
काय घडलं नेमकं?
नाशिक : नाशिक (Nashik) शहरातील गुन्हेगारी वाढीस लागली असून नाशिकमधून पुन्हा एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नाशिकच्या आरटीओ (RTO) परिसरात दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी चक्क केंद्रीय मंत्री भारती पवार (Bharati Pawar) यांच्या आईच्या गळ्यातील मंगळसूत्र पळविल्याची घटना समोर आली आल्याने खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नाशिक शहरात सामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या मातोश्री शांताबाई बागुल या सायंकाळी सहा ते सात वाजेच्या सुमारास भाजीपाला घेण्यासाठी परिसरात असलेल्याच भाजी मार्केटमध्ये जात होत्या. यावेळी दुचाकीवरून आलेल्या दोघांनी त्यांच्या गळ्यातली दोन ते अडीच तोळ्यांची सोन्याची पोत हिसकावली. यावेळी परिसरामध्ये जास्त वर्दळ नसल्यामुळे कोणाला आवाज देता आला नाही असे शांताबाई बागुल यांनी सांगितलं.
भारती पवार यांच्या मातोश्री काय म्हणाल्या?
नाशिकच्या आरटीओ ऑफिस परिसरातील दुर्गा नगर येथे घडलेल्या या प्रकाराबद्दल भारती पवार यांच्या मातोश्रींनी स्वतः माहिती दिली. त्यांनी माझ्या गळ्यात हात टाकला. पोत हिसकावून घेतली. पोत गेल्याचं मला कळलं. ते हळूहळू निघून गेले. पण त्यावेळी तिथे कोणी माणसेच नव्हती. ते पुढे जाऊन वळले आणि बघत होते मी काही ओरडते का ते. पण मला काहीच सुचेनासे झाले. दोघेही स्कूटीवर आले होते, अशी माहिती भारती पवार यांच्या आईंनी दिली.
नाशिकमधील गुन्हेगारी चिंताजनक
नाशिक शहरातील वाढती गुन्हेगारी पोलिसांसह नागरिकांची डोकेदुखी ठरत आहे. सातत्याने घटनांनी नाशिक शहर हादरत असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील नाशिक गुन्हेगारीबाबत काही दिवसांपूर्वी चिंता व्यक्त केली होती. सामान्य नागरिक तर अशा घटनांमुळे दहशतीखाली आहेत. मात्र आता थेट केंद्रीय मंत्र्यांच्या आईचं मंगळसूत्र चोरट्यांने पळवल्याने नाशिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.