कोल्हापूर : शरद पवारांनी चेंबूर येथील युवा मंथन शिबिरात लवकरच आपण भाकरी फिरवणार असल्याचं म्हटल्यानंतर सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये भाकरी फिरवण्यावरुन अनेक राजकीय चर्चा सुरु आहेत. त्यातच काल विधानसभा विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी कोल्हापूर येथे भाकरीचा पुन्हा उल्लेख केल्याने चर्चांना जोर आला आहे.
कोणत्याही मतदारसंघावर कुणाचीही मक्तेदारी नाही. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटनेत भाकरी फिरवण्यात येणार आहे. त्याची सुरुवात आमच्यापासूनच करण्यात येणार आहे, असं अजित पवार यांनी स्पष्टच सांगितलंय. शरद पवार यांनी दोन दिवसांपूर्वी बोलवलेल्या मिटींगमध्येदेखील आपण हे वक्तव्य केल्याचं अजित पवार म्हणाले. बारामती, पुणे, पिंपरी-चिंचवड तसंच ग्रामीण भागात नवीन लोकांना संधी देणार असल्याचं पवार म्हणाले.
नवीन नेतृत्व तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. रोहित पवारला कर्जत जामखेडमध्ये मी सांगितल्याप्रमाणे काम करायला लावल्याने काँग्रेसकडे जाणारा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे आला. त्यामुळे कुठल्याही मतदारसंघात कुणाचीही मक्तेदारी नसते, असं अजित पवार यावेळी म्हणाले.
मविआच्या जागावाटपासंदर्भात बोलताना काँग्रेस आणि उद्धव गट लहान भाऊ व राष्ट्रवादी मोठा भाऊ असल्याचं वक्तव्य अजित पवारांनी केलं. “काँग्रेसला जास्त जागा मिळत असल्याने आम्हाला लहान भावाची भूमिका घ्यावी लागायची, मात्र आता आम्ही काँग्रेसपेक्षा मोठे भाऊ झालो आहोत”, असं ते म्हणाले.
पवारांच्या राजीनाम्याच्या निर्णयानंतर पक्षाच्या आग्रहाखातर ते अध्यक्षपदावर राहिल्याने राष्ट्रवादीचा मरगळ आलेला कार्यकर्ता कामाला लागला असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. दरम्यान मुख्यमंत्री कधी काय बोलतात हे कळत नाही, नुसतं सर्वसामान्यांचं सरकार म्हणायचं पण त्यांच्यासाठी काय केलं हे सांगा, असा टोला पवारांनी लगावला.