भाजप आमदार नितेश राणे यांचा सवाल
मुंबई : महायुतीच्या सरकारबद्दल झालेल्या सर्व्हेवर टीका करण्याआधी खासदार संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांना दर तीन महिन्यांनी बेस्ट सीएम म्हणून मिळालेल्या किताबासाठी केलेला सर्व्हे कोठे केला होता? हे सांगावे. हे सर्व्हे कर्जतच्या फार्महाऊसवर बसून केले होते का?, असा सवाल भाजप आमदार नितेश राणे यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना केला.
शिंदे सरकारच्या सर्व्हेबद्दल संजय राऊत म्हणाले की, हा सर्व्हे सरकारी बंगल्यात बसून केला होता. त्याला प्रत्त्युत्तर देताना नितेश राणे बोलत होते. उद्धव ठाकरेंमुळे अडीच वर्षे महाराष्ट्र देशोधडीला लागला, पिछाडीला गेला. तरीही उद्धव ठाकरे यांना दर तीन महिन्याने बेस्ट सीएमचा पुरस्कार कसा काय मिळाला? याचा सर्व्हे कर्जतच्या फार्महाऊसवर झाला होता, की डिनो मोरयाच्या घरी, याची माहिती संजय राऊत यांनी द्यावी. दुसऱ्यांचा सर्व्हे आल्यावर तुम्ही जळता. पण उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे बॉलिवूडच्या कलाकारांना स्वतःची लाल करून घेण्यासाठी दर महिन्याला किती पैसे द्यायचे, याची माहिती मी देऊ का? त्या एजन्सीची माहिती देऊ का? म्हणजे तुम्हालाही कळेल की करोडोंचा पैसा देऊन हे बॉलीवूडचे कलाकार उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची लाल करायचे…, असा सवाल त्यांनी केला.
आमचे सरकार अतिशय सक्षमपणे काम करत आहे. लोकांच्या मनात असलेले काम करत आहे. गतिमान महाराष्ट्र पुढे घेऊन जात आहे. त्यामुळे हे असे सर्व्हे येत आहेत, असेही नितेश राणे म्हणाले.