
'शासन आपल्या दारी'चा पाचवा कार्यक्रम
कोल्हापूर : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात अनेक विकासकामे राबवत आहेत. त्याचाच एक भाग असलेल्या 'शासन आपल्या दारी' या उपक्रमांतर्गत होणार्या कार्यक्रमासाठी आज मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री कोल्हापूर दौर्यावर असणार आहेत. सिंधुदुर्गात सावंतवाडी येथील कार्यक्रमानंतर आज कोल्हापूरमध्ये पाचवा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
मागच्याच आठवड्यात कोल्हापूरमध्ये आक्षेपार्ह स्टेटस ठेवल्याप्रकरणी तणाव निर्माण झाला होता. यानंतर बरोबर एका आठवड्याने मुख्यमंत्री इथे येणार आहेत. दरम्यान, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांना ठाकरे गटाकडून काही प्रश्नांची विचारणा होणार आहे. कोल्हापुरातील काही प्रलंबित प्रश्नांसंबंधी निवेदन न देता ठाकरे गटाचे कार्यकर्ते प्रश्न विचारण्यावर ठाम आहेत. याला मुख्यमंत्री कशा प्रकारे सामोरे जातील, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांनादेखील मुख्यमंत्र्यांशी चर्चा करायची होती. मात्र मुख्यमंत्र्यांनी राजू शेट्टी यांना १५ जूनला सह्याद्री अतिथीगृहावर होणार्या बैठकीचं निमंत्रण दिलं आहे. त्यामुळे या संघटनेने आपलं आंदोलन दोन दिवस स्थगित केलं आहे.