मुंबई : ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट रिलीज होण्याआधी आणि रिलीजनंतर अनेक वादाला तोंड फुटले आहे. तर काही राज्यामध्ये या चित्रपटावर बंदी घालण्यात आली. पण रिलीजच्या पहिल्या दिवसापासूनच या चित्रपटाला भरभरुन प्रेम मिळाले आहे. ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरदार कमाई करत आहे.
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाच्या रिलीजच्या नवव्या दिवशी १०० कोटींचा टप्पा पार केला होता. आता रिलीजच्या १२ व्या दिवशी या चित्रपटाने १५० कोटींचा आकडा देखील पार केला आहे. तसेच २०२३ सालच्या ब्लॉकबस्टर चित्रपटात या सिनेमाचा समावेश झाला आहे.
आजही या चित्रपटाला चाहत्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाईचे उच्चांक गाठत असल्याचे दिसत आहे. ‘द केरला स्टोरी’ने रिलीजच्या १२ व्या दिवशी ९.८० कोटी रुपयांची कमाई केली आहे. आतापर्यंत रिलीजच्या १२ दिवसांत या चित्रपटाने १५६.८४ कोटी रुपयांचा गल्ला कमावला आहे. तसेच ‘द केरला स्टोरी’ १५० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. दिवसेंदिवस या चित्रपटाच्या कमाईमध्ये मोठी वाढ होत आहे.
यामुळे आता येत्या वीकेंडपर्यंत हा चित्रपट २०० कोटींच्या कल्बमध्ये सामील होऊ शकणार आहे, अशी निर्मात्यांना मोठी आशा आहे. २०२३ मधील ‘द केरला स्टोरी’ हा सर्वाधिक कमाई करणारा चौथा सिनेमा ठरणार आहे.
‘द केरला स्टोरी’ या चित्रपटात अदा शर्मा, योगिता बिहानी, सिद्धी इदनानी आणि सोनिया बालानी हे मुख्य भूमिकेत आहेत. ४० कोटींच्या बजेटमध्ये निर्मिती करण्यात आलेल्या या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सुदीप्तो सेन यांनी सांभाळली आहे.