नवीन संसद भवनाचे उद्घाटन काल रविवारी अत्यंत उत्साहात झाले आणि भाजपप्रणीत एनडीएतील घटक पक्षांबरोबरच विरोधी पक्ष मिळून एकूण २५ पक्षांनी उपस्थिती दर्शवली. मात्र काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यातून त्यांची देशाप्रति असलेली अनास्था, देशाप्रति बेगडी प्रेम आणि केवळ राजकारणापेक्षा त्यांना काहीही प्यारे नाही, याचे यथेच्छ प्रदर्शन झाले. एका व्यक्तीच्या द्वेषाने पछाडलेले हे विरोधी पक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतात, हे त्यातून सिद्ध झाले. ज्या विरोधी पक्षांनी संसद भवनाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला, त्यात सारेच पक्ष हे स्वार्थासाठी कोडगे झालेले आहेत, हे दिसते. प्रत्येक पक्ष कोणत्या न् कोणत्या घोटाळ्यात अडकलेला आहे आणि त्याला मोदी सरकार हटवायचे आहे. पण तसे करण्याची हिमत आणि औकात दोन्ही नाही. त्यामुळे वेगवेगळ्या मार्गाने मोदी सरकारला अपशकुन करायचा त्यांचा इरादा आहे.
अरविंद केजरीवाल हे मद्य घोटाळ्यात पुरते अडकले आहेत, तर के. चंद्रशेखर राव यांची कन्या यात अडकली आहे. महाराष्ट्राच्या एका माजी मुख्यमंत्र्यांशीही या प्रकरणाचे धागेदोरे येऊन मिळतात, अशी चर्चा आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने बहिष्कार टाकला असला तरीही त्यांच्या कोणत्याच भूमिकेवर इतर पक्षीयांचाच काय पण खुद्द राष्ट्रवादी नेत्यांचा विश्वास नसावा. कारण त्या पक्षाचे ज्येष्ठ नेते सातत्याने पलटी मारण्यात पटाईत आहेत. त्यामुळे अशा राजकीय पक्षांनी बहिष्कार टाकला काय किंवा सहभागी झाले काय, त्यात काहीच अर्थ नाही. हे तेच विरोधक आहेत की ज्यांनी संसद भवनाच्या निर्माण कामातच अडथळे आणले होते. त्यांनी संसद भवनाची निर्मिती म्हणजे मोदी यांच्यासाठी महाल बांधण्याचे काम सुरू आहे, असा अपप्रचार करण्यासही कमी केले नव्हते. भारतातील जनता अडाणी आहे आणि ती आपण सांगू त्यावर विश्वास ठेवते, असे त्यांना वाटत असावे.
आता हे विरोधक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन व्हायला हवे असा गळा काढून रडत आहेत. मग यातील अनेक विरोधी पक्षांनी राष्ट्रपती निवडणुकीत मुर्मू यांना मतदान करू नका, म्हणून प्रचार केला होता. बहिष्कार टाकणारा एक पक्ष ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेसने तर मुर्मु यांच्याविरोधात यशवंत सिन्हा या अपयशी नेत्याला उभे केले होते. त्यांनी जोरदार आपटी खाल्ली, हा भाग वेगळा. त्या विरोधकांना आता मुर्मू यांच्या नावाने जोगवा मागणे शोभत नाही. यानिमित्ताने त्यांना आपण विरोधकांची एकी दाखवू, असे वाटत आहे. पण जनता दल धर्मनिरपेक्ष आणि बहुजन समाज पक्ष, बिजू जनता दल वगैरे अनेक पक्षांनी उद्घाटन समारंभाला हजर राहून त्यांच्या संभाव्य ऐक्याला पंक्चर करून टाकले आहे. यात विरोधकांची अशी फजिती झाली की, ते आपल्या ऐक्याचे प्रदर्शन करायला गेले आणि प्रत्यक्षात त्यांच्यातील दुफळीचेच प्रदर्शन झाले. नीती आयोगाच्या बैठकीलाही केजरीवाल वगैरे पक्षांनी बहिष्कार टाकला पण काँग्रेस हजर राहिली.
मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन केले पाहिजे असे म्हणणाऱ्या अनेक विरोधी पक्षांनी त्यांच्या राष्ट्रपती उमेदवारीस विरोध केला होता. याला शुद्ध ढोंगीपणा म्हणतात. काहींनी तर मुर्मू यांना शिवीगाळही केली होती. इतकेच काय पण त्यांच्या संसद भवनातील अर्थसंकल्पीय अधिवेशनातील भाषणावरही बहिष्कार टाकला होता. नवीन संसद इमारत ही काही मोदी यांची मालमत्ता नव्हे. तिच्यामधून संविधानाचे मंत्र उमटणार आहेत आणि संविधानाची प्रतिष्ठा जपली जाणार आहे. त्यामुळे अशा कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याने ऊठसूट घटनेचा जप करणाऱ्या विरोधकांना तिची किती आस्था आहे, हेच समोर आले आहे. काँग्रेसच्या पंतप्रधानांनी अनेक संसद बांधकामांची उद्घाटने केली. त्यावर भाजप विरोधी म्हणून काँग्रेसची तळी उचलून धरणाऱ्या माध्यमपंडितांनी बुद्धिभेद करण्याचा प्रयत्न केला आहे. पण असल्या पत्रपंडितांचे हित कुठे दडलेले असते, हे सर्वांना माहीत असते. एक खरे आहे की मुर्मू यांच्या बहाण्याने विरोधी पक्ष केवळ मोदी यांच्यावर हल्ला करत आहेत. मोदी यांच्या विरोधात काहीही दारूगोळा मिळाला नाही म्हणून त्यांचे हे रूदन सुरू आहे. त्यातच मुर्मू यांच्या हस्ते उद्घाटन करण्याचे केंद्राला निर्देश द्यावेत, ही विरोधी पक्षांच्या मार्गदर्शनाखाली दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने साफ फेटाळून लावून विरोधकांचे तोंड फोडले आहे. सर्वोच्च न्यायालयाने अत्यंत कडक शब्दांत याचिकाकर्त्याला झापले आहे. त्यामुळे विरोधकांची अवस्था सहन होईना आणि सांगताही येईना अशी झाली आहे. राष्ट्रपती दोन्ही सभागृहांचे सदस्य नसतात. पंतप्रधान हाच खरा देशाचा प्रमुख असतो. त्यामुळे त्याने उद्घाटन करण्यात काहीही अनुचित नाही. केवळ राजकीय विरोधासाठी विरोध करणे हे लोकशाही प्रगल्भ झाली नसल्याचे लक्षण आहे आणि त्यासाठी आपले भ्रष्टाचाराने बरबटलेले विरोधक जबाबदार आहेत. काँग्रेस सरकार होते तेव्हा प्रत्येक नवीन महामार्ग आणि उड्डाण पूल यांना गांधी परिवारातील व्यक्तींची नावे दिली जायची. त्या काँग्रेस पक्षाने उद्घाटन कुणी करावे, यावर ज्ञानदान करावे हा अव्वल दर्जाचा विनोद झाला. उद्घाटनाअगोदर हवन वगैरे कार्यक्रम होणार आहेत. त्यावरही विरोधक टीका करतीलच. पण कर्नाटकात काँग्रेस विधानसभा सौधमध्ये प्रवेश करण्यापूर्वी धार्मिक कार्यक्रम करूनच गेली होती. तेव्हा संसद भवनावर बहिष्कार टाकण्याने विरोधी पक्षांचे ऐक्य झालेच नाही, मग ते मजबूत होण्याचे तर सोडूनच द्या.