शिक्षकावर कारवाई करण्याची पालकांची मागणी
कांदिवली : राज्यात धार्मिक वादांमुळे वातावरण चिघळत असतानाच आता शाळा स्तरावरही धर्मावरुन तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील कांदिवली परिसरातील कपोल विद्यानिधी (kapol Vidyanidhi International school) शाळेत आज सकाळी प्रार्थनेच्या वेळी अजान (Azan) लावल्याने पालक संतापले व गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. संतप्त पालकांनी भाजप आमदार योगेश सागर यांच्या नेतृत्वाखाली निदर्शनं सुरु केली. खबरदारीचे उपाय म्हणून पोलीस प्रशासनही तातडीने येथे दाखल झाले. या प्रकरणी ज्या शिक्षिकेकडून ही अजान लावण्यात आली तिच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
‘आम्ही सर्व प्रकारच्या व सर्व धर्मातील प्रार्थना लावतो. त्यामध्ये गायत्री मंत्र असेल, कॅरोल सिंगिंग असेल किंवा मग इतर धर्मियांच्या प्रार्थना असतील त्या विद्यार्थ्यांना समजाव्यात यासाठी हा उपक्रम असतो’, असं शाळेने स्पष्टीकरण दिल्यानंतर पालकांनी आणखी आक्रमक होऊन ‘आम्हाला न्याय हवा आहे’ (We want justice), ‘कुछ तो शरम करो’ अशी घोषणाबाजी केली. शाळेसारख्या ठिकाणी अजान लावण्याची गरजच काय? असा सवाल करत त्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्याची पालकांनी मागणी केली.
दरम्यान, पालकांचा विरोध पाहता शाळा प्रशासनाने माफी मागितली व चूक झाली आहे त्यामुळे कारवाई होईल, असे आश्वासन दिले. मात्र त्यालाही न जुमानता आमदार योगेश सागर यांनी ही चूक नसून जाणूनबुजून हे कृत्य केल्याचा आरोप केला. ज्या शिक्षिकेने हे कृत्य केलं ती अल्पसंख्याक (Minority) आहे, त्यामुळे शाळेने जाणीवपूर्वक तिचं नाव समोर आणलेलं नाही असं वक्तव्यही त्यांनी केलं.
हा सगळा हिंदूंचा परिसर आहे. इथे अजान लाऊड स्पीकरवर का लावण्यात आली? आज शुक्रवार आहे त्यामुळे शाळेमध्ये अजान लावली का? हे काम कोणी केलं आहे? हा उपक्रम कशासाठी? हिंदू शाळेत अजान का लावण्यात आली? असे प्रश्न भाजप आमदार योगेश सागर यांनी उपस्थित केले. कारवाई झाल्याशिवाय आंदोलन शांत होणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान शिवसेनेनेही पोलीस ठाण्यात निवेदन देऊन त्या शिक्षकावर निलंबनाची कारवाई करण्याची मागणी केली आहे.