Monday, July 8, 2024
Homeसंपादकीयरविवार मंथनLady boss: ऐंशी वर्षांची परंपरा पुढे चालविणारी उद्योजिका

Lady boss: ऐंशी वर्षांची परंपरा पुढे चालविणारी उद्योजिका

दी लेडी बॉस: अर्चना सोंडे

८ मे १६६१ साली इंग्लंडचा राजपुत्र दुसरा चार्ल्स आणि पोर्तुगीज राजकन्या कॅथरीन यांचा विवाह झाला. हुंडा म्हणून पोर्तुगीजांनी इंग्लंडला मुंबई हे बेट दिले. तेव्हा मुंबई आतासारखं शहर नव्हतं, तर सात बेटांचा समूह होती. कुलाबा, माझगाव, परळ, वरळी, सायन, धारावी, वडाळा अशी ती सात बेटे होती. या सात बेटांवर भर टाकून ती एकसंध करण्यात आली आणि आजची मुंबई अस्तित्वात आली. या मुंबईने प्रत्येकाला आपल्या कवेत घेतलं. परिश्रम करणाऱ्या प्रत्येकाला मुंबादेवीने यश दिलं. निव्वळ श्रीमंतांची, व्यापारांची, नट-नट्यांची ही मुंबई नव्हती, तर कष्टकरी, श्रमिक, कामगार अशा प्रत्येकाची ही मुंबई होती. यातील कित्येकजणांची बिऱ्हाडे गावाकडे असायची. अशा कष्टकऱ्यांच्या उदरभरणासाठी अनेक खानावळी सुरू झाल्या. कालांतराने त्याची जागा उपाहारगृहांनी घेतली. १०० वर्षांचा कालखंड उलटूनदेखील यातील काही उपाहारगृहे आपल्या ग्राहकांची सेवा आजदेखील करत आहेत. त्यातलंच या शहराचा इतिहास जगलेलं उपाहारगृह म्हणजे ‘मॉडर्न हिंदू हॉटेल’.

१९४२ साली चले जाव चळवळ जोरात होती. इंग्रजांना आपल्या देशातून हुसकावण्याची जय्यत तयारी सुरू होती. प्रत्येक भारतीय इरेला पेटलेला. याचदरम्यान नामदेव कृष्णाजी रुमडे यांनी आत्माराम कृष्णा रुमडे यांच्या पाठिंब्याने एक उपाहारगृह सुरू केले. स्वातंत्र्याच्या चळवळीचं महत्त्वाचं केंद्र असलेल्या परळमध्ये रुमडे यांनी मॉडर्न हिंदू हॉटेल सुरू केले. सुरुवातीपासूनच व्यावसायिकता न जपता या उपाहारगृहात नामदेव रुमडेंनी आपलेपणा जपला, रुजवला, माणसं जोडली. परळ भागातील स्वातंत्र्य सैनिक, कष्टकरी, श्रमिक, गिरणी कामगार यांच्या येण्याने हे ठिकाण गजबजले. लोकांचे, लोकांसाठी उपाहारगृह असा नावलौकिक या उपाहारगृहाने कमावला.

उत्तम दर्जाचे अन्न, जिभेवर रुळणारी चव, अगत्यशील असे आदरातिथ्य या सगळ्या गुणांमुळे अल्पावधीत हे उपाहारगृह पंचक्रोशीत गाजू लागले. विविध व्यावसायिक, उद्योजक, राजकारणी, कलाकार मंडळींसाठी हे उपाहारगृह म्हणजे स्वर्गीय भोजनाचा आत्मिक आनंद देणारे ठिकाण बनले. १९८९ साली आदरातिथ्याचा हा वारसा नामदेव रुमडे यांचे नातू अजित रुमडे यांनी आपल्या खांद्यावर घेतला. आपल्या आजोबांची तत्त्वे, आपुलकी यांच्याशी कुठेही तडजोड न करता आधुनिक टच देत उपाहारगृहाची व्याप्ती वाढवली. याकामी त्यांच्या पत्नी अनुजा यांनी साथ दिली.

अजित रुमडे यांची कन्या पूजा लहानपणापासून आपले वडिलोपार्जित उपाहारगृह पाहत होती. तिला देखील या आदरातिथ्य क्षेत्रात रुची निर्माण झाली. हॉटेल व्यवस्थापन विषयाची तिने पदवी प्राप्त केली. हळूहळू आपल्या बाबांसोबत ती उपाहारगृहाच्या व्यवसायाकडे लक्ष देऊ लागली. मॉडर्न हिंदू हॉटेल हे खास ऑथेंटिक सी-फूडसाठी ओळखले जाऊ लागले. पूजा रुमडेचा विवाह ऋतुराज मोहिर या उमद्या तरुणासोबत झाला.

निव्वळ आपल्या घरातील व्यवसाय न सांभाळता पूजाने स्वत:चे उद्योजकीय जगसुद्धा निर्माण केले. तिला प्रवासाची आवड. एक प्रकारे तिचा तो छंदच होता. या छंदाला व्यवसायाचं रूप देत तिने आपल्या मैत्रिण मधुरासोबत ‘हाकूना मटाटा ट्रॅवल ॲण्ड मोअर प्रा. लि. ही पर्यटन कंपनी सुरू केली. डोमेस्टिक ॲण्ड इंटरनॅशनल, एमआयसीई, एफआयटी व्हिसा, कॉर्पोरेट ट्रॅव्हल, कस्टमाइझ्ड ट्रॅव्हल पॅकेजेस, आऊटडोअर इंटरनॅशनल इव्हेंट्स अशा सेवा ही कंपनी देते. मॉडर्न हिंदू हॉटेल हे १९४२, हॉटेल गिरीश १९४५ मध्ये, मॉडर्न वेज पॅलेट, द बर्गर ब्राजरी अशी ही उपाहारगृहांची घोडदौड सुरूच राहिली. यामध्ये ‘ओन्ली चखना’ने(क्लाऊड किचन) आणि शिवाजी पार्क जिमखाना कॅंटीनची भर पडली.

कोविड हा जगासाठी वाईट काळ होता. त्यातल्या त्यात हॉटेल इंडस्ट्रीसाठी, तर भयानक काळ होता. प्रचंड नुकसान सहन करावं लागलं होतं. मात्र या कठीण काळात मॉडर्न हिंदू हॉटेलने आपल्या कर्मचाऱ्यांना वाऱ्यावर सोडलं नाही. त्यांना कुटुंबाप्रमाणे जपलं. याचदरम्यान क्लाऊड किचनची सुरुवात केली. पूजाचे पती ऋतुराज आणि मित्र असलेला शेफ अनिश देशमुख यांच्या सहकार्याने हे क्लाऊड किचन सुरू झाले. ऑथेंटिक कोस्टल फूड, शुद्ध शाकाहारी महाराष्ट्रीयन फूड, इनोव्हेटिव्ह इंडियनाइस बर्गर्स, बार निब्बल्स ॲण्ड मंचीज हे मॉडर्न हिंदू हॉटेलचे वैशिष्ट्य आहे. सोबतच कॉर्पोरेट इव्हेंट्स, डेली टिफिन्स, हाऊस पार्टीज, बल्क ऑर्डर्ससुद्धा घेतल्या जातात.

बॉस म्हणजे जो आपल्या कर्मचाऱ्यांची काळजी घेतो. त्यांच्या स्वप्नांना पंख देतो. आपल्यासोबत इतरांची देखील प्रगती करतो. अशी पूजा रुमडे यांची व्याख्या आहे. “आपल्या यशामध्ये आपल्या ग्राहक, कर्मचारी व हितचिंतकाचा फार मोठा वाटा आहे”, असे त्या मानतात. सुमारे ऐंशी वर्षांपूर्वी आपल्या पणजोबांनी सुरू केलेला हा हॉटेल व्यवसाय सार्थपणे पुढे नेणाऱ्या पूजा रुमडे या खऱ्या अर्थाने हॉटेल उद्योगातील ‘लेडी बॉस’ आहेत.

theladybosspower@gmail.com

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -