Friday, July 19, 2024
Homeताज्या घडामोडीआजपासून शेतीच्या पंचनाम्यांना सुरूवात

आजपासून शेतीच्या पंचनाम्यांना सुरूवात

पेण : मागील आठवडाभर कोसळत असणाऱ्या मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांच्या शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे. पेण तालुक्यात देखिल अशाच प्रकारे शेतीचे अतोनात नुकसान झाले असून हजारो हेक्टर जमीन ही पाण्याखाली गेल्याने संपुर्ण शेती कुजण्याच्या मार्गावर आहे. याच सर्व परिस्थितीचा विचार करून आजपासून पेण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम कृषी आणि महसूल विभागाच्या माध्यमातून सुरु करण्यात आले आहे.

याबाबतचे निवेदन आज रायगड जिल्हा भाजपचे उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांच्या माध्यमातून पेण तहसिल कार्यालयात सादर करण्यात आले आहे. यावेळी बोलताना वैकुंठ पाटील यांनी भाजप आमदार रवीशेठ पाटील यांच्या माध्यमातून पेण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीचे सरसकट पंचनामे करण्यात येतील, अशी ग्वाही तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर दिली.

यावेळी भाजपचे रायगड जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील, भाजप पेण तालुका अध्यक्ष श्रीकांत पाटील, सरपंच शिवाजी पाटील, सुर्याहास पाटील यांसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

रायगड जिल्ह्यातील पेण हे भाताचे कोठार समजले जाते. या तालुक्यातील जवळपास साठ टक्के नागरीक हे शेती आणि मासेमारी यावर आपली उपजीविका करतात. तर पेण हे श्री गणेश मूर्तीचे माहेरघर आहे. मात्र मागील आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसामुळे या भागातील हजारो हेक्टर शेत जमीन ही पाण्याखाली गेली आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांचे जीवनमान खालावले आहे. त्याचप्रमाणे शेती बरोबरच या भागातील शेततळी सुध्दा वाहून गेल्याने शेती बरोबरच या शेततळ्यांचे देखील पंचनामे करण्यात येणार आहेत. भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी झालेल्या अतिवृष्टीनंतर तातडीने खारेपाट भागातील शेतीच्या नुकसानीची तसेच गणेश मुर्तिकारांच्या पाण्याखाली गेलेल्या मूर्तींची पाहाणी केली. ही पाहणी केल्यानंतर आमदार रवीशेठ पाटील यांनी देखील दोन दिवसांपूर्वी पाहणी केली आणि तातडीने पंचनामे करून घेण्याचे आदेश संबंधीत अधिकाऱ्यांना दिल्यानंतर आजपासून आमदार रवीशेठ पाटील यांच्या माध्यमातून या पंचनाम्यांना सुरूवात होणार आहे. तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांचे सरसकट पंचनामे करण्यात येतील असे वैकुंठ पाटील यांनी सांगितले. याशिवाय तालुक्यातील शेततळी आणि गणपती कारखानदारांच्या झालेल्या नुकसानीचे देखील शासनाच्या आदेशानुसार लवकरात लवकर पंचनामे करून त्यांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असल्याचे वैकुंठ पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. यावेळी पेण खारेपाट विभागातील शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीबाबत तहसिल कार्यालयात निवेदन देण्यात आले.

नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यातील खारेपाट भागातील शेतकऱ्यांची शेती ही पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्याने पेरलेले राब कुजुन जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे आम्ही केलेल्या पाहणीनंतर आजपासुन तातडीने हे पंचनामे सुरु करत असून तालुक्यातील शेततळ्याचे देखील मत्स्य विभागामार्फत पाहणी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे. – सागर वाडकर, तालुका कृषी अधिकारी, पेण

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -