Friday, December 13, 2024
Homeसाप्ताहिककोलाजBollywood Song: पहले प्यारकी खुशबू...

Bollywood Song: पहले प्यारकी खुशबू…

  • नॉस्टॅल्जिया: श्रीनिवास बेलसरे

बदलते रिश्तेमधील पाच गाण्यात एक गाणे तर अक्षरश: गोड म्हणावे लागेल असे होते. ते कुणालाही गुणगुणायला लावणारे होते, हुरहूर लावणारे होते.

जयश्री पिक्चर्स’साठी सुरेशकुमार यांनी १९७८ ला काढलेल्या सिनेमाचे नाव होते ‘बदलते रिश्ते.’ महेंद्र सरल यांनी प्रेमाच्या त्रिकोणावर लिहिलेल्या कथेचा स्क्रीन प्ले लिहिला होता फणी मुजुमदार यांनी! जितेंद्र, ऋषी कपूर आणि रिना रॉय यांच्यासह सिनेमात ए. के. हंगल, दिना पाठक यांच्यासारख्या दोन दिग्गजांबरोबर शुभा खोटे, असरानी हे सहकलाकार होते. या गुंतागुंतीच्या प्रेमकथेला दिग्दर्शन होते आर. झालानी यांचे. ‘बदलते रिश्ते’ला एक फिल्मफेअर पारितोषिकही मिळाले. बी. प्रसाद यांना सिनेमाच्या सर्वोत्कृष्ट संकलनासाठी फिल्मफेअरने १९७९ साली गौरवले.

संगीत शिक्षिका असलेल्या सावित्री ठाकूरच्या (रिना रॉय) जीवनात मनोहर धनी (ऋषी कपूर) आणि सागर सिंग (जितेंद्र) हे देखणे तरुण वेगवेगळ्या वेळी येतात आणि प्रेमाची विचित्र गुंतागुंत तयार होते. दोघांनाही सावित्रीबद्दल अनावर प्रेम असते आणि तिचा सहवास आयुष्यभरासाठी मिळावा अशी त्यांची इच्छा असते. त्यामुळे कथेत बरीच नाट्यमय वळणे येऊन जातात, पण सिनेमा एका सुखांतिकेत संपल्याने शेवटी प्रेक्षकांना दिलासा मिळतो.

सिनेमातील पाच गाण्यात एक गाणे तर अक्षरश: गोड म्हणावे लागेल असे होते. ते कुणालाही गुणगुणायला लावणारे होते, हुरहूर लावणारे होते. या गाण्याला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी जी धून दिली होती तिनेच अनेकांना अक्षरश: वेड लावले. एक आगळाच नॉस्टॅल्जिक मूड तयार करणाऱ्या त्या चालीमध्ये काहीशी गूढता होती. प्रेमात पडलेल्या तरुण व्यक्तीच्या मनात आपला जीवलग जणू समोरच आहे, असे वाटत सतत अनेक संवाद सुचत असतात. खरे तर ती स्वगतेच असतात. अंजान यांनी गीतकार म्हणून आणि लक्ष्मी-प्यारे यांनी संगीतकार म्हणून या गाण्याला अगदी तशाच स्वगताची मुग्धता बहाल केली होती. आठवणीत हरवून गेलेल्या कुणा सुंदरीने स्वत:शीच गुणगुणत बसावे असे हे गाणे! त्याला अत्यंत अनुरूप असा स्वर होता लतादीदींचा. गाण्यात जरी एक कडवे महेंद्र कपूर यांच्या पहाडी आवाजात येऊन जाते तरी ते फारसे नोटीस होत नाही, इतके हे गाणे लतादीदींनी आपले करून टाकले होते!

यौवनातील प्रेमाचा पहिलाच ताजा टवटवीत अनुभव घेतलेल्या स्त्रीमनाचे मनोज्ञ चित्रण अंजान यांनी या गाण्यात केले. प्रेमाचा पहिला अनुभव नेहमी मनाला सैरभैर करून टाकणारा, धुंद करणारा असतो. माणूस आपल्याच तंद्रीत मग्न होतो. त्याला आजवर न जाणवलेले सौंदर्य सगळीकडे दिसू लागते. फुले अधिक सुंदर तर तारे अधिक चमकदार भासू लागतात. रूप, रंग, गंधाचे अनाकलनीय अनुभव येऊ लागल्यासारखे वाटत राहाते. ज्या व्यक्तीकडून हा अंग अंग रोमांचित करणारा अनुभव आला, त्या व्यक्तीचा चेहरा सतत डोळ्यांसमोर तरळत राहतो. जागेपणीचा प्रत्येक क्षण जणू ती व्यक्ती जवळच कुठेतरी आहे, असा भास होतो. तिचा मन मोहून टाकणारा चेहरा मनाच्या पटलावर तरळत राहतो. सगळी जाणीव तिच्याच विचाराने भारलेली असते. मनात उमलणारी प्रत्येक भावना जणू त्या व्यक्तीलाच संबोधित केली जाते. म्हणूनच शब्द येतात –

मेरी साँसोंको जो महका रही है,
ये पहले प्यार की खुशबू,
तेरी साँसोंसे शायद आ रही है.
मेरी साँसोंको महका रही हैं…

प्रेम ही जरी एक नाजूक, तरल पण केवळ भावना असली तरी तिची अभिव्यक्ती शारीर पातळीवर झाल्याशिवाय तिला पूर्तता आल्याचे समाधान मिळत नसते. कित्येकदा तर एखादा अनाहूतपणे झालेला स्पर्श हाच तिचा आधार असतो. एखाद्या उत्कट पातळीवर जाणवलेल्या सहवासाने सगळे अस्तित्व मोहरून उठते. सगळ्या शरीरभर गोड आनंदलहरी उसळत राहतात. ती धुंदी मनाला घेरून टाकते –

शुरू ये सिलसिला तो उसी दिनसे हुआ था,
अचानक तुने जिस दिन मुझे यूँ ही छुआ था.
लहर जागी जो उस पल तन-बदन में,
वो मनको आज भी बहका रही है,
ये पहले प्यारकी खुशबू…

लतादीदीने आणि लक्ष्मीकांत प्यारेलालांनी गाण्याच्या या कडव्यातून प्रेक्षकांना एक अवर्णनीय अनुभव दिला होता. अनेकदा जे अबोध पातळीवर जाणवले होते पण समजलेच नव्हते ते अशी भावमधुर गाणी पहिल्यांदाच उत्कटपणे जाणवून देतात. पुढचे कडवे महेंद्र कपूर यांच्या आवाजात येते. त्यात प्रेमाची झालेली बेधुंद सुरुवात आणि प्रियेकडून त्याची कबुली मिळाल्यावर प्रियकराच्या मनात निर्माण झालेली भेटीची अनावर ओढ फार सुंदरपणे चित्रित झाली होती. प्रेमाची दाहकता उभयपक्षी सुरूच आहे, हे जेव्हा कळते, तेव्हा एकांतातल्या प्रत्यक्ष भेटीची इच्छा अनावर होते. तसे ते किती नैसर्गिक आणि स्वाभाविकच नसते का?

मग तिचे सौंदर्य, तिचा चेहरा त्याच्या नजरेसमोरून हटतच नाही. झोपेत आणि जागेपणीही मन तिच्या दिवास्वप्नात रमू लागते. मनात उमटणारे सगळे गुज तिला सांगावे असे वाटते. प्रियेला कवेत घ्यावे, तिला आपले करून टाकावे, दोघांनी एकरूप व्हावे, असे वादळी विचार मनाला सैराट करून सोडत असतात. मग हीच फिर्याद तिच्याकडेच केली जाते.

बहुत तरसा है ये दिल, तेरे सपने सजाके,
ये दिलकी बात सुन ले, मेरी बाँहोंमें आके.
जगाकर अनोखी प्यास मन में,
ये मिठी आग जो दहका रही है.
ये पहले प्यारकी खुशबू…

प्रिया मात्र या आवाहनाने, अचानक समोर उभे राहिलेल्या धाडसाच्या कल्पनेने संकोचली आहे. तिने प्रेमाची कबुली तर देऊन टाकली, पण त्यापुढे काय बोलावे ते तिला कळत नाही. ती म्हणते ‘जे मी बोलू शकत नाहीये ते तू माझ्या डोळ्यांत वाच.’ तुझ्या चेहऱ्यावरचे, माझी नजरबंदी करून टाकणारे, स्मितहास्य मला बैचेन करते. तुझ्या नजरेला नजर मिळवली की माझ्या हृदयाची धडधड वाढते!

हे वर्णन करताना अंजान यांनी एक फार सुंदर शब्दयोजना प्रथमच केली होती. ते म्हणतात, मनात खोलवर दबलेली मिलनाची तृष्णा अर्धोन्मीलित डोळ्यांच्या गवाक्षातून मंदपणे चमचमते आहे. गाण्यातील शब्द होते ‘दबी वो प्यास मनकी, नजरसे “झीलमिलाये” खरे तर ‘झीलमिलाये’ हा शब्द ते प्रकाशणे किती हळुवार, नाजूक आणि काव्यमय आहे हे सांगतो. त्याला तसा प्रतिशब्द कुठून आणायचा?

ये आँखे बोलती हैं,
जो हम न बोल पाए,
दबी वो प्यास मनकी, नज़रमें झिलमिलाए,
होंठोंपे तेरी हलकी-सी हँसी है,
मेरी धड़कन बहकती जा रही है.
ये पहले प्यारकी खुशबू…
यौवनसुलभ प्रेम ही जेव्हा आयुष्यात
एखाद्याच वेळी घडणारी, वावटळीसारखी
येऊन, सगळे भावविश्व उलटेपालटे करून जाणारी गोष्ट होती, तेव्हाच्या या गोष्टी!
अर्थात नॉस्टॅल्जियाच्या!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -