- सेवाव्रती: शिबानी जोशी
राष्ट्रसेविका समितीच्या माध्यमातून महिला, महिलांच्या आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक सबलीकरणासाठी विविध उपक्रम तसेच संस्था संपूर्ण देशभरात चालवत आहेत. यामध्ये वसतिगृह, शाळा, वाचनालय मंदिर, विविध प्रशिक्षण वर्ग यांचा समावेश आहे. अशाच प्रकारची एक संस्था नागपुरातील रामनगर भागात १९७८ सालापासून कार्यरत आहे, ‘श्री शक्तिपीठ’. म्हणजे राष्ट्रसेविका समितीच्या आद्यप्रमुख संचालिका वंदनीय मावशी केळकर यांचे स्मारक. याच ठिकाणी वंदनीय मावशींना अंतिम प्रणाम देण्यात आला होता. वंदनीय मावशीचे निधन झाल्यानंतर अहिल्या मंदिरापासून त्यांची शोकयात्रा याच स्थानापर्यंत निघाली होती. देशात पहिल्यांदाच एका महिलेच्या अंत्ययात्रेला इतकी गर्दी पाहायला मिळाली असावी. अनेक शोकाकुल सेविका गणवेशात यात उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. त्यानंतर वंदनीय मावशी यांचा पार्थिव देह या ठिकाणीच अभिवादनासाठी ठेवण्यात आला होता आणि इथेच त्यांना अंतिम प्रणाम करण्यात देण्यात आला होता. त्या वेळी या ठिकाणी शाखा घेतली गेली, प्रार्थना म्हटली गेली होती. त्यामुळे साहजिकच या ठिकाणी वंदनीय मावशीचे स्मृतिस्थळ उभारावे, अशी कल्पना समितीच्या सेविकांच्या मनात रुजली होती आणि म्हणूनच वंदनीय मावशींचा पार्थिव देह जिथे ठेवण्यात आला होता, त्या ठिकाणी एक तुळशी वृंदावन उभारण्यात आलं. त्यानंतर तळमजल्याचे काम झाल्यावर दर्शनी भागात वंदनीय मावशींचा पूर्णाकृती ब्रांझ पुतळाही बसवण्यात आला.
भारतात देवीची ५२ शक्तिपीठं आहेत. ही आपली ऊर्जाकेंद्र आहेत तसेच हे स्थानही सेविकांचे ऊर्जास्थान असेल म्हणून याचं नाव ‘श्री शक्तिपीठ’ ठेवलं गेलं. आज वंदनीय मावशींचे स्मृतिस्थान म्हणून ‘श्री शक्तिपीठ’ ओळखलं जातं आणि त्याला ऐतिहासिक महत्त्वही आलं आहे. मावशींच्या ४०व्या स्मृतिदिनाच्या दिवशी केंद्रीय विदेश मंत्री सुषमा स्वराज, प्रमुख संचालिका मा. शांताक्का यांच्या उपस्थितीत वंदनीय मावशींच्या नूतनीकृत स्मृतिशिल्पाचं लोकार्पण करण्यात आलं. वंदनीय मावशींचा फोटो मोठा करून सिमेंटमध्ये साकारलेलं हे कदाचित प्रथम शिल्प असेल. सुरुवातीला केवळ तीन खोल्यांमध्ये श्री शक्तिपीठाच्या कामाची सुरुवात झाली होती. समाजातील गरजू महिलांना मदत करणे, वैद्यकीय सेवा देणे, विद्यार्थीनींसाठी वसतिगृह चालविणे, उद्योग मंदिर इ. असा या संस्थेच्या स्थापनेमागील उद्देश. हळूहळू तिथे तीन मजली भव्य इमारत उभी राहिली आहे. तळमजल्यावर वैद्यकीय केंद्र, वाचनालय, उद्योग केंद्र चालवले जाते. पहिल्या मजल्यावरचा हॉल संस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांसाठी उपलब्ध करून दिला जातो तसेच त्याच ठिकाणी वसतिगृहातील मुलींच्या वास्तव्याची सोयही करण्यात आली आहे.
राष्ट्रसेविका समितीची आ. भा. संमेलनं दर ३ वर्षांनी वंदनीय मावशी असतानापासूनच सुरू झाली होती. त्यापैकी १९६४ साली आणि त्यानंतर १९८६ साली संमेलन नागपूरला आयोजित करण्यात आलं होतं. देशभरातील अनेक सेविका या संमेलनाला हजर होत्या. सध्या विविध प्रकारचे आरोग्य, उद्योग, प्रशिक्षण अशा क्षेत्रातले उपक्रम संस्थेत चालू असतात तसेच समितीची शाखा, वर्ग इथे नियमित भरतात. बऱ्याच वेळा महिला आपल्या आरोग्याची हेळसांड करतात, स्वतःसाठी पैसे खर्च करून औषधोपचार करत नाहीत. अशा महिलांसाठी होमिओपॅथिक चिकित्सालय प्रकल्पाद्वारे नि:शुल्क वैद्यकीय सेवा दिली जाते. प्रत्येक वर्षी महिलांसाठी नि:शुल्क आरोग्य शिबीर घेतले जाते. जवळच्या सेवा वस्तीतील जवळजवळ शंभर ते दीडशेजण या उपचार केंद्राचा फायदा घेतात.
समितीच्या प्रथम संचालिका वंदनीय लक्ष्मीबाई केळकर यांचा स्वतः रामायणाचा गाढा अभ्यास होता आणि त्या देशभर रामायणावर प्रवचन करण्यासाठी जात असत. रामायण प्रत्येकाने ऐकलं पाहिजे, आपले पौराणिक ग्रंथ तसेच आध्यात्मिक साहित्याचे वाचन झालं पाहिजे, असं त्या म्हणत असतं. त्याशिवाय महिलांनी पाककलेत निपूण असावे, यासाठी ही पाककृती शिकाव्यात, असं मावशी म्हणत असतं. म्हणूनच इथल्या वाचनालयात धार्मिक, आध्यात्मिक, पुस्तकं ठेवली आहेत. शक्तिपीठातील वाचनालयाला ‘प्राच्य विद्या कक्ष’ असं नाव देण्यात आलं आहे. प्राच्यविद्याकक्षाचे लोकार्पण ताई आपटे यांच्या प्रमुख उपस्थितीत, पद्मश्री पुरातत्त्ववेत्ते इतिहास संशोधक हरिभाऊ वाकणकर यांचे हस्ते झालं होतं. या कक्षात वेद, उपनिषद, पुराण, विविध भाषेतील रामायणं व अन्य राष्ट्रीय विचारांची पुस्तके, दिवाळीत दिवाळी अंक उपलब्ध असतात. रामायणाचा प्रचार, प्रसार व्हावा यासाठी रामायणाचे प्रशिक्षण दिलं पाहिजे, हे लक्षात आल्यावर काही काळ रामायणाचे प्रशिक्षण वर्गही चालवण्यात आले होते. त्याशिवाय कीर्तन वर्गही नियमितपणे संस्थेत चालवले जातात. आजपर्यंत अंदाजे पाचशे ते साडेपाचशे महिला, पुरुष, बालवर्ग या ठिकाणी कीर्तन शिकून तयार झालाय. आज त्यातील अनेकजण उत्तम प्रकारे गावोगावी कीर्तन करत आहेत. मावशींच्या प्रेरणेने नागपुरात १९५६ पासून नागपूर येथे राणी लक्ष्मीबाई भजन मंडळ सुरू करण्यात आले होते. त्याच्या अनेक शाखा नागपुरात आहेत. त्यापैकी एक वर्ग श्री शक्तिपीठातही असतो.
शहरांमध्ये लहान-लहान घरात गरीब कुटुंब राहतात. त्यांच्या मुलांना इच्छा असूनही घरात बसून शिक्षण घेता येत नाही, अशा मुलांसाठी अभ्यासिका उपलब्ध करून देण्यात येते. अनेक गरीब कुटुंबातील होतकरू मुलं या अभ्यासिकेचा फायदा घेत असतात. भजन हा आपला मराठीतील खास लोककलाप्रकार आहे. या कलेतून करणाऱ्याला आणि ऐकणाऱ्याला आनंदही मिळतो तसेच धार्मिक अधिष्ठानही लाभते. त्यासाठी महिलांसाठी भजन वर्ग घेतला जातो. समितीमध्ये अष्टभुजा देवीला खूप महत्त्व आहे. देवीच्या अष्टभुजा म्हणजे महिलांमध्ये असलेल्या अष्टशक्तींचे दर्शन घडवणारे प्रतीक मानले जाते म्हणून अष्टभुजा देवीचे अधिष्ठान असावे, असा नेहमीच समितीच्या सेविकांचा विचार असतो. त्यानुसार १९८६ला अष्टभुजा देवीचे एक छोटसे मंदिरही या ठिकाणी उभारण्यात आले आहे. अनेक महिला देवीच्या दर्शनाच्या निमित्ताने मंदिरात येऊन संस्थेची जोडल्या जातात तसेच नवरात्रीमध्येही खूप चांगले कार्यक्रम मंदिरात आयोजित केले जातात. दासनवमी, गंगा दशहरा उत्सवात प्रवचन, गंगालहरी कार्यक्रम आयोजित केले जातात. संस्थेने कार्यक्रमांसाठी लक्ष्मी सभागृह हे वातानुकूलित सभागृह उभारेले असून, विविध कार्यक्रमांसाठी ते सशुल्क उपलब्ध करून दिले जाते. ग्रामीण भागातून शहरात येणाऱ्या मुलींसाठी वसतिगृह चालवले जाते. वसतिगृहात महाविद्यालयीन मुलींना प्रवेश दिला जातो. अभ्यासाची आणि जेवणाची उत्तम सोय, सुरक्षितता या दृष्टीने हे वसतिगृह मुलींसाठी परिपूर्ण आहे. सध्या या ठिकाणी १४ मुली वास्तव्य करत आहेत. उद्योग वर्धिनीच्या माध्यमातून गरजू महिलांना पाककलेचे प्रशिक्षण देऊन त्यांनी केलेल्या पदार्थांची विक्रीही केली जाते. महिलांच्या हाताला काम द्यावं, यासाठी हा उपक्रम राबवला जातो.
थोडक्यात काय तर त्या भागात राहणाऱ्या महिलांचं एक विसाव्याचं ठिकाण किंवा माहेरघर म्हणता येईल, असं या श्री शक्तिपीठाचं नागपुरात मोठेपण सांगता येईल. प्रत्येक महिलेला काही ना काही कारणांनी शक्तिपीठाशी स्वतःला जोडून घेण्याची इच्छा असते, असे सर्वच उपक्रम शक्तिपीठांमध्ये महिलांच्या सबलीकरणासाठी तसेच विकासासाठी राबवले जातात. वंदनीय मावशी केळकर यांच्या स्मृतिस्थळामध्ये मावशींना अपेक्षित असलेली सर्व कार्य महिलांसाठी राबवण्याचा सर्वच सेविकांचा आणि पदाधिकारी महिलांचा प्रयत्न असतो. आर्थिक, सांस्कृतिक, सामाजिक तसेच वैद्यकीय उपक्रमांद्वारे महिला सक्षमीकरण करत गेली ४५ वर्षे श्री शक्तिपीठाचे कार्य अविरत सुरू आहे.