
गडहिंग्लज : कोल्हापूर जिल्ह्यातील गडहिंग्लज येथील तरुण उद्योगपती तथा अर्जुन उद्योग समूहाचे सर्वेसर्वा संतोष शिंदे (Santosh Shinde) यांनी पत्नी व मुलासह शुक्रवारी रात्री विष प्राशन केल्यानंतर गळ्यावर सुरी ओढून आपली जीवनयात्रा संपवल्याची घटना शनिवारी सकाळी उजेडात आली.
अल्पावधीतच औद्योगिक आणि सामाजिक क्षेत्रात मोठं नाव कमावलेल्या शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. महिनाभर ते तुरुंगातही होते. संतोष शिंदे यांना खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न झाल्यानंतर ते तणावाखाली गेले होते. या तणावातून त्यांनी स्वत:सह कुटुंबाचा शेवट केला. या घटनेनंतर गडहिंग्लज शहरवासियांनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी करत गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, संतोष शिंदे यांनी लहान वयातच आश्चर्यकारक भरारी घेत अर्जुन उद्योग समूहाची स्थापना केली होती. या अंतर्गत त्यांनी तेल उत्पादन, व्यायाम शाळा, 'विराज फुड्स'च्या माध्यमातून महाराष्ट्रासह कर्नाटकातही उद्योग विस्तारला होता. त्यामुळे ते आत्महत्या करून आपला जीवनप्रवास थांबवतील असे कुणालाही वाटले नव्हते.
शनिवारी सकाळी संतोष शिंदे यांनी बराचवेळ आपल्या बेडरुमचा दरवाजा उघडला नाही. त्यामुळे त्यांच्या आईने शेजाऱ्यांना बोलावले. त्यानंतर त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता त्यांना शिंदे, त्यांची पत्नी व मुलाचा मृतदेह आढळला. यावेळी त्यांच्या मानेवर जखमा आढळल्या. त्यामुळे त्यांनी विष प्राशन केल्यानंतर गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून आत्महत्या केल्याची चर्चा आहे.
संतोष शिंदे यांच्यावर काही दिवसांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी त्यांना महिनाभर तुरुंगातही रहावे लागले होते. तेव्हापासून ते तणावात होते. जामिनावर सुटल्यानंतर त्यांनी उद्योगात पुन्हा भरारी घेण्याचा प्रयत्न केला. पण त्यात त्यांना अपयश आले. त्यातून आलेल्या नैराश्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे दिसून येत आहे. दरम्यान, शिंदे यांच्या वडिलांचेही अलिकडेच निधन झाले होते. त्यांच्या पश्चात आई, विवाहित बहीण असा परिवार आहे.
दरम्यान, त्यांनी आत्महत्या करण्यापूर्वी सुसाईट नोट लिहिली असून ती गडहिंग्लज पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे सुसाईड नोटमधील तपशील समोर आल्यानंतर आत्महत्येचं खरं कारण समोर येणार आहे.