न लागता स्वच्छ मनाने देऊळ बघितलं, तर अनेक गोष्टी लक्षात येतात.
अगदी अलीकडच्या काळामध्ये या मंदिरावर शेकडोजण राहतील, अशी प्रशस्त कौलारू इमारत उभी केलेली आहे. या ठिकाणी शेकडो भक्तांनी श्रद्धेपोटी दिलेल्या वस्तू आहेत. मंदिराच्या भोवती भावई व भैरवनाथाची लहान आकाराची देवळे आहेत. जवळच भक्तिपोटी बांधलेल्या निवाऱ्यासाठी दोन इमारती आहेत. या स्वयंभू शिवलिंग मंदिरात मोठ्या उत्साहात शिवरात्र होत आहे. भाविकांच्या श्रद्धेचे स्थान व पांडवकालीन जागृत देवस्थान म्हणून सर्वदूर प्रसिद्ध असलेल्या तेरवण-मेढे (ता. दोडामार्ग) येथील श्री नागनाथ मंदिर तीर्थक्षेत्र या ठिकाणी महाशिवरात्री उत्सव मोठ्या उत्साहात व भक्तिमय वातावरणात संपन्न होत आहे. गोवा-दोडामार्ग-बेळगाव या मुख्य रस्त्यापासून मेढे येथे फक्त एक किमी अंतरावर श्री नागनाथ मंदिर वसलेले आहे.
(लेखक मुख्यमंत्र्यांचे माजी माहिती अधिकारी आहेत.)