अर्थ जगतातल्या ताज्या घडामोडींमुळे बदलते अर्थचित्र पाहायला मिळत आहे. अलीकडेच अडचणीत सापडलेली अमेरिका दिवाळखोरीपासून वाचली; परंतु या देशात बेरोजगारी कशी वाढली हे समोर आले. याच सुमारास निर्यातीला लगाम लागल्यामुळे भारतात व्यापार तूट कशी वाढली हेही पाहायला मिळाले. दरम्यान, अवघ्या जगात भारताच्या सॉफ्टवेअर क्षेत्राची मोहिनी कशी पसरली आहे, याचे एक उदाहरण नवी दृष्टी देणारे ठरले.
सरत्या आठवड्यामध्ये जगभराचे अर्थचित्र नव्याने समोर आले. आर्थिक जगतातल्या विविध घडामोडींमुळे ते जवळून पाहायला मिळाले. आर्थिक अलीकडेच अडचणीत सापडलेली अमेरिका दिवाळखोरीपासून वाचली; परंतु या देशात बेरोजगारी कशी वाढली हे समोर आले. याच सुमारास निर्यातीला लगाम लागल्यामुळे भारतात व्यापार तूट कशी वाढली हेही पाहायला मिळाले. दरम्यान, अवघ्या जगात भारताच्या सॉफ्टवेअर क्षेत्राची मोहिनी कशी पसरली आहे, याचे एक उदाहरण नवी दृष्टी देणारे ठरले.
अमेरिकेत आतापर्यंत कंपन्यांनी युवकांनी चार लाख १७ हजार नोकऱ्या गमावल्या आहेत. गेल्या वर्षी याच कालावधीत एक लाख ६९४ नोकऱ्या गमावल्या होत्या. त्यामध्ये ३१५ टक्क्यांची वाढ झाली आहे. अमेरिकेने स्वतःला डिफॉल्टर होण्यापासून वाचवले आहे; परंतु नोकरी कपात काही थांबली नाही. एप्रिल आणि मे महिन्यात सुमारे दीड लाखजण बेरोजगार झाले आहेत. मे महिन्यामध्ये एप्रिलच्या तुलनेत सुमारे १३ हजार अधिक नोकऱ्या गेल्या. गेल्या वर्षी आणि यंदा नोकऱ्या जाण्याची तुलना केल्यास चारपट जादा नोकऱ्या यंदा गेल्या आहेत. अमेरिकेत मंदी सुरू झाली आहे. मे महिन्यात आर्टिफिशीयल इंटेलिजन्सने सुमारे तीन हजार ९०० कर्मचाऱ्यांना बेरोजगार केले आहे. ‘एक्झिक्युटिव्ह कोचिंग फर्म चॅलेंजर’, ‘ग्रे अँड क्रिसमस इंक’नुसार अमेरिकी कंपन्यांनी मे महिन्यामध्ये २०२२ मधला बेरोजगारीचा विक्रम तोडला. नोकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कपात होत आहे. अमेरिकी ‘इम्पायर्स’ने मेमध्ये ८० हजार ८९ लोकांना नोकरीवरून कमी केले.
गेल्या वर्षी याच महिन्यात २० हजार ७१२ कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले होते. याचा अर्थ गेल्या वर्षीच्या तुलनेत नोकरकपातीची टक्केवारी २८७ टक्के दिसते. यंदा एप्रिलमध्ये अमेरिकी कंपन्यांनी ६६ हजार ९९५ कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढले. रिपोर्टनुसार, गेल्या महिन्यात ८० हजारांपेक्षा अधिक कर्मचाऱ्यांना नोकरीतून काढण्यात आले. त्यापैकी तीन हजार ९०० लोकांना आर्टिफिशीयल इंटेलिजन्समुळे नोकरी गमवावी लागली. ‘रिटेल सेक्टर’मध्ये मे महिन्यात ९ हजार ५३ जणांना कमी करण्यात आल्याचे जाहीर केले गेले आहे. ‘रिटेल सेक्टर’ने या वर्षी आतापर्यंत ४५ हजार १६८ जणांची कपात केली आहे. मीडिया इंडस्ट्रीमध्ये २०२३ मध्ये आतापर्यंत १७ हजार ४३६ जणांची कपात करण्यात आली आहे. ‘बँकिंग सेक्टर’मध्येही नोकरकपात सुरू आहे. या क्षेत्रात मे महिन्यात ३६ हजार ९३७ जणांच्या नोकरकपातीची घोषणा केली होती. ‘हेल्थकेअर’, ‘प्रोडक्ट मेकर्स’नेदेखील मे महिन्यात ३३ हजार ८५ कर्मचाऱ्यांची कपात केली.
आता बातमी देशाच्या आघाडीवरची. मे महिन्यात देशाच्या व्यापारी तुटीत वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यातील १५.२४ अब्ज डॉलरच्या तुलनेत मे महिन्यात व्यापार तूट २२.१२ अब्ज डॉलर राहिली आहे. डिसेंबर २०२२ नंतर मे २०२३ मधील व्यापार तूट सर्वाधिक आहे. डिसेंबर २०२२ मध्ये व्यापार तूट २३.७६ अब्ज डॉलर होती. गेल्या वर्षी मे २०२२ मध्ये व्यापार तूट २४.२९ अब्ज डॉलर राहिली होती. देशाची आयात मे २०२३ मध्ये ६.६ टक्क्यांनी घसरून ५७.१ अब्ज डॉलर झाली आहे तर निर्यात १०.३ अब्ज डॉलरने घसरून ३४.९८ अब्ज डॉलर झाली. एप्रिल महिन्यात एकूण ३४.६६ अब्ज डॉलरची निर्यात झाली. वाणिज्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सेवांची निर्यात जोडल्यास मे २०२३ मध्ये एकूण निर्यात ६०.२९ अब्ज डॉलर झाली. एका वर्षापूर्वी मे २०२२ मध्ये हा आकडा ६४.१३ अब्ज डॉलर होता. सेवांसह मे २०२३ मध्ये ७०.६४ अब्ज डॉलरची आयात झाली आहे. एका वर्षापूर्वी मे २०२२ मध्ये हाच आकडा ७६.३२ अब्ज डॉलर होता. मे महिन्यात सेवा निर्यातीचे मूल्य २५.३० अब्ज डॉलर होते. मे २०२२ मध्ये २५.१३ अब्ज डॉलर होते. सेवांची आयात मे २०२३ मध्ये १३.५३ अब्ज डॉलर राहिली आहे. मे २०२२ मध्ये सेवांची आयात १५.२० अब्ज डॉलर होती. सेवा आणि वस्तू एकत्र केल्यास मे २०२३ मध्ये व्यापार तूट १०.३५ अब्ज डॉलर राहिली आहे. एका वर्षापूर्वी हा आकडा १२.२० अब्ज डॉलर इतका होता. निर्यात वाढली की डॉलर्समध्ये कमाई होते आणि आयात अधिक झाल्यास जास्त डॉलर्स खर्चावे लागतात. निर्यातीतून होणारी कमाई आणि आयातीवर होणारा खर्च यामधील तफावत म्हणजे चालू खात्यातील तूट. तेल दरवाढ आणि रशिया-युक्रेन युद्ध हे भारताच्या आर्थिक स्थैर्यासमोरील मोठे आव्हान आहे. भारताने निर्यातीतून कमावलेले उत्पन्न ३८३८ कोटी डॉलर्स होते. याआधी कोरोनाकाळात आपले निर्यात उत्पन्न ३४ टक्क्यांनी गडगडले होते. त्याच वेळी भारताने आयात केलेल्या उत्पादनांचे मूल्य ५८११ कोटी डॉलर्स इतके आहे. याचा परिणाम असा की गेल्या महिन्यात आपली उत्पादित वस्तुमालाची व्यापार तूटही चांगलीच वाढली. तिचे मूल्य १९७३ कोटी डॉलर्स इतके आहे. संपूर्ण वर्षाचा विचार करू गेल्यास आपली व्यापार तूट २६ हजार ६७८ कोटी डॉलरवर जाऊन पोहोचल्याचे या आकडेवारीवरून दिसते. ही तूट गेल्या वर्षी १९ हजार १०० कोटी डॉलर्स इतकी होती. जागतिक व्यापारात आलेले मंदत्व यास जबाबदार आहे, असे सांगण्याची सोय आपणास यानंतरही आहेच. जागतिक मंदीमुळे निर्यात कमी झाली, हे एक कारण सांगितले जाते; परंतु आता चिंतेची बाब अशी की नवीन क्षेत्रात आपली निर्यात घटली आहे. दागदागिने, हिरे-जडजवाहीर हे आपले निर्यातीचे हुकमी घटक. तसेच बांगलादेशनंतर आपल्या ‘टेक्स्टाइल’ला जागतिक पातळीवर मोठी मागणी असते; परंतु आता नेमक्या याच क्षेत्रातील निर्यात आता घटायला लागली आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रातील सोलापूर, इचलकरंजी, मालेगावच्या हातमागावर व्हायला लागला आहे.
दरम्यान, सॉफ्टवेअर क्षेत्रातले ताजे वास्तव अलिकडे उलगडले. दोन दशकांपूर्वी विविध शहरांमध्ये ‘कॉल सेंटर्स’ सुरू होऊ लागली, तेव्हा भारताला जगाचे ‘बॅक ऑफिस’ म्हटले जाऊ लागले; पण भारत आता त्या स्थितीपासून खूप पुढे आला आहे. भारताच्या तंत्रज्ञानाने ‘एरोस्पेस’ आणि ऑटोमोबाइल क्षेत्रातही आपले अस्तित्व प्रस्थापित करण्यास सुरुवात केली आहे. जटिल डिजिटल तंत्रज्ञान आणि अल्गोरिदम वाहने आणि विमानांमध्ये वापरले जातात. ‘एरोस्पेस’ कंपन्या आपला व्यवसाय वाढवत आहेत आणि भारत त्यांना प्रतिभावान डिजिटल अभियंते देत आहे. वाहनांमधील सॉफ्टवेअर सामग्रीच्या वाढत्या मागणीमुळे ऑटो कंपन्यांसाठी भारत डिजिटल अभियांत्रिकी आणि प्रतिभेचा स्रोत म्हणून उदयाला आला आहे. आज भारतीय सॉफ्टवेअरशिवाय जगाची वाटचाल शक्य नाही, असे म्हणणे अतिशयोक्ती ठरेल; पण आज जग भारताच्या सॉफ्टवेअरवर चालते, असे म्हणणे योग्य ठरेल.
‘जेपी मॉर्गन इक्विटी रिसर्च’च्या अलीकडील अहवालात म्हटले आहे की रेनॉल्ट, बीएमडब्ल्यू, जॅग्वार लँडरोव्हर आणि होंडा यांसारख्या कंपन्या आवश्यक डिजिटल सामग्री भारतातून मिळवत आहेत. मागणी इतकी जास्त आहे की गेल्या वर्षी ‘एल अँड टी’ला अमेरिकेतील कंपनीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी पोलंडमध्ये वितरण केंद्र उघडावे लागले. कंपनी अभियांत्रिकी आणि विकास सेवा प्रदान करते. त्याचप्रमाणे बोईंग आणि एअरबससारख्या कंपन्यादेखील भारतातील उच्च-कुशल आणि कमी किमतीच्या अभियंत्यांवर बँकिंग करत आहेत. जगातील मोठमोठ्या कंपन्यांनी भारतात आपली उत्कृष्ट केंद्रे उघडली आहेत. भारत ही वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था २०३० पर्यंत एक ट्रिलियनच्या पुढे जाईल. येथून दर वर्षी १५ लाख अभियांत्रिकी विद्यार्थी उत्तीर्ण होतात. बोईंगला ‘सिएटल’मधील अभियंत्यासाठी जेवढे पैसे द्यावे लागतात, त्याच्या केवळ सात टक्के खर्चात बंगळूरुमध्ये अभियंता मिळतो. बोईंगकडे अमेरिकेबाहेर भारतात सर्वाधिक कर्मचारी आहेत. ‘बोईंग’ने भारतात २००० मध्ये ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सुरू केली. आज ‘एरोस्पेस’ क्षेत्रातील प्रत्येक कंपनीचे भारतात अस्तित्व आहे. विमान हे आज एक डिजिटल उत्पादन बनले आहे आणि विमान उत्पादक कंपन्यांना सॉफ्टवेअर, सिम्युलेशन आणि इलेक्ट्रॉनिक्स सेवा देण्यामध्ये भारतातील दर्जेदार प्रतिभा आवश्यक आहे. विमान इंजिन बनवणाऱ्या ‘प्रॅट अँड व्हिटनी’च्या कंट्री हेड अश्मिता म्हणतात की, भारताकडे जगाला देण्यासाठी प्रतिभा, संशोधन, नावीन्य आणि अभियांत्रिकी उत्पादकता आहे. जगातील सर्वात मोठी कंपनी ‘जीई’च्या बंगळूरु येथील सर्वात मोठ्या संशोधन केंद्रात विमान इंजिनच्या डिझाइनमध्ये भारतीय अभियंत्यांची महत्त्वाची भूमिका आहे. हे इंजिन इंधनाचा वापर २० टक्के कमी करेल. एकूणच आज जग भारताच्या सॉफ्टवेअरवर चालते असे म्हणणे योग्य ठरेल.
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…