Eknath Shinde : ‘हयात’मध्ये जमल्या होत्या भ्रष्टाचाऱ्यांच्या टोळ्या

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा ‘इंडिया आघाडी’वर घणाघात


नरेंद्र मोदींसमोर यांचा टिकाव लागणार नाही...


महायुतीचा ‘मिशन -४८’ संकल्प मेळावा


मुंबई : ‘ज्यांनी हयातभर निव्वळ भ्रष्टाचार केला, त्यांच्या टोळ्या शुक्रवारी ‘हयात’मध्ये जमल्या होत्या. ते सर्व दमलेले आणि विस्थापित नेते आहेत. त्यामुळे भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले ‘इंडिया आघाडी’चे हे नेते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर काय आरोप करतील, असा खडा सवाल करतानाच हे लोक मोदींवर जितके आरोप करतील तितकीच देशातील जनता मोदींच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहील’, असा ठाम विश्वास शिवसेना नेते व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी व्यक्त केला. कोणाच्याही बापाचा बाप आला तरीही मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होऊ देणार नाही, अशी गर्जना मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.


मुंबईतील वरळी येथे आयोजित महायुतीच्या ‘मिशन-४८’ या महासंकल्प मेळाव्यात ते बोलत होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, भारती पवार, भागवत कराड, मंत्री चंद्रकांत पाटील, दिलीप वळसे - पाटील, गुलाबराव पाटील, सुरेश खाडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, उदयनराजे भोसले, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर, कपिल पाटील, भावना गवळी, आनंदराव अडसूळ, रामदास कदम, महादेव जानकर, विनय कोरे, सदाभाऊ खोत, जोगेंद्र कवाडे, नरहरी झिरवळ, आमदार रवी राणा यांच्यासह महायुतीचे सर्व आमदार, खासदार, ज्येष्ठ नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मेळाव्यात उपस्थित होते.


मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आधीच गॅसवर असलेली मोदीविरोधकांची आघाडी ही ‘इंडिया’ नव्हे तर ‘इंडी’ आघाडी आहे. या आघाडीत भ्रष्टाचारात आकंठ बुडालेले नेते आहेत. त्याउलट पंतप्रधान मोदी यांची जगभरात कीर्ती आहे. गेल्या ६० वर्षांत जे झाले नाही, ते मोदी यांनी नऊ वर्षांत करून दाखविले. देश भ्रष्टाचारमुक्त करण्याचे काम त्यांनी केले. मोदी यांच्यावर भ्रष्टाचाराचा डाग नाही. त्यामुळेच हे भ्रष्टाचारी लोक मोदी यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, मोदी यांच्यावर कितीही आरोप लावले तरीही विरोधकांची डाळ शिजणार नाही. २०२४ मध्ये मोदी पुन्हा विजयी होतील, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. विरोधकांची अवस्था ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ अशी झाली आहे. त्यांना आपल्या आघाडीचा लोगो सुद्धा फायनल करता आला नाही. त्यांच्यात एकमत कसे होईल, असा सवाल शिंदे यांनी केला. विरोधकांच्या आरोपाला आम्ही कामाने उत्तर देणार आहोत.



‘इंडी’ची झाली भेंडी आघाडी : देवेंद्र फडणवीस


इंडिया आघाडीमध्ये अनेक पक्ष एकत्र आले पण त्यांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? यावर अजूनही एकमत होऊ शकलेले नाही. त्यामुळे ‘इंडी आघाडी’ची भेंडी आघाडी झाली असल्याची टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.


ते म्हणाले की, इंडिया आघाडीत पंतप्रधानपदासाठी अरविंद केजरीवाल, नितीशकुमार अशी अनेक नावे आहेत. राहुल गांधी यांना तर कोणी पंतप्रधानपदाचे उमेदवार मानतच नाहीत. निवडणूक एकत्र लढविण्यावर देखील त्यांचे एकमत होऊ शकले नाही. आघाडीत शक्यतो आम्ही एकत्र लढू असे बोलले जात आहे. त्यामुळे इंडीची भेंडी आघाडी झाली आहे. त्यांचा लोगो तयार होऊ शकला नाही. हयातमध्ये येऊन त्यांनी बिर्याणी खाण्याचा आनंद घेतला. तिथले वातावरण बघितले. आघाडीत काहीही होऊ शकत नसल्याने ते आता परत जाणार आहेत, अशी टीका त्यांनी केली. आमच्या एनडीएचा विकासाचा अजेंडा आहे. दीनदलित, गोरगरीब, महिला, आदिवासी सर्वांच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत. नरेंद्र मोदी यांनी गेल्या ९ वर्षांत केलेल्या कामांमुळे भारतातील अतिगरिबी कमी झाली, असे युनायटेड नेशन मॉनेटरी फंडने म्हटले आहे. जगातील प्रगत देशांना जे जमले नाही, ते भारताने चांद्रयान-३ मोहीम यशस्वी करून दाखविली. त्यामुळे जपानमध्ये आपल्या शास्त्रज्ञांचे कौतुक सुरू असल्याची माहिती फडणवीस यांनी दिली. महायुतीमध्ये एकत्र आलेले भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा ‘फेव्हिकॉल का जोड हैं टूटेगा नही’ असा डायलॉग त्यांनी मारला.

Comments
Add Comment

मुंबई अहमदाबाद महामार्गाबाबत मोठा निर्णय

मुंबई : वाहतूक कोंडी टाळण्यासाठी मुंबई अहमदाबाद महामार्गावर दिवसा अवजड वाहनांना बंदी घालण्यात आली आहे. ही बंदी २

Bombay High Court Bomb threat : मुंबई हायकोर्टाला पुन्हा बॉम्बची धमकी! पोलिस अलर्ट मोडवर

मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा दहशतीचं सावट पसरलं आहे. उच्च न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी आल्याची माहिती समोर आली

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष सुटलेल्या सात जणांना उच्च न्यायालयाची नोटीस

मुंबई : मालेगाव येथे २००८ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोटप्रकरणी सात जणांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. एनआयए

iPhone 17 Pro साठी फ्रीस्टाइल हाणामारी, BKC मध्ये राडा

iPhone 17 Pro: अ‍ॅपलचे बहुप्रतीक्षित आयफोन १७, आयफोन १७ प्रो, आयफोन १७ प्रो मॅक्स आणि आयफोन एअरच्या विक्रीला आजपासून

'म्हाडासाथी' एआय चॅटबॉटचे लोकार्पण, म्हाडाचे आणखी एक तंत्रस्नेही पाऊल

मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरण (म्हाडा) एक लोकाभिमुख संस्था असून

यंदाच्या गणेशोत्सवात लाल परीने मोडले सर्व विक्रम...केलं असं काही की...

५ हजार जादा एसटी बसमधून सहा लाख कोकणवासीयांचा प्रवास गणेशोत्सवात