Monday, January 20, 2025
Homeब्रेकिंग न्यूजवसतिगृहातील हत्याकांडाला महाआघाडी सरकारच जबाबदार!

वसतिगृहातील हत्याकांडाला महाआघाडी सरकारच जबाबदार!

तरुणीची हत्या करणाऱ्या कनोजियाची नेमणूक नियमबाह्य

मुंबई : मरीन ड्राइव्ह येथील सावित्रीबाई फुले या शासकीय वसतिगृहात विद्यार्थिनीची हत्या झाल्याने वसतिगृहांतील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. तरुणीची हत्या करून आत्महत्या केलेला सुरक्षा रक्षक ओमप्रकाश कनोजियाची नेमणूक नियमानुसार झालेली नव्हती. तसेच दीड वर्षांपूर्वी महाविकास आघाजी सरकारच्या काळातच सगळे नियम धाब्यावर बसवून त्याची सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. शासनाने काटकसरीचे धोरण म्हणून सुरक्षा रक्षकांची पदे कमी केल्यामुळे कनोजिया याला सुरक्षा रक्षकाचे काम देण्यात आले होते, अशी धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

आरोपी कनोजिया हा गेल्या अनेक वर्षांपासून वसतिगृहात कपड्यांना इस्त्री करण्यासह इतर छोटी-मोठी कामे करत होता. परंतू साधारणत: दीड वर्षांपूर्वी त्याची सुरक्षा रक्षक म्हणून नेमणूक करण्यात आली. त्याची नियुक्ती कोणत्या प्रक्रियेंतर्गत करण्यात आली, याबाबत पोलीस तपास करत आहेत.

सुरक्षा रक्षकांच्या नेमणुकीचे काम निविदा प्रक्रिया राबवून खासगी कंपनीद्वारे करण्यात येते. मात्र, कनोजियाची नियुक्ती अशा स्वरुपाची कोणतीही प्रक्रिया पूर्ण करून झालेली नव्हती, असे आता चौकशीत समजते आहे.

या वसतिगृहाची दुरावस्था झाली आहे. मुली राहत असलेल्या खोल्यांची अवस्था बिकट आहे. अनेक ठिकाणी वसतिगृहाच्या इमारतीच्या भिंतींच्या प्लॅस्टरचीही पडझड झाली आहे. ठिकठिकाणी भिंतींना सिमेंट लावून डागडुजी केल्याचे दिसून येते. सध्या या वसतिगृहाच्या नूतनीकरणाचे काम सुरू आहे. त्यामुळे बाहेरील व्यक्तींची मोठ्या प्रमाणात ये-जा होत असल्याने विद्यार्थ्यांनींच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करण्यात आला होता.

या वसतिगृहात एकूण २५० खोल्या असून, २२५ खोल्यांमध्ये विद्यार्थिनी राहतात. प्रत्येक खोलीमध्ये २ विद्यार्थिनी राहतात. त्यामुळे वसतिगृहात २४ तास महिला सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्याची मागणी होत आहे.

वसतिगृहातील अनेक सीसीटीव्ही बंद असल्याचे पोलीस तपासणीत निष्पन्न झाले आहे. त्यात मृत मुलीची खोली असलेल्या चौथ्या मजल्यावरील सीसीटीव्हीचाही समावेश आहे. प्रवेशद्वाराजवळील सीसीटीव्ही सुरू असल्यामुळे आरोपी वसतिगृहातून बाहेर पडताना दिसत आहे.

दरम्यान, सरकारने वसतिगृहातील सुरक्षा रक्षकांची पदे कमी केली आहेत. सध्या वसतिगृहात दिवसभरात मिळून तीन सुरक्षा रक्षक कार्यरत आहेत. रात्री वसतिगृहात आम्हाला दोन सुरक्षा रक्षकांची आवश्यकता असते. त्यामुळे कनोजियाला सहाय्यक म्हणून सुरक्षा रक्षकाचे काम देण्यात आले होते, अशी माहिती वसतिगृहाच्या अधीक्षक वर्षां अंधारे यांनी दिली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -