प्रियकरासमोरच चालत्या जीपमध्ये दोघांकडून बलात्कार आणि मारहाण; पोलिसांनी केली सुटका
बीड : बीड (Beed) जिल्ह्यात एका २६ वर्षीय विधवा महिलेवर तिच्या प्रियकरासमोर दोघांनी चालत्या जीपमध्ये मारहाण करत आळीपाळीने बलात्कार (Rape) केला. ही घटना शुक्रवारी घडली असून, या प्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जीपमध्ये अत्याचार केल्यावर या पीडित महिलेला गावात नेऊन प्रियकराच्या पत्नीने पाईप आणि चप्पलने मारहाण केल्याचा आरोपही पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.
बीडच्या शिवाजीनगर पोलिसांत पीडिताने दिलेल्या तक्रारीनुसार, या महिलेच्या पतीचे पाच वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर, ती आपल्या तीन वर्षांच्या मुलीसोबत बीड शहरात राहू लागली. दरम्यानच्या काळात बीड तालुक्यातील सात्रापोत्रा येथील सुरेश नामदेव लंबाटे याच्याशी पीडित महिलेचे प्रेमसंबंध जुळले. त्यानंतर ती आपल्या तीन वर्षांच्या मुलीसोबत सुरेशसोबत मागील एक वर्षापासून बीडमध्ये राहते.
दरम्यान, ४ ऑगस्ट रोजी पीडिता रोडवरुन पायी जात असताना तिथे चारचाकी गाडी आली. त्या गाडीतून सुरेश लंबाटे खाली उतरला आणि पीडित महिलेला गाडीत बसण्यास सांगितले. त्यामुळे महिला गाडीत बसली. पण, याच गाडीत सुरेश लंबाटे याचा भाऊ अमोल नामदेव लंबाटे आणि बापूराव हावळे बसले होते. नंतर गाडी काही अंतरावर जाताच अमोल लंबाटे याने पीडित महिलेला मारहाण केली. त्यानंतर अमोल आणि बापूराव यांनी जबरदस्तीने धावत्या जीपमध्ये पीडित महिलेवर बलात्कार केला. सोबतच पीडितेला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
इतकेच नव्हे तर पीडिता महिलेवर अत्याचार केल्यावर तिला सुरेश लंबाटे याच्या सात्रापोत्रा गावातील घरी आणण्यात आले. याचवेळी तिथे सुरेश लंबाटेची पत्नी सविता वाट पहात थांबलेली होती. गाडी घरासमोर येताच सुरेश आणि सविता या दोघांनी मिळून पीडित महिलेस गाडीच्या खाली ओढले. तसेच सविताने प्लास्टिक पाईप आणि चप्पलने पीडित महिलेला मारहाण केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी जाऊन नेकनूर पोलिसांनी पीडित महिलेची सुटका करत, तिला बीड येथील सरकारी दवाखान्यात उपचारासाठी दाखल केले. त्यानंतर पीडितेने दिलेल्या तक्रारीनुसार, सुरेश नामदेव लंबाटे, अमोल नामदेव लंबाटे, बापूराव हावळे व सविता सुरेश लंबाटे (सर्व रा. सात्रापोत्रा, ता. बीड) यांच्याविरुद्ध बीड शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra