
मुंबई: उकाड्यात सर्वांना दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. सर्वांना हवाहवासा वाटणारा मान्सून आता अवघ्या काही दिवसांतच तळकोकणात दाखल होणार आहे. मान्सून केरळात १ जून आणि महाराष्ट्राच्या तळ कोकणात ७ जून रोजी दाखल होईल असा अंदाज हवामान खात्यानं व्यक्त केला आहे.
सध्याच्या घडीला अरबी समुद्रातून वाहणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा वेग आता वाढू लागला आहे. तिथं सुरु असणाऱ्या या हालचाली पाहता मान्सूनसाठीची पूरक स्थिती आणि वाऱ्यांचा वेग पाहता मान्सून केरळात तीन दिवस आधी, म्हणजेच ४ जूनऐवजी १ जूनला दाखल होईल. वाऱ्यांचा हाच वेग कायम राहिल्यास महाराष्ट्रात मान्सून लवकरच दाखल होईल.
दरम्यान, सध्याच्या घडीला यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा प्रभाव असल्याची चिंताही व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळं भारतीय हवामान खात्याच्या वृत्तानुसार मान्सून सर्वसाधारण असेल की सरासरीहूनही त्याचं प्रमाण कमी असेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. याबाबत मात्र मतभिन्नता पाहायला मिळत आहे.