Saturday, December 14, 2024
Homeताज्या घडामोडीआता घरांचे पत्ते शोधणे होणार सोपे!

आता घरांचे पत्ते शोधणे होणार सोपे!

महानगरपालिका आयुक्तांनी शोधून काढला 'हा' तोडगा

छत्रपती संभाजीनगर : नव्या शहरात गेल्यानंतर एखाद्या घराचा पत्ता शोधायचा म्हटलं की बर्‍याचदा चुकामूक होते. अनेकदा घर समोरच असताना आपण इतरांना पत्ता विचारत तिथल्या तिथे घुटमळत राहतो. यात वेळही वाया जातो आणि श्रमही. गुगल मॅपमुळे पत्ता शोधणे सोयीचे झालेले असले तरी गुगल मॅप थेट घरापर्यंत घेऊन जात नाही, त्यासाठी तिथल्या स्थानिकांनाच विशिष्ट पत्ता विचारावा लागतो. हा गोंधळ टाळण्यासाठी छत्रपती संभाजीनगरच्या महानगरपालिका आयुक्तांनी एक तोडगा शोधून काढला आहे. यामुळे शहरातील कोणत्याही कोपर्‍यात असलेल्या घराचा पत्ता एका क्लिकवर शोधता येणार आहे. शिवाय यासाठी नागरिकांवर कोणताही अतिरिक्त खर्च पडणार नाही.

गेल्या काही वर्षात छत्रपती संभाजीनगर शहराचा व्याप मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. अशा परिस्थितीत बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांना पत्ता विचारत फिरावे लागते. औरंगपुरा, पिंपळाचे झाड, एखाद्या दुकानाची मागील गल्ली असा पत्ता सांगावा लागतो. त्यामुळे शहरात आता प्रत्येक घरावर एकाच पद्धतीचे डिजिटल ॲड्रेस असावेत, ज्यामुळे क्यू आर कोड स्कॅन केल्यावर लगेच पत्ता मिळू शकेल, अशी पद्धत राबवण्याचा महानगरपालिका प्रशासनाने विचार केला आहे.

यासाठी लागणारा खर्च नागरिकांकडून वसूल केला जाणार नाही किंवा महापालिका स्वतःसुद्धा निधी वापरणार नाही. सीएसआर अथवा शासनाकडून निधी मिळवून उपक्रम राबविण्याचा मानस प्रशासक जी. श्रीकांत यांनी व्यक्त केला. डिजिटल ॲड्रेस पद्धतीमुळे बाहेरगावाहून आलेले लोक, डिलिव्हरी बॉय आणि अन्य लोकांना केवळ एक क्यूआर कोड स्कॅन करुन इच्छित स्थळी पोहोचता येणार आहे.

विशेष म्हणजे जगभरात डिजिटल ॲड्रेसचा वापर वाढतो आहे. अमेरिकेच्या कॅलिफोर्नियामध्ये याचा वापर सुरू आहे. ज्यामुळे ड्रोनद्वारे अचूक पत्त्यावर सामान पाठविण्यात येते. भारतात अलीकडेच काही शहरात डिजिटल अँड्रेसकडे वाटचाल सुरु करण्यात आली आहे. यामध्ये घर क्रमांक, मालमत्ता क्रमांक, नळ कनेक्शनची माहिती, सिटी सर्व्हे क्रमांक, गट क्रमांक, जीपीएस लोकेशन, मालमत्ताधारकाचे नाव आदी माहिती टाकली जाते. ज्यामुळे क्यूआर कोडच्या माध्यमाने मालमत्ता शोधणे अधिक सोपे जाते.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -