Tuesday, June 17, 2025

रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणारे ७१ रेल्वे दलाल गजाआड

रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणारे ७१ रेल्वे दलाल गजाआड

मुंबई : रेल्वे तिकीटांचा काळाबाजार करणा-या ७१ रेल्वे दलालांना पकडण्यात पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाला यश आले आहे. त्यांच्याकडून २६ लाखांची तिकिटे जप्त करण्यात आली आहेत.


लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचे अनधिकृत दलाल मोठ्या प्रमाणात आरक्षण करतात. तात्काळ तिकीट मिळवण्यासाठी तिकीट खिडक्यांसमोर एकापेक्षा अधिक अनधिकृत दलाल उभे केले जातात. हीच तिकीटे हे दलाल नंतर जास्त किंमतीत विकतात. सामान्य प्रवाशांना तिकीट न मिळाल्यामुळे अशा दलालांचा नाईलाजाने आधार घ्यावा लागतो. त्यामुळे सामान्य प्रवाशांची प्रचंड आर्थिक पिळवणूक होते.


ही बाब पश्चिम रेल्वे सुरक्षा दलाच्या लक्षात येताच या दलालांना पकडण्यासाठी त्यांनी तात्काळ हालचाली सुरु केल्या. १ ते २७ मे दरम्यान सुरक्षा दलाने ७१ तिकिट दलांलांवर ६३ गुन्हे दाखल केले. त्यांच्याकडून २६ लाख ६१ हजार ३१० रुपयांची ई-तिकिटे जप्त करण्यात आली.


ई-तिकीट आणि खिडकी तिकिटांच्या विरोधात विशेष मोहिमेत अंधेरी येथे एका दलालाला अटक केली. तसेच साकी नाका परिसरात रेल्वे तिकीटांची अवैध विक्री होत असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली. त्यासाठी १५ मे रोजी सुरक्षा दल आणि दक्षता विभागाचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. या पथकाने अलीम खान आणि अफजल नफीस खान यांना अटक केली.


सुरुवातीला अलीम खानकडून १ लाख ३ हजार ९८५ किंमतीची १४ जर्नी कम रिझर्व्हेशन तिकिटे ताब्यात घेउन अंधेरी आरपीएफ पोस्ट येथे गुन्हा दाखल करण्यात आला. अधिक चौकशी केली असता अलीम खानने तो साकी नाका येथील रहिवासी असल्याचे सांगितले व आपल्या सोबत अफजल नफीस खान काम करीत असल्याचे सांगितले. अफजल नफीस खानला २२ मे रोजी साकी नाका परिसरातून आरपीएफने ताब्यात घेतल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकुर यांनी दिली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा