आमदार नितेश राणे यांचा जोरदार प्रहार
मुंबई : छत्रपती शिवराय हेच महाराष्ट्राचे खरे कुटुंब प्रमुख आहेत. अडीच वर्षे गळ्याला पट्टा लावून घरात बसून स्वतःच्या कुटुंबाचे खिसे भरले त्याला महाराष्ट्राचा कुटुंब प्रमुख म्हणू नये, असे म्हणत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर जोरदार प्रहार केला.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. त्या मुलाखतीचा प्रोमो प्रसिद्ध करण्यात आला आहे. यावरुन नितेश राणेंनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.
राणे म्हणाले की, अण्णा हजारेंना मशाल हाती घ्यायला सांगणे ही उबाठा गटावर आलेली वाईट वेळ आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी अण्णा हजारेंना वाकड्या तोंडाचा गांधी असे म्हटले होते. आणि आता तेच लोक अण्णा हजारेंना आंदोलन करायला सांगत आहेत. अण्णा हजारेंनी मातोश्री बाहेर आंदोलन करावे, सगळ्यात मोठा भ्रष्टाचारी मातोश्रीत बसलाय, असे राणे म्हणाले.
मुंबईत आलेल्या २६ जुलैच्या महापुरात बाळासाहेबांना एकटे टाकून उद्धव ठाकरे फॅमिली सोबत ताज हॉटेलमध्ये राहत होते. त्यावेळी मला हॉटलेच्या लॉबीमध्ये रश्मी ठाकरे भेटल्या होत्या. उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या विचारांवर कलंक आहे. उद्धव ठाकरेंनी संजय राऊतऐवजी राणेंकडून मुलाखत घेऊन दाखवावी तर कळेल आवाज कुणाचा, अशा शब्दात त्यांनी ठाकरेंना इशारा दिला.
तसेच बाबरी पाडली तेव्हा उद्धव ठाकरे मातोश्रीच्या एका खोलीत कॅमेरा साफ करत होते. त्यामुळे त्यांनी बाबरी या विषयावर बोलू नये. बाळासाहेब ठाकरे व इतर मातब्बर शिवसैनिकच या विषयावर बोलू शकतात, असे म्हणत राणेंनी ठाकरेंवर हल्लाबोल केला.