उदय पिंगळे: मुंबई ग्राहक पंचायत
मानवी विकासाच्या दृष्टीने ऊर्जा म्हणजेच काम करण्याची शक्ती महत्त्वाची आहे. भौतिक शास्त्राच्या नियमाप्रमाणे ऊर्जा निर्माण किंवा नष्ट करता येत नाही. फक्त एका ऊर्जेचे रूपांतर दुसऱ्या ऊर्जेत करता येते. जी ऊर्जा रूपांतरित करताना पर्यावरण समस्या सहसा उद्भवत नाहीत, त्यांचे साठे शाश्वत असतात अशा ऊर्जेस हरित ऊर्जा किंवा शाश्वत ऊर्जा असे म्हणतात. जलसाठा, वेगाने वाहणारे वारे, सूर्य, समुद्राच्या लाटा, जैविक इंधन इ. हरित ऊर्जेचे(Green Energy) स्रोत मानता येतील.
पेट्रोल, डिझेल यांचे अपुरे साठे आणि ते डॉलर्स देऊन आयात करावे लागत असल्याने त्याचा अर्थव्यवस्थेवर पडणारा ताण कमी करण्यासाठी चालू अर्थसंकल्पात हरित ऊर्जेस प्रोत्साहन देण्यासाठी भरीव तरतूद केली आहे. सन २०७० पर्यंत भारत हा शून्य कार्बन उत्सर्जन करणारा देश असेल हे आपले ध्येय आहे. या वर्षीच्या अर्थसंकल्पात सरकारने आपले जे सात प्राधान्यक्रम ठरवले आहेत, त्यात हरित ऊर्जेचा प्राधान्य क्रमांक पाचवा आहे. असे उच्च ध्येय मनाशी ठेवून आपण त्या दिशेने वाटचाल करण्यास सुरुवात केली आहे.
याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून आपण सन २०२२ मध्ये सौर ऊर्जेचे आणि ती साठवून ठेऊ शकणाऱ्या वस्तूंची निर्मिती करण्यास प्रोत्साहन दिले. सन २०३० पर्यंत ५०० जीडब्ल्यू एवढी सौर ऊर्जा आपल्या वापरात असेल (१ जीडब्ल्यू म्हणजे १००० दशलक्ष वॅट). असा संकल्प आपण गेल्या वर्षी केला, तेव्हा १७३ जीडब्ल्यू एवढी सौर ऊर्जा वापरात होती त्याच्या आपण याचा वापर तिप्पट करणार आहोत. सध्या ८० जीडब्ल्यू सौर ऊर्जा निर्मितीच्या प्रकल्पाची उभारणी चालू आहे. या वर्षापासून दरवर्षी ३० ते ३५ जीडब्ल्यूचे प्रकल्प अस्तित्वात आले, तर आपले उद्दिष्ट दोन वर्षे आधीच म्हणजे सन २०२८ रोजी पूर्ण होऊ शकते.
या क्षेत्रातील गुंतवणुकीत सध्या मोठ्या प्रमाणत परकीय गुंतवणूक येत असून ही गुंतवणूक वीज निर्माण करणे आणि साठवून ठेवणे यासाठी लागणाऱ्या साधनसामग्रीच्या निर्मितीच्या गुंतवणुकीत आहे. त्यामुळेच इतर क्षेत्रांच्या तुलनेत येथे भरीव वाढ होत आहे. देशांतर्गत आणि परदेशात जेथे ग्रीन हायड्रोजन प्रकल्प होऊ घातले आहेत त्यातील अडथळे बाजूला करण्याचे काम चालू आहे. सौर ऊर्जेखालोखाल पवन ऊर्जानिर्मिती क्षेत्रांस येणाऱ्या अडचणी सोडवण्याचे प्रयत्न चालू आहेत.
हरित ऊर्जा निर्मिती क्षेत्रात सर्वात मोठा अडथळा म्हणजे प्रकल्प निर्मितीसाठी येणारा प्रचंड खर्च. त्या मानाने त्यातून निर्माण झालेली ऊर्जा स्पर्धात्मक दराने विकावी लागते. त्यामुळे त्यातून मिळणारे उत्पन्न एक गुंतवणूकदार म्हणून गुंतवणूक करणाऱ्याच्या दृष्टीने कमी आकर्षक आहे. अगदी साधे उदाहरण द्यायचे झाल्यास १ एमडब्ल्यू सौर ऊर्जा निर्माण करण्यासाठी प्रकल्प स्थानानुसार ४ ते ५ कोटी रुपये गुंतवणूक करावी लागते, तर पवन ऊर्जेसाठी हाच खर्च ७.५ ते ८.२ कोटी रुपये आहे. यातून निर्माण झालेली वीज बाजारात स्पर्धात्मक दराने विकावी लागते. वीज कशापासून निर्माण झाली हा प्रश्न विकताना येत नाही. त्या दृष्टीने जलविद्युत निर्मितीतील गुंतवणूक खर्च खूप कमी आहे. त्याचप्रमाणे ऊर्जानिर्मिती ते वितरण केंद्र आणि ग्राहक यांच्याकडे नेण्यासाठी होणारा खर्च आणि वहनातून होणारी घट हा मोठा प्रश्न आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात सुयोग्य जागा लागत असल्याने आणि आता सर्वच ठिकाणी जागृती वाढल्याने जमीन अधिग्रहण करण्यात मोठे अडथळे निर्माण होऊन प्रकल्प खर्चात वाढ होते. आधीच हे प्रकल्प खूप खर्चिक असल्याने त्यातून फायदा मिळण्यास अधिक कालावधी लागतो.
यादृष्टीने सर्वच प्रकारातील हरित ऊर्जा अधिक किफायतशीर कशी करता येईल या दृष्टीने संशोधन चालू असून त्याचे परिणाम सकारात्मक आहेत. त्याचप्रमाणे ही ऊर्जा पर्यावरण स्नेही असल्याने त्यास अधिकाधिक प्रोत्साहन देणे हे सरकारी धोरण आहे. यासाठी यातील गुंतवणूक ही पायाभूत क्षेत्रातील गुंतवणूक समजली जाते.
- यासाठी स्वतंत्र फायनान्स कंपन्याही आहेत. कर्ज देताना या कंपन्या स्वतःची भांडवली गुंतवणूक देखील करीत आहेत.
- प्रकल्प उभारणीसाठी लागणाऱ्या वस्तूंवर कमी दराने कर आकारणी होते.
- यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानात संशोधन होऊन सुधारणा होत आहे त्याचा लाभ कंपन्यांना घेता येतो.
- प्रकल्पाची जमीन घेताना भरपाई कशी द्यायची याचे एकसमान सूत्र बनवण्यात आले आहे.
- असे प्रकल्प ही देशाची प्राथमिक गरज समजून त्यातील अडथळे प्राधान्याने दूर करण्याची व्यवस्था आहे.
- ऊर्जा विक्रीसाठी काही अटींवर रिव्हर्स बिडिंग प्रक्रिया राबवली जाते. यामुळे उत्पादकास अधिक दर मिळण्याची शक्यता असते.
- या कंपन्यांना कमी व्याजदराने भांडवल उपलब्ध व्हावे म्हणून दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्यातून सवलत मिळेल असे रोखे काढण्याची परवानगी मिळावी आणि सध्या अशी सवलत असलेल्या रोख्यावर असलेली उच्चतम ५० लाख रुपयांची मर्यादा रद्द करावी या दृष्टीने प्रयत्न सुरू आहेत.
या पार्श्वभूमीवर शेअरबाजारात हरिता ऊर्जा क्षेत्रातील अस्तित्वात असलेल्या काही आघाडीच्या कंपन्या:
- झोडियाक एनर्जी
- के. पी. एनर्जी
- बोरोसिल रिन्यूएबल
- वेबसोल एनर्जी सिस्टीम
- अडाणी ग्रीन एनर्जी
- सुझुलॉन
- एनटीपीसी
- एनएचपीसी
- आयइएक्स
- पीटीसी इंडिया
यातील शेवटच्या चार कंपन्या या सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्या आहेत, याशिवाय अजून किमान १५ कंपन्या शेअरबाजारात नोंदण्यात आल्या आहेत. त्याचा विचार या क्षेत्राचा तुलनात्मक अभ्यास करताना करता येईल. ही माहिती केवळ या क्षेत्राविषयी जागरूकता निर्माण व्हावी या हेतूने दिलेली असून तो गुंतवणूक सल्ला समजू नये.