Wednesday, June 10, 2026

Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरात मोठी घसरण , ग्राहकांना दिलासा; जळगावच्या सराफ बाजारात आजचे दर किती ?

Gold Silver Rate : सोने चांदीच्या दरात मोठी घसरण , ग्राहकांना दिलासा; जळगावच्या सराफ बाजारात आजचे दर किती ?

Gold Silver Rate : गेल्या काही दिवसांपासून सोने चांदीच्या दरात चढउतार पहायला मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागल्याचं चित्र आहे. अशातच सोने,चांदी खरेदी करू इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी एक मोठी आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत वाढत असणारे सोने आणि चांदीचे भाव हे आज चांगलेच घसरले आहेत.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्या आणि चांदीच्या दरात विक्रमी घसरण झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. ज्यांना सोने खरेदी करण्याची इच्छा होती त्यांना खरेदी करण्याची संधी मिळाली आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढणाऱ्या सोने आणि चांदीच्या किमतींना आता ब्रेक लागला असून, मौल्यवान धातूंच्या दरात लक्षणीय घसरण नोंदवली गेली आहे. चला जाणून घेऊया आज 10 ग्रॅम सोन्यासाठी किती रुपये मोजावे लागणार...

सोन्याचे आजचे दर

मंगळवारी जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत १२३६ रुपयांची वाढ झाल्याने २४ कॅरेट सोन्याचे दर हा तीन टक्के जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५६,२५१ रुपयांपर्यंत पोहचले होता. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर ३८११ रुपयांची घट नोंदविण्यात आली. त्यामुळे सोने जीएसटीसह प्रति १० ग्रॅम १,५२,४४० रुपयांपर्यंत खाली आले आहे. (Gold Silver Rate )

चांदीचे आजचे दर

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मंगळवारी कोणतीच वाढ अथवा घट नोंदविण्यात न आल्याने चांदीचे दर तीन टक्के जीएसटीसह प्रति किलो २,५६,४७० रुपयांपर्यंत स्थिर होते. मात्र, दुसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी सकाळी बाजारपेठ उघडल्यावर तब्बल १०,३०० रुपयांची घट झाल्याने चांदी जीएसटीसह प्रति किलो २,४६,१७० रुपयांपर्यंत घसरली. (Gold Silver Rate )

सोने चांदीच्या घसरणीचे कारण काय ?

आंतरराष्ट्रीय बाजारातील नकारात्मक संकेत, गुंतवणूकदारांकडून झालेली नफा-वसुली आणि विक्रीचा वाढलेला दबाव यामुळे सोने-चांदीच्या किमती खाली आल्याचे बोलले जात आहे. वाढत्या दरांमुळे खरेदी पुढे ढकलणाऱ्या ग्राहकांना मात्र यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरात प्रति औंस तब्बल १६० डॉलरची घसरण झाली असून, चांदीच्या दरातही प्रति औंस ४.४ डॉलरची घट नोंदवण्यात आली आहे. या घसरणीचा थेट परिणाम भारतीय बाजारपेठांवर दिसून आल्याचे सुवर्ण व्यवसायातील तज्ज्ञांनी सांगितले.

तज्ज्ञांच्या मते, देशांतर्गत वायदे बाजारात सोने आणि चांदी दोन्ही धातूंवर विक्रीचा दबाव वाढल्याने व्यवहारांमध्ये मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. गुंतवणूकदारांनी नफा-वसुलीसाठी विक्रीचा मार्ग स्वीकारल्याने किमती आणखी खाली आल्या आहेत. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडींवर पुढील काही दिवसांतही सोने-चांदीच्या किमती अवलंबून राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. जागतिक आर्थिक संकेत, अमेरिकेतील व्याजदर धोरणे आणि डॉलरच्या हालचाली यांचा आगामी काळात मौल्यवान धातूंच्या बाजारावर महत्त्वपूर्ण प्रभाव राहणार असल्याचे तज्ज्ञांकडून सांगण्यात येत आहे. दरम्यान सोने खरेही इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी आज सुवर्णसंधी आहे.

Comments
Add Comment