-
ओंजळ: पल्लवी अष्टेकर
रजनीताईंना वाचनाचा छंद आहे व तो त्यांनी आवडीने जोपासला आहे. निगर्वी अशा रजनीताईंनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांच्या पुण्याईला दिले आहे.
माझी व रजनीताईंची शालेय वयापासून ओळख. तेव्हापासून माझे त्यांच्या घरी येणे-जाणे असायचे. अनेक वर्तमानपत्रांतून त्यांचे लेखनासंदर्भात नाव झळकायचे. पण पाय मात्र जमिनीवर. आपण काही फार मोठे करतोय, असा आविर्भाव त्यात नसायचा. कोल्हापुरातील खरी कॉर्नर, देशपांडे गल्ली येथे त्यांचे सुंदरसे घर आहे. गल्लीतील एकमेकांशी मिळून-मिसळून वातावरण पाहिले की, छान वाटायचे.
रजनीताईंचे आगत-स्वागतही मस्त असायचे. लिंबू-सरबत, कैरीचे पन्हे, चिवडा-चकली अशा पदार्थांच्या रेलचेलीमधून गप्पा सुरू व्हायच्या. पुढे मी कॉलेजात गेल्यावर आमची मैत्री आणखीनच खुलली. दोघींची क्षेत्रे समान – ‘साहित्य’. अर्थातच रजनीताईंचा या क्षेत्रातील व्यासंग दांडगा! अफाट वाचन! तर मी साहित्य क्षेत्रात नुकतेच पाऊल टाकले होते. कविता, बालकथा, एकांकिका, ललित, चरित्र, प्रासंगिक, नृत्यगान अशा स्वरूपात लेखन झाले. आज ताईंची ७८ पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत.
त्या आठवीत असतानाच वडिलांचे मायेचे छत्र हरवले. त्या धरून घरात सहा भावंडं; परंतु त्यांच्या आईने कष्टाळूपणाची व जिद्दीची साथ सोडली नाही. त्यामुळे मुलांना चांगले शिक्षण मिळाले. घरची परिस्थिती बिकट होती. मात्र संकटातून मार्ग काढत भावंडांनी मिळतील तशा नोकऱ्या पत्करल्या. रजनीताई स्वावलंबनातून एम.ए. बी.एड. झाल्या. खरं तर ही नक्कीच कौतुकाची बाब होती. कारण, त्या काळात उत्तम आर्थिक परिस्थितीतील विद्यार्थी पुढे महाविद्यालयीन शिक्षण घेण्यास जात. रजनीताईंचा जन्म १४ नोव्हेंबर! हा दिवस देशभरात ‘बालदिन’ म्हणून साजरा केला जातो आणि नेमक्या या दिवशी जन्मलेल्या रजनीताईंचे बाल-साहित्यातील योगदान हे निश्चितच खूप मोठे आहे. कोल्हापुरातील नामांकित न्यू एज्युकेशन सोसायटीच्या न्यू हायस्कूल या आद्यप्रशालेत त्यांनी १९७५ पासून अध्यापन कार्य सुरू केले. रजनीताईंसोबत गप्पा करता-करता जुन्या आठवणींना उजाळा मिळतो. त्या म्हणतात, “आमचा एक काळ असा होता की, वडिलांचा आधार तुटल्यावर आम्हाला आई तांदळाची पेज करून वाढायची. पण आईकडून आम्हा सर्व भावंडांना असे संस्कार मिळाले की, ‘आहे त्या परिस्थितीत समाधान मानायचे.’ आईचे हे संस्कार आता आयुष्यभर उपयोगी पडत आहेत.”
आपल्या जुन्या घराबद्दल ओढ व्यक्त करताना रजनीताई म्हणतात की, “आमचं जुनं घर खूपच छान होतं. आम्ही घरातल्या जमिनी शेणानं सारवायचो. आमच्या परड्यात आम्ही मांडव घालून तोंडली व घोसावळीचे वेल चढवलेले असायचे. केळी, कर्दळी, कागदी लिंबाचे झाड, फुलझाडं होती. मोगरीचा मोठा वेल होता. उन्हाळ्यात मोगरीच्या वेलीला सुगंधी, टपोरी, पांढरी फुलं यायची. उन्हाळ्यात वाळवणं असायची; परंतु खरोखरंच संकटे असली तरी आमचा बालपणीचा काळ सुखाचा म्हणावा लागेल. कारण, खेळणे, पळणे, समाजात मिसळणे या गोष्टींचा आम्ही मनमुराद आनंद लुटला. शिक्षणाचं ओझं वाटायचं नाही. एकापाठोपाठ एक क्लास नसायचे. असे तणावरहित वातावरण उपभोगण्यात जी गंमत होती, ती हल्लीच्या काळातील मुले कमी प्रमाणात उपभोगतात असे वाटते.”
सध्या काळाचे वर्णन करताना त्या म्हणतात, “आधुनिक काळात सर्व बाबतीत खूप स्पर्धा आहे. असंख्य नवनवीन कोर्सेस निघत आहेत. पूर्वीच्या काळात एसएससीनंतर टायपिंग वगैरे करून नोकऱ्या मिळायच्या. तो काळ समाधानाचा आनंदाचा होता एवढे निश्चित. पैसा, प्रतिष्ठा, मोठेपणा या पलीकडे माणुसकीची नाती जपली जायची. अडीअडचणीला परस्परांच्या मदतीला धावून जाण्यात नि:स्वार्थीपणाची भावना यायची.” अर्थातच रजनीताईंना वाचनाचा छंद आहे व तो त्यांनी आवडीने जोपासला आहे. निगर्वी अशा रजनीताईंनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांच्या पुण्याईला दिले आहे. परमेश्वराविषयी आम्ही सर्व कृतज्ञ आहोत, असे त्या म्हणतात. मानवाचा जीवनपट हा सुख-दुःखाच्या धाग्यांनीच विणला जातो, याची जाणीव आहे.
पुरस्कार, गौरव म्हणजे आपल्या कामाची पोचपावती. रजनीताईंच्या ‘चॉकलेटवाली’ या बालकविता संग्रहास पुण्याच्या साहित्यप्रेमी भगिनी मंडळाचा उत्कृष्ट बालकवितांसाठी पुरस्कार मिळाला. आदरणीय साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांच्या हस्ते राधानगरीत रजनीताईंना ‘मायबोली’ पुरस्काराने गौरविण्यात आले. रजनीताईंना मिळालेल्या पुरस्कारांची संख्या ३० पेक्षा अधिक आहे. “लेखनामुळे मी दूरवर पोहोचले यात मला समाधान आहे” असे त्या म्हणतात. रजनीताई यांच्याबद्दल त्यांच्याच भाषेत सांगायचं तर, ‘कुठंतरी थांबायला हवं, जीवनानं खूप काही दिलं, खूप काही शिकवलं, सुख-दुःखाचा मेळ घालत आनंद प्रवास सुरू आहे…!’
एके दिवशी मी ‘संधीकाली या अशा ‘हे आत्मनिवेदनात्मक छोट्या लेखांचे पुस्तक वाचायला घेतले, तेव्हा ‘स्मृती जागवताना’ हा दीप्ती कुलकर्णी यांचा लेख मनः पटलावर स्पर्शून गेला, म्हणून मी त्यांच्याशी व्हॉट्सअॅपवर संपर्क साधला. तेव्हा त्यांचा लेख वाचून मी त्यांना प्रश्न विचारला, “दीप्ती ताई, तुम्ही सर्व कौटुंबिक जबाबदाऱ्या, आपला शिक्षकी पेशा, सामाजिक भान सांभाळून आयुष्यातील प्रत्येक गोष्टीकडे इतके सकारात्मक कसे पाहू शकलात?’’ त्यावर त्यांनी मला एक सुंदर उत्तर दिले. त्या म्हणाल्या, “मी सकारात्मक व आशावादी दृष्टिकोन ठेवते. ईश्वरावर माझा पूर्ण भरवसा आहे. त्यामुळेच मला कोणत्याही प्रसंगी एक आत्मीक बळ मिळते व जीवनाची वाटचाल सुसह्य होते.”
अशा तऱ्हेने आमची मैत्री सुरू झाली. दीप्तीताईंची शालेय कारकीर्द कळे विद्यामंदिर व ज्यु. कॉलेज, कळे येथून १९८६ मध्ये सुरू झाली. त्या सांगतात, “मी विज्ञान शिक्षिका असले तरी साहित्यात रुची असल्याने विद्यार्थ्यांना प्रार्थनोत्तर भाषणे, बोधकथा सांगणे हा माझ्यासाठी आनंददायी उपक्रम होता. सदैव उभे राहून शिकवणे मला आवडायचे. कारण, आपल्याही मुलांना कोणीतरी शिक्षक उभे राहून शिकवतात, याची मला नेहमी जाणीव असायची. शाळेत विविध उपक्रम राबविताना, विद्यार्थ्यांसोबत जगताना खूप छान वाटायचे. एका निरागस, संस्कारक्षम विश्वात मन रममाण व्हायचे. दीप्तीताईंनी आपल्या शिक्षकांच्या मदतीने शाळेत अनेक उपक्रम राबविले. पर्यावरण प्रेमापोटी वृक्षदिंडी, वृक्षारोपण, बीज संकलन, बी-विखुरण असे अनेक उपक्रम त्यांनी राबविले. विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी कळवळा निर्माण व्हावा, वसुंधरेचे रक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे, अशी भावना मुलांमध्ये निर्माण व्हावी यासाठी काम करणे त्यांना आवडायचे. विद्यार्थ्यांसाठी नैसर्गिक रंग निर्मितीची कार्यशाळा घेऊन नैसर्गिक रंगात रंगपंचमी उपक्रम घेतला. दीप्तीताईंना, आदर्श शिक्षक पुरस्कार, कवी भूषण पुरस्कार तसेच बालसाहित्य स्पर्धेत विज्ञान विभागातील श्री. बा. रानडे पुरस्कार (राज्यस्तरीय) ‘असे शोध असे संशोधक’ या पुस्तकास मिळाले आहे. ‘कलमवाली बाई’ यांचे काम समाजप्रबोधनाचे आहे. आपल्या लेखणीतून या दोघी सखी हे काम पार पाडत आहेत.