Saturday, July 20, 2024
Homeसाप्ताहिककोलाजCo-operation : गोष्ट एका फुग्याची...

Co-operation : गोष्ट एका फुग्याची…

  • संवाद : गुरुनाथ तेंडुलकर

ज्याचा फुगा फुटला, त्याने वास्तविक आऊट झाल्यानंतर बाहेर जायला हवं. पण सरांनी तसं काहीच न सांगितल्यामुळे ज्यांचे फुगे फुटले होते, ते विद्यार्थी इतरांच्या फुग्यावर तुटून पडत होते. हातातल्या अणकुचीदार काडीनं इतरांचे फुगे फोडत होते. ज्यांचे फुगे शाबूत होते ते आपला फुगा वाचवून दुसऱ्याचा कसा फोडता येईल, यासाठी धडपडत होते.

मॅनेजमेंट कॉलेजमध्ये शिकत असताना सुप्रसिद्ध मॅनेजमेंट गुरू शरू रांगणेकर सरांशी माझा परिचय झाला. रांगणेकर सरांकडून मी बरंच काही शिकलो. त्यापैकी हे एक…

एकदा रांगणेकर सर आम्हा विद्यार्थ्यांना कॉलेजच्या मोकळ्या हॉलमध्ये घेऊन गेले. आम्ही साधारण साठ विद्यार्थी होतो. तिथे आमच्या प्रत्येकाच्या हातात पूर्ण फुगवून गाठ मारून ठेवलेला एक एक रंगीबेरंगी फुगा देण्यात आला. तसंच प्रत्येकाच्या हातात एक एक टुथपिकसारखी टोकदार काडी दिली गेली आणि सांगितलं की, “आता म्युझिक सुरू झाल्यानंतर प्रत्येकाने आपापला फुगा सांभाळून ठेवायचा आहे. तो फुटणार नाही यासाठी प्रयत्न करायचे आहेत. पाच मिनिटानंतर म्युझिक थांबेल त्यावेळी ज्यांच्या हातातले फुगे व्यवस्थित असतील त्यांना विजेते घोषित करण्यात येतील.” सरांनी सूचना देऊन सगळ्यांना विचारलं… “खेळाचा नियम समजला सगळ्यांना?”

“होय सर.” आम्ही सर्वजण एकदम कोरसमध्ये ओरडलो.

“ठीक आहे.” असं म्हणून सरांनी म्युझिक सुरू करायला सांगितलं. म्युझिक सुरू झाल्यानंतर त्या हॉलमध्ये जो एक हलकल्लोळ उसळला त्याचं वर्णन करणं अशक्य. साठ विद्यार्थी… त्यात निम्मे मुली होत्या. सर्वजण एका हातात आपला फुगा आणि दुसऱ्या हातातली ती टोकदार काडी घेऊन आरडा-ओरडा करीत एकमेकांवर त्यांचे फुगे फोडण्यासाठी तुटून पडले. धक्काबुक्की, आरडाओरडा आणि सरांनी सुरू केलेलं फास्ट म्युझिकचा दणदणाट… या सगळ्या हलकल्लोळात मधे-मधे काही फुगे फुटल्याचे आवाज आणि किंकाळ्या… ज्याचा फुगा फुटला, त्याने वास्तविक आऊट झाल्यानंतर बाहेर जायला हवं. पण सरांनी तसं काहीच सांगितलं नसल्यामुळे ज्यांचे फुगे फुटले होते, ते विद्यार्थी आता आपल्याकडे गमावण्यासारखं काहीच नाही या विचाराने इतरांच्या फुग्यावर तुटून पडत होते. हातातल्या अणकुचीदार काडीनं इतरांचे फुगे फोडत होते. ज्यांचे फुगे शाबूत होते ते आपला फुगा वाचवून दुसऱ्याचा कसा फोडता येईल, यासाठी धडपडत होते… एकच धुमाकूळ सुरू होता… काहीजण त्या गडबडीत खाली पडले. एकमेकांच्या अंगावर कोसळले. एक दोघांचे कपडेदेखील फाटले. काहींना मुका मार लागला. काहींना खरचटलं… पाच मिनिटानंतर म्युझिक थांबलं. साठपैकी केवळ चार जणांच्या हातातले फुगे शाबूत होते. मीही त्यापैकी एक होतो. आम्ही चौघेजण विजयी मुद्रेनं सरांकडे गेलो. “सर… वी आर विनर्स… आम्ही जिंकलो.”

आम्हाला वाटलं होतं की, सर शाबासकी देतील, अभिनंदन करतील, कौतुक करतील… पण… पण सर काहीच बोलले नाहीत. सर फक्त एकच वाक्य म्हणाले. “आजचा खेळ संपला आता वर्गात चला.” आम्ही सर्वजण वर्गात गेलो. आम्हा चौघांच्या मनावर अजूनही विजयाची धुंदी होती, तर इतर मुलं आपापसात आपला फुगा कुणी कसा फोडला, याबद्दल एकमेकांना दूषणं देत खंत करीत होती.

सरांनी पाच मिनिटानंतर बोलायला सुरुवात केली. म्हणाले, “आज तुमच्या हातात एक एक फुगवलेला फुगा दिला होता. आपापला फुगा सांभाळून ठेवायला सांगितलं होतं. तुमच्यापैकी केवळ चार विद्यार्थ्यांना फुगे सांभाळता आले. बाकीच्यांचे फुगे फुटून गेले… कारण… सरांनी एक मोठ्ठा पॉज घेतला आणि म्हणाले, “कारण तुम्ही एकमेकांचे फुगे फोडलेत. तुम्हाला फक्त स्वतःचा फुगा सांभाळायला सांगितलं होतं. दुसऱ्याचा फोडायला सांगितलं नव्हतं. पण तुमच्या हातात टुथपिकची काडी आली आणि तुम्ही एकमेकांचे फुगे फोडायला सुरुवात केलीत… काही गरज होती का? म्युझिक सुरू झाल्यानंतर तुम्ही हातात फुगा घेऊन नाचू शकला असता. एकमेकांना आनंदानं भेटू शकला असता, झालंच तर एकमेकांचे फुगे एक्स्चेंज करू शकला असता… पण तुम्ही एकमेकांवर तुटून पडलात. कारण… तुमच्या हातात टुथपिक होती. आपला फुगा वाचवायचा असेल, तर दुसऱ्याचा फोडायलाच हवा हे तुम्ही गृहीत धरलंत आणि परिणामी… एका चांगल्या खेळाचा खेळखंडोबा झाला. वास्तविक तुम्ही सर्वच्या सर्व साठहीजण विजेते ठरू शकला असता. पण तुम्हाला फक्त मीच विजयी व्हायला हवं. इतर कुणीही होता कामा नये ही ईर्षा महत्त्वाची वाटली म्हणून तुम्ही इतरांचे फुगे फोडायला सुरुवात केलीत. सरांनी त्या दिवशी आम्हाला को-ऑपरेशन म्हणजेच सहकार या विषयावर व्याख्यान दिलं.

आज हा प्रसंग आठवण्याचं कारण म्हणजे पुढच्या आठवड्यात एका संस्थेत मला प्रमुख पाहुणा म्हणून निमंत्रण आलं आहे आणि बोलायला विषय दिला आहे, ज्ञानेश्वर माऊलींचं पसायदान… त्यानिमित्तानं पसायदानाचा नव्यानं अभ्यास करताना एका ओवीवर मी घुटमळलो. “भूतां परस्परे जडो मैत्र जीवाचे.”
ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वप्रार्थना करताना,
जे खळांची व्यंकटी सांडो।
तया सत्कर्मी रती वाढो।
भूतां परस्परे पडो। मैत्र जीवाचे।।

अशी प्रार्थना केली आहे. दुर्जनांची दुर्बुद्धी जाऊन त्यांना सत्कर्म करण्याची प्रवृत्ती व्हावी आणि साऱ्या प्राणिमात्रांमध्ये परस्परांबद्दल स्नेहभाव निर्माण होऊन मैत्री व्हावी… केवढी उदात्त कल्पना आहे ही. पण… पण आज आपण पाहातोय ते काही वेगळंच दिसतं. परस्परांमध्ये केवळ ईर्षा, द्वेष, चीड, वैरभाव आणि असूया. या जगात असणारी सगळी संपत्ती आणि सुखं केवळ मला एकट्यालाच मिळायला हवी अशी हीन वृत्ती. परिणामी दोन माणसांत संशय, असुरक्षिततेची भावना आणि मी वैरभाव… जे दोन माणसांत तेच दोन जातीत, दोन समाजांत आणि दोन देशांत… आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटनांकडे नीट डोळसपणे पाहिलं, तर आपल्या ध्यानात येईल की, काही मूठभर मंडळी या द्वेषमूलक वृत्तीला खतपाणी घालताहेत. गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतचे अनेक राजकारणी जाती-जातीत तेढ निर्माण करून, धर्माधर्मातील दरी वाढवून आणि माणसा-माणसांत फूट पाडून आपली पोळी भाजून घेत आहेत.

जागतिक पातळीवर विचार केल्यास काही मूठभर देश आणि मुख्यत्वे त्यातील काही बडी व्यापारी मंडळी आपल्याकडची शस्त्रास्त्रं खपवण्यासाठी देशा-देशात भांडणं लावतात. दोन्ही देशांना शस्त्रास्त्रं विकतात. युद्धनौका आणि विमानं विकतात. देशादेशात भीती निर्माण करून आपला व्यापार साधतात. संपत्ती कमावण्यासाठी आणि सत्ता अबाधित राखण्यासाठी वाट्टेल त्या थराला जातात… बुद्धिमान शास्त्रज्ञांना नोकरीवर ठेवून जैविक शस्त्रास्त्रं तयार करतात. नवनवीन रोगजंतू निर्माण करतात, साथी पसरवतात आणि त्यावर उपाय म्हणून लसी आणि औषधं विकतात. सर्वसामान्य माणसांच्या आयुष्याशी खेळतात. भीतीचा बागुलबोवा उभा करून धंदा करतात आणि हे सर्व करत असताना आपण जणू काही फार मोठी समाजसेवा करतोय, मानवतेच्या कल्याणासाठी राबतोय, असा आव आणतात.

तुम्ही म्हणाल की, आम्ही सर्वसामान्य माणसं. आम्ही यावर काय उपाय करू शकतो? आहे. उपाय आहे. इतरांना सुधारणं आपल्याला शक्य नसलं तरी आपण स्वतःला तरी सुधारू शकतो की नाही? आपल्या अंतरंगात डोळसपणे डोकावून पाहिलं, तर आपणही अनेकदा स्वार्थानं वागतो, अनेकांबद्दल आपल्या मनात असूया, द्वेष, मत्सर असतो. एका शेजाऱ्यानं मोठी गाडी घेतली की, दुसऱ्याला त्याचा हेवा वाटतो. नोकरीच्या ठिकाणी एका सहकाऱ्याचं कौतुक झालं की, इतर अनेकांना त्या माणसाचा मत्सर वाटतो… कुणाचं चांगलं झालं की, आजूबाजूच्या अनेकांना त्याचं वाईट वाटतं. माणसा-माणसामधील ही हीन वृत्ती संपवणं जरी आपल्या हाती नसलं तरी आपण स्वतःपासून सुरुवात करू शकतोच की… दुसऱ्याच्या दुःखात सहभागी होऊन त्याचं दुःख दूर करण्याचे प्रयत्न करता आले, तर उत्तमच पण तसं करता आलं नाही, तर किमान त्याच्या दुःखामुळे आपल्याला आनंद तरी होता कामा नये. स्वतःच्या आचारात विचारात सकारात्मक बदल करण्यासाठी ही पहिली पायरी आहे, असं मला वाटतं.

सगळ्यांशी चांगुलपणाने वागणं, कुणाचाही हेवा न करणं, दुसऱ्याच्या समस्येचा गैरफायदा घेऊन त्यातून स्वतःचा स्वार्थ न साधणं अशा प्रकारची मनोधारणा निर्माण झाली की हळूहळू व्यक्ती-व्यक्तीतील संबंध सुधारायला सुरुवात होऊ शकेल… पुढे याच व्यक्तीसमूहाचा समाज होतो. दोन व्यक्तीमधील संबंध सुधारले की, हळूहळू समाजा-समाजातील तेढ कमी होऊ शकेल. प्रांता-प्रांतातील, राज्याराज्यातील, दोन भिन्न जातीतील, दोन भिन्न धर्मांमधली तेढ कमी झाली की, आपसूकच ज्ञानेश्वर माऊलींनी पसायदानात मागितल्याप्रमाणे भूतमात्रांत मैत्र निर्माण होऊ शकेल. पुढे माऊलींनी पसायदानात पुढच्या मागणीत मागितल्याप्रमाणे…
किंबहुना सर्व सुखी। पूर्ण होवो तिन्ही लोकी।
अशा अवस्थेला आपण निश्चितच पोहोचू शकतो. त्यानंतर हातात टाचणी असली तरी आपण आपल्या हातातील फुगा सांभाळण्यासाठी दुसऱ्याच्या हातातील फुगा फोडायचा विचार देखील मनात येणार नाही… खरंय ना?

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -