Monday, February 17, 2025
Homeसंपादकीयअग्रलेखजिया खान मृत्यूचे गूढ कायम

जिया खान मृत्यूचे गूढ कायम

निःशब्द फेम अभिनेत्री जिया खान मृत्यूप्रकरणाचे गूढ कायम ठेवून हे प्रकरण बंद करण्यात आले. कारण विशेष सीबीआय न्यायालयाचे विशेष न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी या प्रकरणातील संशयित अभिनेता सूरज पांचोली याला पुराव्याअभावी मुक्त केले. सय्यद यांनी निकालपत्रात जे वाक्य म्हटले आहे ते महत्त्वाचे आहे. त्यांनी म्हटले आहे की, आम्हाला आरोपीला सबळ पुरावा नाही म्हणून सोडून द्यावे लागत आहे. याचा अर्थ सरकार पक्षाने पुरेसा ठोस असा पुरावा जिया खान हिचा मृत्यू हा खून आहे की, आत्महत्या हे सिद्ध करण्यासाठी सादर केला नाही. सूरज पंचोली हा अभिनेता आदित्य पंचोली आणि अभिनेत्री झरिना वहाब हिचा मुलगा. तो जिया खानचा बॉयफ्रेंड होता आणि जिया त्याच्यावर अत्यंत मनापासून प्रेम करत होती, हे समोर आले होते. पण अचानक जिया खानचा मृतदेह ३ जून २०१३ रोजी एका रात्री आपल्याच घरात गळफास लावलेल्या अवस्थेत सापडला. त्यानंतर जियाची आई जी इंग्लंडमध्ये असते, तिने सातत्याने माझ्या मुलीचा खून आहे, असे आरोप करण्यास सुरुवात केली होती. १० जून रोजी सूरजला जियाला आत्महत्येला प्रवृत्त केल्याबद्दल अटक करण्यात आली. पोलिसांनी मात्र सुरुवातीपासून खुनाची थिअरी फेटाळून लावली होती. त्यांच्यावर कुणाचा दबाव होता का? हे आजपर्यंत कधीही प्रकाशात आले नाही. ऑगस्ट २०१६ मध्ये सीबीआयनेही मनुष्यवधाची शक्यता फेटाळून लावली.

राबिया खानने या प्रकरणी विशेष तपास पथक नेमण्याची मागणी करणारी याचिकाही दाखल केली होती, पण ती मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. अखेर २८ एप्रिल २०२३ रोजी मुंबई सीबीआय न्यायालयाने सूरज पंचोलीला मुक्त केले. पण ते पुराव्याअभावी. या जिया खान प्रकरणात अनेक कच्चे दुवे आहेत. जेव्हा न्यायाधीशच असे म्हणतात की, पुराव्याअभावी आम्ही मुक्त करत आहोत, तेव्हा न्यायालय केवळ समोर आलेल्या पुराव्यांच्या आधारे निकाल देत असते, हे तर उघड आहे. त्यामुळे बलदंड पुरावे त्यांच्यासमोर आणले गेले नाहीत, या शंकेला बळकटी येते. जियाचा मृत्यू झाल्यावर सहा दिवसांनी तिने लिहिलेले एक पत्र जियाच्या बहिणीने पोलिसांना सादर केले. त्यात नाव न घेता सूरजवर आरोप केले होते. मात्र ते पत्र जियानेच लिहिले होते की इतर कुणी, हे सिद्ध करता आलेले नाही. कारण त्याचे हस्ताक्षर जुळवता आले नाही. जियाने लिहिलेले ते पत्र दीर्घ होते आणि त्यात वारंवार आपण सूरजवर कसे पैसे खर्च केले, सूरजवर आपण किती प्रेम करतो, याचा लेखाजोखा सादर केला होता. त्या पत्राची अधिकृतता सरकारपक्षाला सिद्ध करता आली नाही. अन्यथा ते पत्र अत्यंत महत्त्वाचे दस्तऐवज सिद्ध होऊ शकले असते. एक म्हणजे न्यायपालिकेत प्रकरण समोर येण्यासच लागणारा विलंब आणि मधल्या काळात आरोपींना पुरावे नष्ट करण्यासाठी मिळणारा भरपूर वेळ यातून अनेक प्रकरणे तशीच संपुष्टात येतात. आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा आरोप सिद्ध करणे अत्यंत अवघड असते. दुसरे असेच प्रकरण आहे ते सुशांत सिंग राजपूत याचे. त्याचा खून की आत्महत्या याबाबत अजूनही गूढ कायम आहे आणि वेगवेगळे आरोप झाले तरीही त्याच्या आरोपींवर अजून ओरखडेही उठलेले नाहीत. सुशांतसिंग राजपूत प्रकरण हे खूपच हाय प्रोफाईल होते आणि त्यात तर राजकीय पक्षही गुंतले होते, असेही आरोप झाले. दुसरे प्रकरण सुशांत सिंगची सचिव दिशा सालियानच्या मृत्यूचे आहे. तिच्या संशयास्पद मृत्यूप्रकरणी तर एका माजी मुख्यमंत्र्यांचा पुत्र जो स्वतः माजी मंत्री आहे, त्याच्यावर आरोप झाले. पण तपास यंत्रणांनी याबाबत अद्याप काही मोठी हालचाल केलेली नाही. हाय प्रोफाईल प्रकरणे असोत की किरकोळ असोत, पुरावे समोर आणण्यात विलंब झाला की, आपोआपच खटला कमजोर होतो. जिया खान प्रकरणातून सूरज पुराव्याअभावी मुक्त झाला. यातून एक सामाजिक दुष्परिणाम असा होईल की काहीही केले तरी चालते, फक्त पुरावा मागे ठेवायचा नाही, असे समजून खुनांचे प्रकार वाढतील. नाही तरी पकडला गेला तरच चोर असतो, ही म्हण आपल्याकडे आहेच. जिया खान सुरुवातीला एक हिट अभिनेत्री होती. तिने निःशब्द आणि हाऊसफूल, गजनी अशा यशस्वी चित्रपटांत काम केले होते. नंतर मात्र तिला अचानक बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाले.

अर्थात त्याच काळात तिचे सूरजवरील प्रेम बहरल्याचे सांगण्यात येते. न्यायालयाने मात्र जियाने आपल्या भावनांवर काबू मिळवून सूरजशी संबंध तोडले असते, तर तिचा जीव वाचला असता, असे निरीक्षण नमूद केले आहे. तसेच राबिया खान यांच्यावरही न्यायालयाने न्यायपालिकेवर अविश्वास दाखवल्याप्रकरणी कडक ताशेरे ओढले आहेत. जियाचे लिहिलेले कथित पत्रही संशयास्पद असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे. याचा अर्थ एवढाच की पुरावे समोर आले तरच आरोपी पकडले जातील. पण आरोपी आपल्या बॉलिवूडमघील ताकदीचा, पैशाचा उपयोग करून पुरावे दडपण्याचे काम करणारच. त्यामुळे गुन्हेगार गजाआड डांबले जाणार की नाही, हा प्रश्न निर्माण होतो. ट्युलीप या अभिनेत्रीनेही अशीच आत्महत्या केली आहे आणि तिलाही आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा खटला चालू आहे. झिशान खान या अभिनेत्यास या प्रकरणी आरोपी केले आहे आणि त्या प्रकरणात काय निकाल लागतो, याबाबत आता उत्सुकता आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -